थोड्याच दिवसात ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल

जनता महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात डॉ. खरात यांचे प्रतिपादन

0
येवला | प्रतिनिधी पर्यावरण प्रदूषण आणि निसर्गाच्या असमतोलाला ही वाढती लोकसंख्या जबाबदार असून पूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी आपल्याला पाणी विकत घ्यायला लागेल असे कोणी सांगितले तर लोक त्याला वेड्यात काढायचे. पण आज आपल्याला पाणी विकत घ्यावे लागते आहे. हे वास्तव आहे.

ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली, शहरीकरण असेच वाढत राहिले, पर्यावरणाचा र्‍हास असाच होत राहिला. तर आपल्याला ऑक्सिजनही लवकरच विकत घ्यावा लागेल, असे प्रतिपादन डॉ. जी. डी. खरात यांनी केले.

शहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. खरात बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.

डॉ. खरात यांनी लोकसंख्या दिन साजरा केला जाण्या मागची कारणमीमांसा स्पष्ट केली. १९८९ पासून जागतिक स्तरावर लोकसंख्या दिन साजरा केला जात असून यावर्षीची लोकसंख्या दिनाची थीम सुरक्षित मातृत्व आहे. एकीकडे लोकसंख्येला मनुष्यबळ म्हणून पाहिले जाते तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या ही चिंतेचा विषय ठरते आहे.

कारण लोकसंख्या ही संपत्ती आहे की संपत्तीचा व्यय आहे, ही बाब लोकसंख्येच्या गुणवत्तेवर ठरत असते. असेही ते म्हणाले. आज आपल्याकडे लोकसंख्या अधिक आहे पण त्या मानाने उपलब्ध साधन संपत्ती कमी आहे.

त्यामुळे प्राथमिक गरजाही जिथे पूर्ण होऊ शकत नाही तिथे अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊनही हाताला काम मिळू शकत नाही, हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे असे ते म्हणाले. वाढत्या लोकसंख्येबरोबरच व्यस्त लिंग गुणोत्तर हे देखील चिंतेचे कारण असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, आज जगाच्या आठशे कोटी लोकसंख्येपैकी एकट्या भारताची लोकसंख्या एकशे बत्तीस कोटी असल्याचे सांगून ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद केले.

वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणावर वाढणारे शहरीकरण, बेरोजगारी, गुन्हेगारी, भूक, उपासमार, गरीबी, आरोग्य या समस्या वाढल्या आहेत. आज मुंबईची जी स्थिती झालेली आहे त्याला कारण तेथील वाढलेली लोकसंख्या हे असून उपलब्ध नियोजन कमी पडते आहे असे ते म्हणाले.

आता यापुढे ‘हम दो हमारा एक’ अशी योजना राबवावी लागेल कारण वाढत्या लोकसंख्येला पुरेशा ठरतील, उच्च जीवनमान देऊ शकतील अशा सोयी सुविधा आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डी. व्ही. सोनवणे यांनी केले. आभार प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले. विचारमंचावर प्रा. सी. एन. हिरे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*