नाशिक | बॉस्केटबॉल क्षितीजावरील ‘आदित्य’- आदित्य अष्टेकर (क्रीडा)

0
बास्केटबॉलपटू म्हणून नावारुपाला येताना अनेक चांगल्या अनुभवाची शिदोरी मिळाली. खेळाडू म्हणून देशासाठी खेळताना सार्थ अभिमान आणि मनस्वी अनुभव येतो. तिथे तुम्ही केवळ खेळाडू असतात आणि समोर केवळ जिंकण्याचे ‘लक्ष्य‘असते. कारण देशाला तुम्ही ‘रिप्रेझेंट’ करतात. खेळाने जीवनात खिळाडू वृत्ती, शांती दिली. खेळात करिअर होेतेच त्यामुळेच नजीकच्या भविष्यात खेळ आणि शिक्षण यांची सांगड घातलेला नवा शिक्षणक्रम देण्याचा माझा मानस आहे.
माणसाने कुठल्यातरी खेळात प्राविण्य मिळवावे ही प्रेरणा आईंने दिली. बालपणी स्केटिंग खेळत असे. चौथीत असताना राज्य शासनातर्फे ‘स्पार्टस नर्सरी’ उपक्रमासाठी आमचे प्रशिक्षक राजेश क्षत्रिय सरांनी पाच फूटाहून अधिक उंचीच्या विद्यार्थ्यांना घेऊन बास्केट बॉलसाठी निवड केली. त्यामध्ये माझीही निवड झाली. तिथून खेळाडू म्हणून माझा प्रवास सुरू झाला.


आंतरशालेय पातळीवर खेळण्यापूर्वी दोन वर्ष यशवंत व्यायाम शाळेतील क्रीडांगणावर सराव करु लागलो. सहावीत असताना पहिल्यांदा जिल्हा पातळीवरील स्पर्धेत उतरलो. नंतर विभागीय पातळीपार करुन राज्यस्तरीय स्पर्धेत उतरलोे आणि दारुण पराभवाला समोरे गेलो. सामना हरलो मात्र उमेद, जिद्द कामय होती. पूढे क्षत्रिय सरांच्या मार्गदर्शनात प्रचंड सराव करुन नंतरची पाच वर्ष सलग राज्यस्तरावरील स्पर्धेत उज्वल यश मिळवत पदकांची लयलूट केली.

दरम्यान, महाराष्ट्राकडून खेळत मी राज्याचे प्रतिनिधीत्व केले. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर  प्रतिनिधित्व करण्याची संधी चालत आली. त्यावेळी बारावीत होतो. सराव पूर्ण बंंद आणि देशाचे विश्‍वात प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धेपूर्वी दीड महिन्याचे सराव शिबीर होते. त्याच वेळी माझी परीक्षा होती. एकीकडे करिअर आणि दुसरीकडे क्रीडाप्रेम. त्यावेळी वडिल आणि आमचे कोच यांच्या सल्ल्यानुसार बारावीची परीक्षा न देता थेट दिल्लीला रवाना झालो. बारावीचे वषर्र् गेले परंतु देशासाठी खेळता आले याचे समाधान अधिक होते. हा सर्व प्रवास अत्यत खडतर होता. मात्र ज्या दिवशी देशासाठी खेळण्याचे भाग्य मला लाभले तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही.
विदेशात भारतीय चमूमध्ये खेळाडू म्हणून खेळणार होतो त्या दिवशी आमच्या ब्लेझरवर भारतीय तिरंगा लावण्यात आला. जेव्हा बास्केटबॉल स्टेडियमकडे जाऊ लागलो तेव्हा तिथे खेळाडूंना दिला जाणारा सन्मान शब्दांच्या पलिकडचा होता. त्या देशांमध्ये खेळाडूंचा मान, सन्मान अधिक असतो. विदेशातील काही देशांमध्ये जेव्हा आमची कार रस्त्यावरुन धावत होती तेव्हा भारतीय खेळाडू म्हणून अत्यंत सन्मानाची वागणूक दिली गेली. आणि अंतिमत: जेव्हा खेळण्यासाठी उतरलो स्पर्धक टिममधील खेळाडूंचे हस्तांदोलन केले आणि राष्ट्रगीत सुरू झाले. त्यावेळी अक्षरश: अंगावर रोमांच उभा राहिला.
आजवर मला माझ्यातील कधीही न जाणवलेले राष्ट्रप्रेम त्यादिवशी मी अनुभवत होतो. राष्ट्रगीत सुरु असताना सर्वजण उभे राहून मानवंदना देतात तो अनुभव शब्दातीत आहे. देशाचे प्रतिनिधीत्व करताना एक खेळाडू म्हणून मला अत्यंत चांगले अनुभव आले. बास्केटबॉल हा खूप ‘रफ’ खेळ आहे. यामध्ये स्पर्धक टिमच्या बास्केटमध्ये गोल करताना अत्यंत चपळाईने, दक्ष राहत अत्यंत सावध राहून विद्युतगतीच्या हालचाली अपेक्षीत असतात.
खेळताना अपघाताचा धोकाही असतो. ‘लिगामेंट’ फाटणे, हातापायाची हाडे मोडणे असे प्रकार होण्याचा धोका अधिक असतो. या आव्हानांवर मात करुन एक खेळाडू म्हणून तुमचे कसब दाखवत उत्कृष्ट ‘कामगिरी’ने संघाला जिंकून देणे म्हणजे दिव्य काम. आणि खेळताना एखाद्या अपघात जखमी होतात तेव्हा तुम्ही खेळूच शकत नाही ही बाब अत्यंत वेदनादायी असते. एका खेळाडूला केवळ इजा झाल्यामुळे क्रीडांगणाबाहेर महिनोन महिने राहवे लागते त्यावेळी होणारे डिप्रेशन मीही अनुभवले आहे. बास्केटबॉल संघाचा कप्तान म्हणून काम करणे वेगळा आनंद देऊन गेले. आजवर १५ हून अधिक वैयक्तिक आणि  सांघिक  पदके मला मिळाली आहेत.
परदेशातील खेळाडू कसे खेळतात. कुठल्या चुका होता कामा नये, यासह इतर काही बारकावे मला विदेशातील मॅचेसमध्ये खेळताना शिकायला मिळत गेले. खेळाडूंसाठी मानसशास्त्र ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सामना पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करुन तुम्हाला खेळात एकाग्र होत कामगिरी करायची असते अशा वेळी मनाची शक्ती अत्यंत कामाला येते. त्यासाठी क्रीडा मानसतज्ञांचा सल्ला प्रत्यक्षात अवलंबून तुम्ही एकाग्रता वाढवावी लागते.
मी प्रत्येक खेळाच्या आधी मी संगीत ऐकून स्वत:ला शांत स्थिर आणि एकाग्र करुनच मग मैदानात उतरतो. अशा सर्व गोष्टी शिकत मलेशिया आणि आस्टे्रलिया या देशात जाऊन मी भारतीय चमूमध्ये खेळालो. दरम्यान, एक खेळाडू म्हणून जेव्हा क्रीडा प्रकाराने मला काय दिले हे मागे वळून पाहतो तेव्हा बास्केटबॉलने मला जगण्याची लढाई लढण्याचे बळ दिले असे जाणवते.
या खेळाने मी अधिकच शांत झालो आहे. हारजित पचवत सर्व गोष्टी खेळकरपणे पचवण्याचे शिकलो. आज मला आयुष्यात येणारी संकटे, समस्या खूप छोट्या वाटतात. हे केवळ खेळामुळेच.
नााशिकमध्ये एकदा आर्टीलरी सेंटरमध्ये मला पाहुणे म्हणून बोलवले तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. अवघ्या विशीत मला आणि माझ्या वडिलांना त्या लष्करी अधिकार्‍यांनी आणि एकूणच तेथील सर्वांनी एक खेळाडू म्हणून दिलेला सन्मान मला आजही सुखावतो.
खेळातून अर्जित केलेले कौशल्य इतरांना शिकवण्याचा माझा मानस आहे. सध्या काही शाळांंचा कोच म्हणूनही मार्गदर्शनही करतोय. व्यायाम करणे, पहाटे जॉगिंग करणे माझा नित्यक्रम आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहते. नजीकच्या भविष्यात नाशिककरांना खेळ आणि शिक्षण यांची सांगड घालतलेला एक नवा शिक्षणक्रम पाहायला मिळेल. त्यावर काम सुरु आहे.

 

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

(पुढील मुलाखत  : प्रसाद खैरनार)

LEAVE A REPLY

*