Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयुवकांनी क्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासाव्यात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

युवकांनी क्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासाव्यात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न ;  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गो गर्ल गो ‘योजनेचा शुभारंभ.

मुंबई,| प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील चांगल्या प्रथा परंपरा जोपासून राज्याला वैभवाचे दिवस आणण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम घ्यावेत. शासन खेळांना प्रोत्साहन देत आहे. यापुढेही देणार असून युवकांनी परिश्रम करुन अधिकाधिक पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ वितरण सोहळ्या प्रसंगी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नेहमी विजय प्राप्त करीत. या विजयामध्ये त्यांचे सूत्र होते की, धनसंपत्ती पेक्षा जनसंपत्ती जोपासणे महत्वाचे आहे. युवकांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मातीतील खेळाकडे वळले पाहिजे. स्वत:चे आरोग्य चांगले ठेवून आपल्या राज्याच्या कल्याणासाठी जे- जे चांगले करता येईल ते केले पाहिजे असे ते म्हणाले.

पुरस्कार हे मिळत नाहीत तर कठोर परिश्रमाने मिळवावे लागतात. राज्यातील खेळाडूंनी अटकेपार झेंडा फडकवून खेलो इंडिया खेलो या स्पर्धेत राज्याला देशात अव्वल स्थान मिळवून दिले. यामुळे या खेळाडूंचा भव्यदिव्य गौरव करणे हे राज्याचे कर्तव्य होते. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळाडूंना प्रोत्साहन देवून त्यांच्यात स्पर्धेसाठी उर्जा निर्माण केली जाते. सध्या युवा पिढी समाज माध्यमात गुरफटत चालली आहे. यासाठी मैदानी खेळांना प्राध्यान्य देवून राज्यातील युवकांना शारिरीक आणि मानसिक दृष्टया मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

‘गो गर्ल गो ‘या अभिनव योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींची शारिरीक तंदुरुस्त राखण्यासाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठया संख्येने भाग घेण्यासाठी १ कोटी ४ लाख मुलींना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन आयोजकांद्वारे करण्यात येणार आहे. मुलींना क्रीडा सह सर्व क्षेत्रात यशस्वीतेसाठी गो गर्ल गो योजना यशस्वी ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पंढरीनाथ पठारे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनिल केदार, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार संजय राऊत, आमदार राहुल नार्वेकर, चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी, क्रीडा विभागाचे आयुक्त्‍ा ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मंत्री सुनील केदार यांनी प्रास्ताविक केले. खेळामुळे जातीभेद, लिंग भेद मिटून जातात. खेळ आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. अभ्यासातील एकाग्रता वाढवतात यासाठी युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच खेळातही प्रावीण्य मिळवावे. महाराष्ट्र राज्याचे प्रगतीचे स्वप्न साकार करण्याची क्षमता युवकांमध्ये आहे. आपली शारिरीक, बौध्दिक, मानसिक प्रगती केली तरच राज्य देश प्रगती करेल. युवकांनी अधिकाधिक खेळात सहभागी व्हावे. शासन खेळाला प्राधान्य देत आहे. जगातील प्रत्येक विकसित देश हा क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करत आहे. आपणही त्यांचे अनुकरण करुन प्रगती करुया, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात विविध सांस्कतिक कार्यक्रमाने झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार्थींना आणि खेलो इंडिया खेलो स्पर्धेतील खेळाडूंना पुरस्कार देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या