Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषद नूतन इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही : भुजबळ

जिल्हा परिषद नूतन इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही : भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यामुळेच जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न सोडवण्याचेे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आले. यातून जिल्हास्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवले जाऊ लागले. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषद महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. जिल्ह्याच्या कोणत्याच विकासाला निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल येथे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. यावेळी माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खा. हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आ. दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, सुहास कांदे, सरोज अहिरे, किशोर दराडे, हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, उदय सांगळे आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीतून नाशिक जिल्ह्यात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दीड लाख खातेधारकांना होणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले, मात्र प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या कर्जमाफीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच शिवभोजन थाळीचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सुरू करण्यात आला असून तो यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

खा. राऊत म्हणाले, कष्टकरी, सामान्यांंची ही इमारत आहे, जि. प.ची इमारत ठरलेल्या बजेटमध्ये वर्षभरात उभी राहील. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. तसेच नाशिकच्या विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री ठाकरेंना नाशिकमध्ये आणण्याची जबाबदारी भुजबळ यांची राहील. सरकार कोणाचे हे महत्त्वाचे नसून त्यांच्या योजना महत्त्वाच्या असतात. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.

आमदार भुसे म्हणाले, जवळपास ४५ कोटींचा हा प्रकल्प उभा राहत आहे. या विभागासाठी भुजबळ यांच्यासारखे मंत्री लाभल्याने वर्षाच्या काळात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जुन्या इमारत परिसरात पार्किंगसह वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सर्व सुविधांयुक्त नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्यात येत आहे. यापुढील काळात पुढील टप्प्यासाठीदेखील निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केली. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी नवीन इमारतीचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली.

प्रास्ताविक मुख्याधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले. कार्यक्रमास विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ. नरेश गिते, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी आमदार निर्मला गावित, अनिल कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, अ‍ॅड. रवींद्र पगार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, संपतराव सकाळे, जि. प. उपाध्यक्ष नयना गावित, सभापती यतींद्र पगार, अर्पणा खोसकर, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, उदय जाधव, बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, दीपक शिरसाठ, संजय बनकर आदी उपस्थित होते.

एकमेकांची प्रशंसा
महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांचा ‘मराठा’ वृत्तपत्राने महत्त्वाची भूमिका बजावली तसेच महाविकास आघाडीचे सरकार उभे करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचा ‘सामना’ यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले. विकासकामांसाठी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. यासाठी नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विकासासाठी भुजबळांचे मार्गदर्शन घ्यावे. देशाच्या राजधानीत भुजबळ यांनी बांधलेले महाराष्ट्र सदन हे इतर सदनांपैकी अधिक उठून दिसते. असे काम करणारे भुजबळ हे एकमेव नेते असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

विकासाच्या आड नाही
जिल्ह्यात विकासाची अनेक काम २०१४ पूर्वी केली आहेत. तशीच कामे पुढील काळातही सुरू राहतील. त्यामुळे कुठल्याही विकासकामांना माझा विरोध राहणार नाही. तज्ज्ञांची मदत घेऊन प्रकल्प व योजना राबवल्या गेल्या पाहिजे. कारण नागपूरची मेट्रो जाम झाली. मुंबईची मेनोरेल फसली. त्यामुळे नाशिकचा विकास करताना नाशिकचे सौंदर्य, नाशिकचे नाशिकपण टिकले पाहिजे यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकास करणार, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

भुजबळांची अधिकार्‍यांना टोलेबाजी
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. यात पदाधिकार्‍यांनी भुवनेश्वरी एस. यांची बदली करण्याची मागणी केली आहे. यावर भुजबळ यांनी भाषणादरम्यान अधिकार्‍यांवर चांगलीच टोलेबाजी केली. सर्वसामान्य लोकांची कामे करताना अधिकार्‍यांनी कोणतेही काम आपल्याकडे लोकप्रतिनिधी वा नागरिक घेऊन आले तर हो म्हणायला शिका. शेतकर्‍यांना नुकसानीपोटी साडेसहाशे कोटी रुपये मागील सरकारने जिल्ह्यासाठी दिले. मात्र याचे पूर्णत: वाटप झालेले नाही. याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लक्ष देणे गरजेचे होते, अशी ऐकणूकही त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या