Video : नाशिक | गौरी औरंगाबादकर : कथक नृत्यातून अध्यात्मानुभूती.

(नृत्य - कला आणि संस्कृती )

0

नुष्यातील भावना, विचार, कल्पनांना अभिव्यक्त करण्यासाठी कलेइतके दुसरे सशक्त माध्यम नाही. माझ्या कला प्रवासात गुरूंचे महत्त्व मोठे आहे. कथक नर्तन हीदेखील अध्यात्मानुभूती देणारी गोष्ट आहे. यातून आकाश कवेत घेण्यासाठी मी सज्ज आहे. कलेतून अभिव्यक्ती होण्यासाठी आता माझ्यासाठी ‘स्काय इज लिमिट’.

बालपणी एखाद्या कलेची सुरुवात एक छंद म्हणून होते. माझ्या बाबतीत कथक नृत्य छंद म्हणून आले, नंतर त्याचे अभ्यास अन् मग ध्यासात रूपांतर कधी झाले, मलाच कळाले नाही. मी मुळची बेळगावची. तिथल्या मातीलाच कलेचा गंध आहे. आसावरी भोकरे यांच्याकडे कथकचे प्राथमिक शिक्षण घेतले. नृत्यातील गती आणि आवड पाहून त्यांनी ‘सीसीआरटी’ची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले अन् अवघ्या १२ व्या वर्षी मला शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

नृत्यसाधना करण्यापेक्षा मोठ्या शहरातील गुरूकडे शास्त्रोक्त धडे गिरव. तुझे उत्तम करिअर होईल, असे आसावरीताईंनी सांगितलेे. म्हणून माझे आई-वडिलांनी बेळगावहून पुण्याला घर केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नृत्यांंगना शमाताई भाटे यांच्याकडे मी धडे गिरवायला सुरुवात केली. तिथेच माझा कथक नृत्याला परिसस्पर्श मिळाला.गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत, पुणे विद्यापीठातून कथक मधून एम.ए. पूर्ण केले आणि नर्तनालाच करिअर म्हणून निवडले.

शमाताईं म्हणजे कथक नृत्यातील सुंंदर लयकारी आणि सुरेख पद्न्यास असे समीकरणच. हेच गुण आपल्या शिष्यात येण्यासाठी आणि त्यांना स्टेज मिळवून देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्याच्याच बंदिशीवर शमाताईंनी कलात्मक स्वातंत्र घेऊन सर्जनशील नृत्य बसवले आणि ते सादर करण्याचे भाग्य मला मिळाले. हा आनंद शब्दातीत होता.
दिल्लीतील कथक महोत्सव, मुंबई काळाघोडा फेस्टिव्हल, नाशिकमध्ये संस्कार भारती यासह ऑस्ट्रियामध्ये ‘पीड पराये जानी रे’ हा कस्तुुरबा गांधी आणि ‘वेस्टर्न क्लासिकल’ अशा ‘फ्यूजन’ हंगामात सादर होणार्‍या नृत्यसंचात नृत्य करण्याची मिळालेली संधी म्हणजे यातील कळसाध्यायच! पाश्‍चिमात्य संगीत,कथक आणि कस्तुरबा गांधी अशी संकल्पनाच सर्वाथाने अभिनव होती. असे अनुभवही जाणिवा समृद्ध करणारे होते.

कथकमध्ये संकल्पनेवर आधारित नृत्य असतेच. कृष्ण त्यात महत्त्वपूर्णच परंतु त्या व्यतिरिक्त शमाताईंनीमुळे नव्या संकल्पनांवर नृत्यप्र्रयोग करायला मिळाले. फ्रेंच माहितीपट ‘अंडरवॉटर’वर बेतलेले ‘नि:शब्द भेद’ या पाण्याखालील कथक नृत्याचा अनुभवही विलक्षण शिकवून गेला. नर्तकी म्हणून यातूनही जाणिवा सशक्त झाल्या.

पायात नूपुर न बांधता लयताला धरून घुंगरुविरहित नृत्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली. नर्तन प्रवासात काही अनपेक्षित सुखद धक्के मिळाले. नादरूप नृत्यसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘कथक इन्फिनिट’ नावाच्या कार्यक्रमात १०० नर्तकींसोबत मी नृत्य केले. त्यादरम्यान अगदी अनपेक्षितपणे माझ्या गुरू शमाताईंच्या हस्ते मिळालेला पुरस्कार संस्मरणीय ठरला.

प्रत्येक सादरीकरणात एक क्षण असा असतो, तिथे कलाकार देहभान विसरतो. ‘मुरलीगती’ नृत्यात मी अशीच अवस्था अनुभवते. जोपर्यंत आपल्या शिष्याकडून कला सादरीकरणातून पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत त्या शिष्याला रंगमंचावर आणत नाही, असा शमाताईंचा शिरस्ता आहे. त्यामुळे मी परिपूर्णतेचा ध्यास घेत गेले. गुरूचा आशीर्वाद शिष्यांसाठी मोठी देणगीच. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा ‘ब्लेस’ असतोच. आजही पुण्याहून शमाताई मला नृत्य साधनेत अनमोल मार्गदर्शन करत आहेत.

नाशिकमध्ये कलेला अत्यंत पोषक वातावरण आहे. येथील रसिकांसाठी कविता, कथक आणि नायिकांवर आधारित रचना, संगीत, कविता, नृत्य या कार्यक्रमावर मी काम करत आहे; ही सर्जनशील रचना लवकरच मूर्तरूपात येईल. एक कलाकार म्हणून, केवळ शास्त्रीय नृत्यच नव्हे, तर नृत्याच्या विविध संधी, आव्हाने स्वीकारून त्याचे सोने करण्यासाठी मी सदैव तयार असते.

आपल्यामधील भावना, विचार अभिव्यक्त करण्यासाठी कलेइतके दुसरे सशक्त माध्यम नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे कलाक्षितिज रुंदावले. कलाकारांनाही शिकण्यासाठी ऑनलाईन संधी मिळत आहेत. नूपुरांचा झंकार, मुद्रा, पदन्यास, डोळ्यांसह कायिक भाव आणि त्यातून अभिव्यक्ती ही माझ्या जगण्याचा अविभाज्य अंग आहे. कलेशिवाय जगणे ही कल्पनाच करू शकत नाही.

सकस संगीत ऐकणे, हा माझा आवडता छंद आहे. गृह सजावटीतूनही मी आनंद शोधते. बोधप्रद इंग्रजी चित्रपट पाहणे मला आवडतात. कलाकारांना अहंकार नसावा; काळानुरुप कलाकाराने स्वत:मध्ये बदल करावा, हा संदेश देणारा ‘द आर्टिस्ट’ चित्रपटाची मी कैक वेळा पारायणे केली.
माझ्या नर्तन प्रवासात आईबाबांचे मोठे योगदान आहे. त्यांनी माझ्यातील नृत्याचे गुण हेरले आणि कुटुंब पुण्याला हलवले.

विवाहानंतर माझ्या सासरीही नृत्याला अधिक प्रोत्साहन आणि पोषक वातावरण मिळत आहे. पती डॉ. अनय औरंगाबादकर माझ्या नृत्याला सदैव प्रोत्साहन देत आहेत. आनंद चाबुकस्वार यांनी कलेसोबत जीवन कसे जगावे याची शिदोरी दिली. तीही विसरता येणे नाही. आपल्या लोकांचे असे प्रेम मिळते, यासाठी कुठली पुण्याई कामी येत आहे मला माहीत नाही.

कथक नर्तकी म्हणून करिअर घडवणे ही गोष्ट सोपी नव्हती. गुरूचे संपूर्ण समाधान होईपर्यंत तपस्या करावी लागते आणि शिष्याच्या कामगिरीवर गुरू कधीच समाधानी होत नसतो. शमाताईंकडे शिष्यत्व आणि त्यांचा नृत्य संस्कारात तावून सुलाखून बाहेर पडताना, मी किती आणि काय मिळवले याचा विचार करते; तेव्हा कृतकृत्य होते. शमाताईंसारख्या गुरू, कन्येमधील नृत्याचा प्राजक्त फुलवण्यासाठी शहर स्थलांतरित करणारे आई-वडील आणि सतत प्रोत्साहन देणारे पती मला लाभलेत. याहून दुसरे भाग्य नाही.

अध्यात्मासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साधनाही करते. कलेचा वारसा इतरांंनाही देता यावा, यासाठी नृत्य शिकवण्याचे क्लास सुरू केले आहेत. शिष्यांना घडवताना मनस्वी आनंद मिळतो. कलेच्या आकाशात संचार करण्यासाठी मी सज्ज आहे. स्काय ईज लिमीट..!

( शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील मुलाखत : रूपाली गायखे (अभिनय) 

 

LEAVE A REPLY

*