नाशिक | रयतेचा आदर्श शिक्षक – प्रशांत पगार (वाचक श्रेणी )

1
आयसर पुणेद्वारा झालेल्या राज्यस्तरीय मराठी विज्ञान परिषदेसाठी शोधनिबंध सादर. राज्यातील एकूण निवड झालेल्या ६८ शोधनिबंधात रयत शिक्षण संस्थेच्या निवड झालेल्या ८ शिक्षकांत सहभाग. विज्ञान पुस्तक भिशी-एक नवीन्यपूर्ण अनुभूती या उपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. स्वतः मोबाईल ऍप बनवतो. अनेक शाळांमध्ये डिजिटल क्रांती वाढीस लागण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

बागलाण तालुक्यातील शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे उत्राणे हे माझे गाव. वडील शिक्षक होते. त्यामुळे शिक्षकी पेशाचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. वडील तसे शाळाबाह्य विद्यार्थी होते. त्यांनी त्यांच्या जीवनात खूप कष्ट केले.

घरची परिस्थिती हालाखीची होती. आजींनी काबाड कष्ट करून वडिलांचे शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षे शाळाबाह्य विद्यार्थी असूनही वडील शिक्षक झाले. १९९६ साली डीएड झाल्यानंतर त्यांनी एम.एड पूर्ण केले. आता ते केंद्रप्रमुख म्हणून बागलाण तालुक्यात कार्यरत आहेत. 
आम्ही तीन भावंडे. मी सर्वात मोठा. मी १२ वी सायन्यला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. इंजिनिअरिंगसारख्या शिक्षणाची इच्छा होती, मात्र वडिलांनी मला डीएड करण्याचा सल्ला दिला. तिन्ही मुलांचे शिक्षण वडिलांच्या पगारावर शक्य नव्हते.
दोन्ही लहान भावांचे चांगले शिक्षण व्हावे यासाठी वडिलांनी मला डीएडचा सल्ला दिला. वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी जे प्लॅनिंग केले होते ते अगदी बरोबर जुळले. एक भाऊ एम.फार्म करून परदेशात नोकरीला असतो, तर दुसराही पुण्यातील एका कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे.
पुढे मी डी.एड पूर्ण केले. माझा कोल्हापूरला नंबर लागला. घर सोडून मला जायची खूप भीती वाटायची. मग मी नंदुरबार येथे गेलो. मात्र तिथे स्थानिक आणि भाषिक लोकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे आम्ही नाकारलो गेलो. त्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेत अर्ज केला. मला कॉल आला आणि योगायोगाने मी रयतमध्ये आलो.
मी रयतमध्ये जॉईन झाल्यानंतर वडिलांना माझी चिंता नव्हती. त्यानंतर आम्ही लहान भावांचे शिक्षण पूर्ण करू शकलो. माझा दोन नंबरचा भाऊ बी.फार्मला गेला आणि पुढे तो जीपेटमध्ये पात्र ठरल्यानंतर त्याने एम.फार्म पूर्ण केले. आता तो दक्षिण आफ्रिकेत चांगल्या पदावर कार्यरत आहे. सर्वात लहान भावानेही बी.ई. पूर्ण केले. एम.बी.ए. केले. आता तो पुण्यात एका कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे.
ऍड. भगीरथ शिंदे यांच्याकडे मी संधी मागितली. वय वर्ष अवघे २१-२२ असेल. त्यांनी मला संधी दिलीही. पुढे रयत शिक्षण संस्था या सर्वात मोठ्या संस्थेत आल्यानंतर मला शिक्षकीपेशा, समाज, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन समजला. आपले बोलणे, वागणे, सहकारी शिक्षक, त्यांच्यातील चांगले-वाईट गुण यातून मी आपोआप शिकत गेलो.
अडीअडचणीतून मार्ग काढायला शिकलो. २०१३ साली मी न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे आलो. चांदोरीत येणे म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली. शैक्षणिक क्षेत्रात खूप कमी काळात मी संस्थापातळी, शासकीय पातळीवर अनेक उड्डाणे घेण्यास सुरुवात केली.
मी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना बीएस्सी तसेच बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. बी.एडला माझा नंबर लागला आहे. तेही येणार्‍या काळात पूर्ण होईल. शिक्षकांसाठी टीईटी पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली.
नवीन शिक्षक आल्यावर त्यांच्यात आणि आपल्यात कुठलीही कमी राहायला नको म्हणून मी २०१३ सालीच राज्य आणि केंद्र शासनाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालो. आजच्या सरकारी नियमानुसार मी नोकरीसाठी पात्र झालो असतो. नियमित वाचन करणे, वर्तमानपत्रात वाचकांचा पत्रव्यवहार करणे अशा मला सवयी होत्या.
पुढे रयत शिक्षण संस्थेने संगणकावर आधारित शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यात मी भरीव योगदान देण्याचे ठरवले. मुलांची आवड हेरली. त्यानुसार यूट्यूब, फेसबुक अशा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला.
संगणकाचे फारसे ज्ञान अवगत नसतानाही मी इंटरनेटवरून अनेक गोष्टी अभ्यासून स्वतःला परिपक्व बनवले. एक्सेल पॉवर पॉईंट शिकलो. पुढे शाळेचा निकाल ऑनलाईन दिला. स्वतःवर कामाची जबाबदारी वाढवून घेतली. यातून २२ सप्टेंबर २०१५ साली मी पहिला शैक्षणिक ब्लॉग सुरू केला.
डीवायडीच्या सहायक उपसंचालिका पुष्पा पाटील यांच्या हस्ते ब्लॉगचे प्रकाशन झाले. विद्यार्थ्यांना एका क्लिकवर हे ब्लॉग उपलब्ध झाले. संस्था दरवर्षी रयत विज्ञान परिषद भरवते. त्यासाठी मी एक प्रकल्प सादर केला. तो प्रकल्प या परिषदेत निवडला गेला आणि याकाळात संस्थेचे उच्चपदस्थ उत्तम आवारेंशी भेट झाली. त्यांनीही प्रोत्साहन दिले.
२०१६ साली माझ्या मनात टॅब्लेट क्लासरूमची कल्पना आली. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न केले. डिजिटल टॅब्लेट स्कूल अर्थात दप्तराच्या ओझ्याविना एक नवी आनंददायी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया यशस्वी केली.
संस्थेचा सुरू असलेला गुरुकुल या उपक्रमाचा ऍप तयार करण्याचे काम त्यांनी केले. यात त्याची माहिती, नियोजन हे एका क्लिकवर उपलब्ध करून दिले. त्यानंतर मी वर्गातील विद्यार्थी व पालक प्रबोधन करण्यासाठी पालकांचा पालक प्रेरणा मेळावा घेतला.
प्राचार्य एन. बी. लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी व पालक यांना डिजिटल क्लासरूममधील टॅब्लेटची उपयुक्तता समजावून सांगितली. देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.
वर्गातील ४४ विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ७५ टक्क्यांपर्यंत कमी करून दप्तरात टॅब्लेटचा समावेश करण्यात आला. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या हस्ते २२ सप्टेंबर २०१६ रोजी टॅब्लेटचे वितरण झाले.
चाईल्ड फ्रेंडली इंटरनेटचा वापर करण्यास सुरुवात केली. शासनाने माझ्या कार्याची दखल घेतली. आजवर अनेक शोधनिबंध राज्य स्तरावर प्रकाशित झालेत. संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला. अनेक शाळांमध्ये जाऊन डिजिटलचे धडे देत आहे.
समाजशास्त्र विषयात १२५ शोधनिबंध सादर झाले आहेत. माझ्या कार्याची दखल नियमित घेण्यात आल्यामुळे माझ्या कामाची ऊर्जा अधिकच वाढली आणि हे सगळे घडत गेले. शिक्षकासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांना सामावून घेतले आज पालकही टेक्नोसॅव्ही झाले आहेत.
(शब्दांकन : दिनेश सोनवणे )

1 COMMENT

  1. सचिन गडाख हे आभ्यासु व कामसु व्यक्तिमत्व, सुलेखनात त्यांनी नाशिकचे नाव भारतात उंचावले असुन त्यांच्या संगणक सुलेखनाला वेगळी दिशा देण्यात सचिन यांचा मोलाचा वाटा आहे. सचिन गडाख यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा
    धन्यवाद देशदूत

LEAVE A REPLY

*