नाशिक | विमा साक्षरता महत्त्वाची! – अनंत बोडके (मार्केटिंग अँण्ड फायनान्स)

0

आर्थिक संकटे सांगून येत नाहीत. अशावेळी लगोलग पैसा कुठून उभा करायचा? मुलांची शिक्षणे किती महाग झाली आहेत? मग हुशार मुलांनी पैशाअभावी शिक्षण सोडून द्यायचे का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे एलआयसी या विमा कंपनीचे विकास अधिकारी अनंत बोडके देतात.

दिंडोरीजवळच्या ढकांबे गावात माझे प्राथमिक शिक्षण झाले. सातवीनंतर पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले. अर्थशास्त्रात पदवी घेतल्यावर वित्तीय क्षेत्रात एमबीए केले. शिक्षण घेत असतानाच वित्त क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला.

एका बँकेत काहीकाळ एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी केली. २०१० साली एलआयसीमध्ये डेव्हलपेंट ऑफिसर म्हणून रुजू झालो. पहिली नेमणूक जळगावजवळच्या मुक्ताईनगरमध्ये झाली. तो ग्रामीण भाग असल्याने तिथे बचतीसाठी जागृती निर्माण करणे हे मोठे आव्हान होते. तिथे मी जवळपास पंच्याहत्तरहून अधिक सल्लागारांना प्रशिक्षण देऊन त्यांची संघटना उभी केली. तसेच गावपातळीवर विमा स्कूल व विमा ग्राम अशा संकल्पना राबवल्या. ग्रामीण भागात नोकरीची गरज असलेल्या व्यक्तींना मार्ग दाखवला. असे शंभरजण तरी असतील ज्यांचे करिअर त्यातून उभे राहिले.
एलआयसी (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले. अलीकडच्या काळात समाजात बेरोजगारी आणि असुरक्षिततेचे प्रमाण वाढलेय. त्या पार्श्‍वभूमीवर तरुणांना रोजगार देण्याचे काम एलआयसी करत आहे.
लोकांना बचतीची सवय लावणे आणि त्यातून त्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचे काम एलआयसी करते आहे.
बरेचदा खासगी वित्तीय कंपन्यांकडून काही ग्राहकांच्या लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या बातम्या वाचायला मिळतात. या पार्श्‍वभूमीवर लोक विमा कंपनीत किंवा वित्तीय कंपनीत गुंतवणूक करायला घाबरतात; पण सत्तर वर्षांच्या कारकीर्दीत एलआयसीकडून अशी एकही गोष्ट घडलेली नाही. म्हणूनच ‘विश्‍वासार्हतेचे’ दुसरे नाव ‘एलआयसी’ असे म्हटले जाते. विम्याविषयी प्रबोधन करायला गेल्यावर लोकांचा प्रतिसाद लगेच मिळत नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. त्यांना विश्‍वास द्यावा लागतो की विम्याच्या रूपात तुमचा पैसा सुरक्षित राहणार आहेच; पण तो गरजेच्या वेळी तातडीनेही मिळणार आहे.
एक अनुभव लक्षात आहे. एका व्यक्तीने वर्षभरापूर्वीच विमा उतरवला होता. पत्नी, मुलगी आणि वयस्कर आई-वडील हे सर्वस्वी त्याच्यावरच आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते. त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाची जागा कोणी भरून काढू शकत नाही; पण त्या कुटुंबाला एलआयसीकडून विम्याचे पैसे तातडीने मिळाले. इतकेच नव्हे तर एलआयसी आजही त्या कुटुंबाला पेन्शनच्या माध्यमातून आधार देत आहे.
चार वर्षे मुक्ताईनगरमध्ये काम केल्यावर नाशिकला, माझ्या शहरात बदली मागून घेतली. अनुभव असला तरी इथेही शून्यापासून सुरुवात करायची होती. आजही मी ७५ हून अधिक लोकांची टीम नव्याने उभी केली आहे.
या कामात रुळताना लक्षात आले की, शहरी आणि ग्रामीण भागात काम करणे यात फरक आहे. शहरी मुलांना वेगवेगळ्या गोष्टींची उपलब्धता सहज असते. त्यामुळे विम्यासारख्या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागतात. बरेचदा शहरी लोकांना वाटते की, आपल्याला सगळे माहीत आहे; पण प्रत्यक्षात त्यांची बचतीबाबतची माहिती अर्धवट असल्याचे लक्षात येते. शहरात कधी एखाद्याच्या नोकरी-व्यवसायावर घर अवलंबून असते. पैसा येतो-जातो. खर्च बरेच असल्याने बचतीची गरज असते. अशावेळी एलआयसीसारख्या विमा कंपनीच्या सल्ल्याचा उपयोग होतो. मुलांची शिक्षणे, उच्चशिक्षणे, लग्न, निवृत्ती, आजारपण, अपघात अशा विविध कारणांसाठी अगदी लहान बाळापासून वृद्धांसाठीच्या पॉलिसीज् एलआयसीने ‘डिझाईन’ केल्या आहेत.
सेवक, एजंट प्रत्येक आर्थिक स्थितीतल्या व्यक्तीला त्याच्या गरजा ओळखून कोणती पॉलिसी घ्यावी याचे मार्गदर्शन करतात. विमा प्रतिनिधीने चांगला अभ्यास केला तर तो ग्राहकाला चांगला पर्याय देऊ शकतो, हे अनुभवाने सांगतोय.
नाशिकपासून २५ किलोमीटर अंतरावरील विळवंडी या गावात अनेकदा गेलो. तिथे दिवसातून एकदाच बस जाते. विम्यासाठी कुणीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी तिथल्या सरपंचांच्या महाविद्यालयात शिकणार्‍या मुलाने एजन्सी घेतली. त्यानंतर त्याने पूर्ण गावाचा विमा उतरवला. आज ते गाव ‘विमा ग्राम’ आहे.
मखमलाबादजवळच्या एका गावात अंगणवाडी सेविकांना एजन्सी घेण्याचे महत्त्व सांगितले. त्या महिलांनी गावातल्या प्रत्येक घरात जाऊन विम्याचे महत्त्व पटवून दिले आणि आता ते गाव ‘विमा ग्राम’ आणि ‘विमा स्कूल’साठी ओळखले जातेय. त्यांना एलआयसीकडून एक लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.
इथे काम करणे हा एक समाधान देणारा प्रवास आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याची ही पायाभरणी आहे.एलआयसी ही वित्तीय संस्था ग्राहककेंद्री आहे. कामाचा अवाका मोठा आहे. ग्राहकाने विश्‍वासाने सोपवलेला पैसा ही आपली जबाबदारी असून त्याचे संवर्धन केले पाहिजे, या भावनेने इथला प्रत्येक कर्मचारी काम करतो.
मुंबई, गुजरात, कानपूर इथल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी एलआयसीने पुढाकार घेतला. भारतभरात तसेच परदेशात श्रीलंका, मॉरिशस, इंग्लंड इथेही आता एलआयसीने शाखा उघडल्या आहेत. तिथले भक्कम पैसा कमवणारे अनिवासी भारतीय गुंतवणुकीसाठी विश्‍वासार्ह भारतीय वित्तीय संस्था म्हणून एलआयसीला प्राधान्य देत आहेत. या चांगल्या संस्थेचा मी एक भाग आहे याचे नक्कीच समाधान वाटतेय.
(शब्दांकनः शिल्पा दातार-जोशी)
(पुढील मुलाखत : निखील कुलकर्णी )

LEAVE A REPLY

*