Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जागतिक पर्यटन दिन विशेष : रोमहर्षक साहसी पर्यटन

Share

नाशिक | प्रतिनिधी

साहसीपणा हा मानवाचा स्थायी भाव आहे. त्याचे अप्रूप आणि आकर्षण मनुष्याला पहिल्यापासूनच आहे. दोरी लावून कडे चढणे किंवा उतरणे, कोसळणार्‍या शुभ्र धबधब्याच्या साथीने खाली येणे, उंचावरून उडी मारणे पक्ष्यांप्रमाणे गगनात विहार करणे किंवा कधी जलचर होऊन पाण्याखालील सृष्टी पाहणे या अशक्य वाटणार्‍या गोष्टींवर विजय मिळवून तो थरार मानवाने विविध मार्गाने विकसित केला. मानवाच्या या नैसर्गिक उर्मीला सुरक्षिततेचे कोंदण देऊन त्याद्वारे पर्यटकांना आकर्षित करणारे साहसी पर्यटन हल्ली जोर धरतेय. साहसाची खुमखुमी मिटण्यासाठी तरुणाईसाठी अशी पर्यटनस्थळे म्हणजे पर्वणीच. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ म्हणत या गोष्टी एकदा तरी अनुभवयाला पाहिजे, अशी आजच्या पिढीची मानसिकता आहे. काय असते साहसी पर्यटन? कुठे आहेत अशी ठिकाणे? साहसी पर्यटनासाठी काय काळजी घ्यावी, यावर प्रकाश टाकणारा लेख..

आठवडाभर काम करून शनिवार-रविवार किंवा त्यांना जोडून मिळालेली एखादी सुटी म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच. जितका वेळ हाताशी असेल त्याप्रमाणे ठिकाणे ठरतात. जाण्या-येण्याच्या वेळेची गणिते मांडली जातात. जेवणाची सोय काय? मुक्‍काम देवळात, गुहेत की एखाद्या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये.! सोबत काय काय घ्यायचे हे सारे ठरवण्यासाठी ताबडतोब सामाजिक माध्यमांवर एक ग्रुप स्थापन होतो. स्वतःची कार, मोटारसायकल किंवा अगदी सायकलवरही जायचा प्लॅन ठरू शकतो. अर्थात पट्टीतल्या भटक्या एखाद्या ट्रक-टेम्पोच्या मागच्या हौदात बसूनही आनंदाने प्रवास करत इच्छित स्थळी पोहोचतो. हे झाले हौशी साहसी पर्यटक आणि गिर्‍हारोहकांचे. याचेच सुनियोजित विस्तारीत स्वरूप पर्यटन कंपन्या साहसी पर्यटकांना सुनियोजित पॅकेजमधून देत असतात.

आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यात पर्यटनातून थोडा निवांतपणा मिळतो अन् ताणतणावाचे व्यवस्थापनही होते. पर्यटन म्हणजे माणसाला मिळालेला नवा अनुभव, निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी जी आपल्याला ऊर्जा देते. पर्यटनाचा हा ट्रेंड अलीकडे वाढतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. याच पर्यटनाचे पुढचे पाऊल म्हणजे साहसी पर्यटन. यातही अनेक प्रकार आहेत. साहसी पर्यटनाला जाताना मात्र अधिकच काळजी घेतली पाहिजे. आपला अतिउत्साह स्वतःसह आपल्या बरोबरच्या सगळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो. प्रसंगी जीवघेणाही ठरू शकतो. थोडक्यात साहसी पर्यटन म्हणजे पोरखेळ नव्हे, हे ध्यानात घ्यायला हवे.

आपल्या प्रकृतीचा स्वभाव जाणून घेऊन मगच सुरुवात करावी. उच्च-नीच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, उंचीची भीती वाटणे, फेफरे (मिरगी), दातखीळ बसणे या किंवा यासारख्या व्याधी असलेल्यांनी आणि अगदी वरीलपैकी कोणतीही व्याधी नसली पण पहिल्यांदाच कुठल्यातरी साहसी पर्यटनाला जाणार असाल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांशी मनमोकळी चर्चा करून त्यांचा सल्ला, मार्गदर्शन अवश्य घ्यावे. साहसी पर्यटन म्हणजे सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन थरार अनुभवणे. उदाहरणार्थ रॅपलिंग-हा एक लोकप्रिय साहसी प्रकार आहे.

यात एखाद्या डोंगराच्या कड्यावरून दोरीच्या सहाय्याने वरून खाली उतरतात. यातील दोरी विशिष्ट प्रकारची असते. ही ‘रोप’ अर्थात मजबूतच असते. हातात मोजे अन् डोक्यावर शिरस्त्राण आणि वर-खाली सहज करता येणारे हूक यावर व्यक्तीने नियंत्रण करून प्रसंगी कड्याला पाय लावून जम्प करत खाली उतरायचे असते. यावेळी गुरुत्वाकर्षण आपले काम करत असते. त्यामुळे प्रत्यक्षात त्या व्यक्तीला तितकेसे श्रम पडत नाहीत. उंच कड्यावरून लोंबकळत खाली उतरण्याचा आनंद काय असतो हे जाणण्यासाठी रॅपलिंग करायला हवे.

वॉटरफॉल रॅपलिंग – हा रॅपलिंगसारखाच प्रकार असतो, मात्र आपल्या सोबत असतो तो कोसळणारा एखादा धबधबा. प्रचंड वेगाने कोसळणार्‍या या पाण्याच्या आवर्ताबरोबर खाली उतरणे हा अद्भूत अनुभव मिळवायचा असेल तर एकदा वॉटरफॉल रॅपलिंग करूनच पाहायला हवा. हौशी गिर्यारोहण करणार्‍यांनी गेल्याच महिन्यात पालघरमधील केळवे धरणाच्या परिसरात सुपधरा धबधब्याजवळ वॉटर रॅपलिंगचा थरार अनुभवला.

क्लायबिंग – हा रॅपलिंगच्या अगदी उलटा प्रकार आहे. म्हणजे डोंगराचा उंच उभा कडा किंवा सहज चढता न येणार्‍या भागावर दोरीच्या मदतीने चढाई करणे म्हणजे क्लायबिंग. यात मात्र माणसाच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. कंबरेला बांधलेली दोरी आपल्याला खाली पडू देत नाही पण कडेकपारीतील फटी शोधून त्यात आपल्या हातापायांची बोटे रोवून स्वतःला वरच्या दिशेने आरोहण करणे एक दिव्यच असते. हातापायांच्या स्नायूंवर येणारा ताण झेपण्याइतपत किमान व्यायामाची सवय असेल तरच क्लायबिंग करावे.

व्हॅली क्रॉसिंग – समोरासमोर असलेल्या डोंगरकड्यांना आडव्या बांधलेल्या दोरीला लटकून मधली दरी ओलांडायची म्हणजे व्हॅली क्रॉसिंग, हाही अनुभव एकदा घ्यायला हवा.

पॅराग्लायडिंग – प्राचीन काळापासून माणसाला आकाशाचे वेड आहे. पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडावे यासाठी त्याने ना-ना प्रयोग करून पाहिले. तसाच हा एक अत्यंत आनंद देणारा प्रकार आहे. यात आपल्याला पक्ष्याप्रमाणे आकाशात उडण्याचा आनंद मिळवता येतो. पॅराग्लायडर प्रशिक्षित चालक नियंत्रित करत असतो. आपण फक्त आकाशात विहरण्याचा आनंद लुटायचा आणि हो उंचावर गेल्यावर घाबरायचे कारण नाही. ते बरोबर सुरक्षितपणे आपल्याला जमिनीवर आणून सोडतात.

स्कुबा डायव्हिंग – समुद्राच्या पोटात पाण्याखालची जीवसृष्टी, मासे, वनस्पती यांचे निरीक्षण करण्याची अनोखी संधी स्कुबा डायव्हिंग या विलक्षण अद्भूत प्रकारात मिळते. विशिष्ट पोषाख घालून पाठीवर ऑक्सिजनचे सिलिंडर बांधून समुद्राच्या पाण्यात तळाशी काय आहे ते बघणे म्हणजे एक संस्मरणीय क्षण असतो. पाण्यात राहून विविधरंगी मासे, जलचर, कासवाच्या असंख्य जाती, पाणवेली, शैवाल, विशिष्ट आकारातील दगडगोटे आणि विशेष म्हणजे स्वत: जलचर होऊन पाण्याखालील सृष्टी अनुभवणे कोण विलक्षण अनुभव असतो हे तर शब्दातीतच… महाराष्ट्रात कोकणातील तारकल्ली येथील स्वच्छ सागरी किनारा स्कुबा डायव्हिंगसाठी अप्रतिम केंद्र
ठरत आहे.

कपॅराफिलिंग – आपल्याकडे कोकणातल्या समुद्रकिनार्‍यांवर अनेक ठिकाणी हा प्रकार उपलब्ध असतो. एका जीपला किंवा बोटीला लांब दोरीच्या सहाय्याने पॅरेशूट घट्ट बांधलेले असते. आपण एखाद्या पतंगासारखे उंच उडतो. त्याचे सर्व सुकाणू आणि नियंत्रण खाली चालकाकडे असतात. लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही धमाल अनुभवता येते. यासाठी सपाट मोठे मैदान आणि अडथळाविरहित आसमान हवे.

हॉट एअर बलून – एका मोठ्या फुग्यात गरम हवा सोडून, फुग्याला जोडलेल्या टोपलीत बसून हवाई सफर करता येते. यासाठी एलपीजी गॅसचा वापर करण्यात येतो. यासारख्या साहसी मोहिमांमध्ये सहभागी होणार्‍यांची संख्या वाढते आहे. यात जसे तरुण मुले-मुली आहेत तसेच प्रौढ आणि काही ज्येष्ठही आहेत. एखाद्या उंच कड्याच्या मध्यभागी लटकून काढलेला ‘सेल्फी’ किंवा व्हिडिओ सोशल माध्यमांवर लाईक आणि कमेंटस्चा पाऊस पडतो, हेही एक कारण यामागे आहे.

मात्र, केवळ लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी अतिसाहसीपणा नको याचे भानही तरुणाईने जपायला हवे. यामध्ये फोटोग्राफीपेक्षा श्‍वास रोखायला लावणारा तो थरार अनुभवणे महत्त्वाचे असते. फोटोग्राफी नव्हे. साहसी पर्यटनातील विविध प्रकार आपल्या शारीरिक क्षमतेबरोबरच आपली मानसिक कणखरताही आजमावतात. पण अशा साहसी पर्यटनात सहभागी होताना त्याचे आयोजक कोण आहेत? त्यांचा अनुभव काय आहे? ते वापरत असलेली साधने, उपकरणे सुरक्षित आहेत ना? प्रशिक्षक उत्तम आहेत ना? इत्यादी सर्व बाबी तपासून घेऊनच सहभागी व्हावे.

केवळ पैसे मिळवण्यासाठी साहसी पर्यटनाचे आयोजन करणार्‍या मंडळींपासून सावध असावे. अलीकडेच शासनाने साहसी पर्यटन केंद्रावरील पर्यटकांच्या सुरक्षेसंबंधी नियमावली तयार केली आहे. ती तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे त्यांचे पालन करावे. थोडक्यात, धाडसाच्या या पर्यटनाला जाताना एक गोष्ट मनात सतत जगती ठेवा… ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चला उचला सॅक… पडा बाहेर… बेस्ट ऑफ लक…!

साहसाचे आकर्षण अन् आरोग्य
साहसी कामामध्ये मानवी मेंदूतील काही ठराविक भाग उत्तेजित होतात. त्यांना एकत्रितपणे ‘रिवार्ड सर्किट’ असे म्हणतात. कुठल्याही साहसानंतर मेंदूतील हे भाग डोपामाईन नावाच्या रसायनाने व्यापले जातात. डोपामाईनमुळे मनुष्यात अतिउंच आनंदाची भावना निर्माण होते. तसेच साहसामध्ये मेंदूतील ग्रंथीतून अ‍ॅड्रनेलाईन नावाचे संप्रेरक पाझरते. अ‍ॅड्रनेलाईनमुळे रोमांच, थरार अनुभवायला मिळतो. खेळ-साहसी पर्यटनातील प्रकारमध्ये मेंदू आणि शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे ओपिऑईडस् तयार होतात. ते नैसर्गिक वेदनाशामकाचे काम करतात. एकंदरीत साहसी कार्या पर्यटनामुळे होणार्‍या रासायनिक बदलामुळे जीवनात समाधान, आनंद, स्वत:ची सतर्कता, एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढून निरोगी आरोग्य लाभते. त्या अर्थानेही साहसी पर्यटन आरोग्यवर्धनासाठी पूरक ठरते, असे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. महेश भिरूड यांनी सांगितले.

 

 

‘बंजी जंपिंग’चा थरार
बंजी जंपिंग हा विदेशात लोकप्रिय झालेला प्रकार अनेकांनी डिस्कव्हरी सारख्या वाहिन्यांवर पाहिला आहे. मात्र तो भारतात यायला नवे शतक यावे लागले. या प्रकारामध्ये उंच कड्यावरून दोरी बांधूनं खोल दरीत बिनधास्त उडी मारण्याचा थरार पर्यटक अनुभवतात. व्यक्तींच्या पायातील घोट्यांना लवचिक रबरी दोरी बांधली जाते. त्यानंतर एका ठाराविक उंचीवरून ती व्यक्ती स्वत:ला खाली झोकून देते. हा रोमहर्षक थरार भीतीने गाळण उडवणारा. उंचावरून उडी घेत व्यक्ती घडळ्यातील लंबकाप्रमाणे हवेत दोलायमान होत खाली स्थिरावते. यामध्ये पर्यटक आनंदाने भीतीने ओरडत ‘थ्रील’ घेत खाली स्थितरावतो.

भारतात ऋषिकेशमध्ये पहिल्या बंजी जंपिंग साहसी पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या साहसी प्रकाराला देशात सन २०१० मध्ये प्रारंभ झाला. गेल्या दशकात अत्यंत सुरक्षितरीत्या सुमारे 80 हजारहून अधिक पर्यटकांनी उंचावरून झोकून देत बंजीं जंपिंगचा थरार अनुभवला. देशातील साहसी पर्यटन प्रकारात याद्वारे नवीन ‘अध्याय’ रचला गेला. ऋषिकेश हे शहर केवळ बंजी जंपिंगमुळे साहसी पर्यटनाची राजधानी मानली जाते. बंजी जंपिंग विशषेत: तरुणाईला आकर्षित करणारा रोमांचकारी अनुभव आहे. त्यासाठी सुरक्षेचे पुरेस आणि सशक्त मापदंड वापरले जातात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ऑस्टे्रलिया आणि न्यूझीलंड येथे वापरण्यात येणारे अंतरराष्ट्रीय मापदंड, साधने या प्रकारात वापरली जात असल्याने हा श्‍वास रोखायला लावणारा अनुभव तितकाच सुरक्षित असतो.

ऋषिकेशनंतर गोव्यातील प्रसिद्ध बागा समुद्रकिनार्‍यापासून 45 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मायेम लेकजवळ 55 मीटर उंचीच्या बंजी जंपिंगला नुकताच गोवा पर्यटन विभागाच्या सहयोगाने प्रारंभ झाला. चला झोकून द्या स्वत:ला उंचावरून… यासाठी ‘दिलका हौसला मजबूत’ असणे अत्यंत आवश्यक आहे. पण जर करू शकलात तर मग बस्स.. और क्या चाहिए.

पंकज क्षेमकल्याणी , हौशी गिर्यारोहक, नशिक.

 

Leave a Comment

error: Content is protected !!