यात्रोत्सवातून मैत्री, नात्यांना उजाळा; मित्रांसाठी पर्वणीच, सामाजिक सलोखा जपणारा उत्सव

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । दिनेश सोनवणे

सध्या नाशिक जिल्ह्यात यात्रोत्सवांचा माहोल आहे. नोकरीनिमित्त अनेक जण स्थलांतरीत झाले आहेत. मात्र गावातल्या यात्रेनिमित्त अनेक जण गावात हजेरी लावतात. यानिमित्ताने जुन्या मित्रमंडळींशी हितगुज तर होतेच शिवाय पंचक्रोशीतील नातलगांशीही भेटीगाठी होतात. त्यामुळे दिवाळी, आखाजीपेक्षा गावाकडे येणार्‍यांची संख्या यात्रोत्सव काळात लक्षणीय दिसून येते.

आपल्या गावाची ओळख असलेल्या आपल्या गावातील ग्रामदेवता, गावाला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा असतो. गावातील यात्रोत्सव वार्षिक सण-उत्सवातील एक सण मानला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात यात्रोत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामविकास, नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देणे, जनसंपर्क वाढवणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो.

जिल्ह्यात बागलाण तालुक्यातील देवमामलेदार यात्रा, भाक्षी, ओझर, चंदनपुरी आणि खंडोबा टेकडी येथील खंडेराव महाराजांची यात्रा, श्रीक्षेत्र नस्तनपूर, कोटमगाव, रेणुका माता यांच्यासह जवळपास सर्वच खेडेगावांत वर्षातून एकदा यात्रा भरते.

बर्‍याच ठिकाणी यात्रांमध्ये तमाशा, कुस्तींचा फड रंगतो. अलीकडे तमाशांना आधीसारखे व्यासपीठ मिळत नाही. अनेक ठिकाणी अन्नदान केले जाते. ग्रामदेवतेच्या नावाने ग्रामस्थांना निमंत्रित करून त्यांना प्रसाद म्हणून अन्नदान केले जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आजही दिसून येते.

बागलाण तालुक्यातील देवमामलेदारांची जत्रा यातीलच एक भाग आहे. या यात्रेपूर्वी दिवाळी असते. अनेक जण दिवाळीला कमी आणि यात्रोत्सव काळात उरल्यासुरल्या सर्वच सुट्या घेऊन पहिल्या दिवसापासून हजरी लावतात. पंचक्रोशीतील सर्वाधिक काळ चालत असलेला हा यात्रोत्सव असतो. त्यामुळे येथील प्रत्येकालाच यात्रोत्सवाचे वेध लागतात.

सकाळी तालुक्याच्या तहसीलदारांच्या हस्ते पूजा पार पडते. मामलेदारांची रथ मिरवणूक काढून यात्रेचा शुभारंभ होतो. सायंकाळी रथयात्रेला सुरुवात होते. रथयात्रेला सर्वधर्मिय भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. रस्त्यावर सडा-रांगोळी काढली जाते. अनेक घरांवर गुढ्याही उभारल्या जातात. यात्रोत्सव प्रत्येक घरातला महत्त्वाचा सण असतो. रथयात्रेला बरीच आस्थापने बंद ठेवून आपल्या ग्रामदेवतेसाठी हा दिवस असे मानत अनेक जण या ठिकाणी मदतकार्यदेखील करतात.

अशी आहे आख्यायिका
१८७०-७१ मध्ये बागलाण भागात भीषण दुष्काळ पडला होता. महाराजांनी जनतेसाठी सरकारी खजिना वाटून दिला. घरातील सर्व दागिने, पैसा, धनधान्यही त्यांनी वाटून दिले. सटाणा येथेच वयाच्या ५८ व्या वर्षी १८७५ मध्ये मामलेदारपदी असताना ते सेवानिवृत्त झाले. महाराजांनी लोकांमध्ये अस्मिता जागृत करून जनतेला स्थैर्य दिले. जीवन जगण्याची दिशा दिली. तेव्हापासून मामलेदार खर्‍या अर्थाने देव झाले. बागलाणवासियांनी त्यांचे आरमतटावर भव्य मंदिर उभारले आहे. दरवर्षी डिसेंबरअखेरीस श्री यशवंतराव महाराज देवमामलेदार यांचा पुण्यतिथी उत्सव पार पडतो. जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून सटाण्याची यात्रा प्रसिद्ध आहे.

जुन्या आठवणींना उजाळा
तालुक्याच्या ठिकाणी शाळेला येत असल्यामुळे आमचे शहरातील मित्र अधिक आहेत. शहरातले अनेक मित्र नोकरीनिमित्त बाहेर शहरात स्थायीक झाले आहेत. मात्र यात्रोत्सवासाठी दरवर्षी आठवणीने नियोजन करून आम्ही सर्वजण भेटतो. एक दिवस मित्रांसाठी वेळात वेळ काढून जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही भेटतो.
योगेश पगार, सटाणा

मित्रांसाठी यात्रा म्हणजे पर्वणीच
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. अनेक वर्षे सोबत राहिलेलो आम्ही पूर्णपणे विखुरले गेलो. मात्र वर्षातील किमान एक दिवस देवमामलेदारांच्या यात्रेला आपण भेटायचे असे ठरवले. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही मित्र नियमित भेटतो. आमच्यासाठी ही पर्वणीच असते.
भूषण थोरात, ब्राह्मणगाव

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *