Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जागतिक पर्यटन दिन विशेष : पर्यटन होत आहे जीवनशैली

Share

नाशिक | नील कुलकर्णी

चंद्रमौळी घरात राहणार्‍यांपासून ते अतिश्रीमंतापर्यंत सर्वांनाच कुठे ना कुठे पर्यटनाला जावे वाटते. मग कुणी अगदी जवळची पर्यटनस्थळे निवडतो तर कुणी थेट लाखोंच्या घरात पॅकेज देणार्‍या विदेश दर्शनाचा पर्याय निवडतो. मात्र फिरणे, पाहणे, जाणून घेणे आणि नव्या स्थळांना ‘एक्स्पोअर’ करणे हे प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा भाग किंंबहुना ‘लाइफस्टाईल’ झाली आहे.

। यस्तु संचारते देशान् सेवते यस्तु पंडीतान ॥
तस्य विस्तारीता बुद्धी तैल बिंदू रवांभसी।

जो देश-विदेशी प्रवास करतो आणि ज्याला विद्वान लोकांचा सहवास लाभतो त्याची बुद्धी पाण्यावर पडलेला तेलाचा बिंदू ज्याप्रमाणे पसरत जातो, त्याप्रमाणे त्यांचीही बुद्धी, अनुभव विश्‍व विस्तारत जाते, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. पर्यटनाचे विश्‍व खूपच विस्तारले आहे. पूर्वी देशात केवळ पर्यटन केवळ धार्मिक स्थळांपुरतेच मर्यादित होते. पर्यटन तोपर्यंत जीवनशैली झाली नव्हती. पर्यटनाचे प्रकारही फारच सीमित होते. मात्र, त्यानंतर लोकांचे राहणीमान, शिक्षण यामध्ये आमूलाग्र बदल झाले. माध्यमांद्वारे अनेक नवनवीन ठिकाणे त्यांच्या पाहण्यात-ऐकण्यात येऊ लागली. त्यामुळे आपणही तिथे जाऊन पर्यटनाची वैशिष्टे समजून घ्यावीत, असे अनेकांना वाटू लागले.

पूर्वी केवळ चित्रपटातून दिसणारी पर्यटनस्थळे मग ९५ नंतरच्या काळात तर सर्वत्र इंटरनेटचा प्रचार-प्रसार झाल्यानंतर अधिक बोलक्या दृकश्राव्य स्वरुपात दिसू लागली, कारण गुगल सर्वार्थाने ‘व्हर्च्यूअल’ गुरू झाला होता. नव्या सहस्त्रकात तर पर्यटनाचे स्वरूप अधिकच बदलले, कारण याकाळात स्मार्ट फोनने प्रत्येकाच्या हातामध्ये अवघे विश्‍व सामावून दिले. आज पर्यटन हे नागरिकांच्या जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग झाले आहे. कारण लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आहे आणि एकल कुटुंबात पती-पत्नी दोघेही कमवती झाल्याने वर्षभर काम केल्यानंतर काही दिवस आपल्या कुटुंबियांना वेळ देता यावा, त्यानिमित्ताने परस्पराशी संवाद, स्नेह, बांधिलकी अधिक घट्ट व्हावी आणि त्यायोगे धावपळीच्या व्यग्र जीवनशैलीत चार घटका नवीनठिकाणी नवी माहिती घेता आनंदाने जगता यावी, हा त्यामागचा उद्देश होता. पूर्वी टूर ऑपरेटर्स आणि अशा कंपन्याची संख्या फारशी नव्हती. कारण 50 उलटलेल्या आर्थिकदृष्ट्या स्थिर व्यक्तीचे पर्यटन विशेषत: चारधामसारखे धार्मिक पर्यटन करत असे.

आज टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कंपन्यांची संख्याही वाढली आहे. आणि पर्यटनाचे विपुल आणि नवनवीन प्रकारही वाढले आहेत. टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल सेवा देणार्‍या कंपन्याची संख्या आणि विस्तार वाढण्यामागे एक महत्त्वाचे कारण होते की, लोकांना सुरक्षित, कुठल्याही समस्या, चिंता न घेता आनंदी प्रवास करून पर्यटन स्थळांचा आनंद घ्यायचा आहे. त्यासाठी वैयक्तिक प्रवासाचा पर्याय निवड्यापेक्षा ते टूर्स कंपन्या, टूर ऑपरेटर्सद्वारे आयोजित केल्या गेलेल्या यात्रा-सहलीला पसंती देत आहेत. कारण प्रवाशांच्या तिकिटांपासून ते अगदी उत्तम सोईचे जेवण, वैद्यकीय सुविधा, आनंदी खेळकर प्रवासा व्हावा, यासाठी विविध गेम्सचे आयोजन, प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यायाने पर्यटन वाढावे, यासाठी विविध सेवा सवलती, रोख सूट, विविध बक्षिसे, भेटवस्तू देत आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासादरम्यान विमासेवा देणे ही एक गोष्ट फार महत्त्वाची ठरते. यासह टूर कंपन्या एखाद्या सहलीचे पॅकेज तयार करताना तेथील स्थळाचे सर्वेक्षण, अभ्यास, तिकीट दर, चांगल्या हॉटेल्सची उपलब्धता, आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणे त्यांना होणार्‍या प्रवास शेड्यूलची, बदलाची, तत्काळ माहिती देणे यासह सर्व सेवा देतात. त्यामुळे लोकांचा प्रवास आनंदी आणि सुरक्षित होता. त्यामुळेही टूर कंपन्यांद्वारे यात्रा-सहली करणार्‍याची संख्या आणि टूर कंपन्याची संख्याही वाढली आहे. आज जो तो आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे पर्यटन करतोच. अगदी चंद्रमौळी घरात राहणार्‍यापासून ते अतिश्रीमंतापर्यंत सर्वांनाच कुठे ना कुठे पर्यटनाला जावे वाटते. मग कुणी अगदी जवळची पर्यटनस्थळे निवडतो तर कुणी थेट लाखोंच्या घरात पॅकेज देणार्‍या विदेश दर्शनाचा पर्याय निवडतो. मात्र फिरणे, पाहणे, जाणून घेणे आणि नव्या स्थळांना ‘एक्स्पोअर’ करणे हे प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा भाग किंबहुना ‘लाइफस्टाईल’ झाली आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाभवती फिरणारे पर्यटन आज खूप विस्तारले आहेे. पावसाळी, उन्हाळी अशा मोसमाशी निगडीत पर्यटनासह आज कृषी, वैद्यकीय, साहसी, सागरी इतके नव्हे, तर वाईन संस्कृतीशी निगडित द्राक्षबागांची सफर आणि त्या अनुषंगाने येणारे वाईन पर्यटन तर नाशिककरांसह अनेकांना नवे नाही. आज नाशिकला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येतही १० वर्षांपूर्वीच्या तुलनेत तिपटीने वाढ झाली आहे. १३ वर्षांतून एकदा येणारा कुंभमेळा आणि धार्मिक स्थळे ही पर्यटकांची येथे येण्याची मुख्य कारणे असली तरी आज या व्यक्तिरिक्त येथील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. कारण येथील थंड हवामान, पाण्याची विपुल उपलब्धता, फळबागा, फूलशेती यासह द्राक्षमळे यामुळे येणारे कृषी पर्यटन, याशिवाय वायनरीची नगरी असल्याने येथे देशातील पर्यटकांसह विदेशातीलही पर्यटक खास वाईन फेस्टिव्हलसाठी येत असतात.

या शिवाय नाशिकच्या ३० ते ५० किमीच्या परिसरात असणारी सुंदर निसर्गरम्य स्थळे. ही बाब पर्यटनवाढीला कारणीभूत ठरत आहे. ज्यांना निसर्ग, पक्षी, फुले, घनदाट जंगले, कोसळणारे जलप्रपात, झरे या आणि अशा गोष्टींची विलक्षण आवड आहे त्यांच्यासाठी नाशिकसारखे दुसरे ठिकाण नाही. नाशिकच्या बाहेर गाडी घेऊन निघालो की, केवळ ३० ते ५० किमीवर अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहे. जिल्ह्यात पेठ तालुक्यातील आडगाव, बिलकस, भुवन, त्र्यंबकेश्‍वरमधील डोंगर- दर्‍यांवरील अनेक आदिवासी पाडे, नाशिकजवळील जव्हार येथील डोंगररांगात दाभोसा धबधबा, काळमांडवी हे आणि इतर कितीतरी ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी उत्तम आहे. सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवन-बार्‍हे गावातील भिवताससारखे सुरेख निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याने नटलेले दुसरे व्हर्जिन डेस्टिनेशन नाही. येथील अतिउंच दुधाळ जलप्रपात पाहणार्‍याचे डोळ्याचे पारणे फेडतो.

गुजरात सीमेवरील आंबा भरपूर पिकणार्‍या भागात त्या अनुषंगाने महोत्सव भरवता येईल. यामुळे व्यवस्थित ब्रॅण्डिंग केल्यास आंबा महोत्सवासारखे पर्यटनाला चालना देणारे उपक्रम राबवून आदिवासींच्या कला पर्यटकांना सादर करून किमान दोन ते तीन दिवस पर्यटक अशा व्हर्जिन डेस्टिनेशनवर राहू शकतो. त्यातून पर्यटनाला चालना मिळण्यासह स्थानिक आदिवासींना रोजगारच्या संधीही उपलब्ध होतील.

पक्षी अभयारण्य हे तर खास पक्षी पर्यटनाचा महत्त्वपूर्ण प्रकार झाला आहे. पूर्वी प्राणी-पक्षी याबद्दल लोकांमध्ये कमालीची अनास्था होती, मात्र विविध चॅनल्समुळे अशी ‘व्हर्जिन डेस्टिनेशन’ आज पर्यटकांनी फुलून आली आहेत. जंगल पर्यटन हाही एक प्रकार पर्यटक प्रिय झाला आहे. नांदुरमधमेश्‍वरचा पक्षी महोत्सव, भंडारदरा येथे काही टूर कंपन्यातर्फे उन्हाळ्याच्या शेवटी आयोजित केला जाणारा काजवा महोत्सव, आंबा महोत्सव यामुळेही पर्यटक नाशिकच्या पर्यटनाला पहिली पसंती देत आहेत. नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनालाही सुगीचे दिवस येत आहेत. कारण मुंबई-पुण्याच्या तुलनेत येथे असणार्‍या अत्याधुनिक व तुलनेने स्वस्त वैद्यकीयसारख्या गोष्टीमुळे खास उपचारांसाठी येथे येणार्‍यांच्या संख्येत लक्षणिय वाढ होत आहे.

नाशिक शहरातून प्रवासी घेऊन त्यांना येथे आणून सोडणार्‍या स्थानिक टूर कंपन्या नाशिकची ओळख बनू पाहत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे नाशिकची देशातील सर्व शहरांची रेल्वे, रस्ते आणि विमानसेवेने झालेली कनेक्टिव्हिटी हे आहे. त्यामुळे नाशिकमधून आज खासगी लक्झरी बसेससह, छोटी १५ते २० आसनी वाहने आणि मिनी बसेस अशी उपलब्धता रास्त दरात उपलब्ध आहे. यासह रेल्वे, विमानसेवेनेही देश-विदेशात आपल्या ग्राहकांना घेऊन पर्यटन घडवून आणण्यासाठी नाशिकसारखे दुसरे ठिकाण नाही. शिर्डी, त्र्यंबकेश्‍वर, वणी या धार्मिक ठिकाणांमुळे नाशिकला पर्यटकांमध्ये भर पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नाशिकचा समावेश रामायणा सर्किटमध्ये होणार असल्याची घोषणा केली. शिवाय नाशिकमधील गोदेची वाराणासी(काशी)च्या धर्तीवर महाआरती दररोज केली जाणार आहे. साहाजिक पर्यटकांसाठी गोदा महाआरती पर्वणीच ठरणार आहे.

आज पर्यटन एक परवलीचा, जीवनशैलीचा शब्द झाला आहे. आपला महाराष्ट्र पर्यटनासाठी नंंदनवन आहे. केवळ बर्फाच्छादित ‘हिमशिखरे’ सोडली तर महाराष्ट्रात पर्यटकांना सर्व काही एकाच राज्यात पाहायला मिळते. ही भूमी तर पर्यटनासाठी सर्वार्थाने नंदनवन ठरली आहे. गड-किल्ले, स्वच्छ निळेशार सागरी किनारे, हिरव्यागार दर्‍याखोर्‍यांनी नटलेली थंड हवेची ठिकाणे, पक्षी अभयारण्ये, जंगल सफारी, काळ्या कातळात कोरलेल्या अजिंठा वेरुळ, पितळखोरा, पांडवलेणी आणि एलिफंटा यासारख्या लेण्यांचा समृद्धी कोकणाचा फळ-फळावळीने समृद्ध प्रदेश, नाशिकचे द्राक्षासह इतर शेती समृद्धी, कृषीपर्यटनासाठी सर्व पातळ्यांवर संपन्न असणारा प्रदेश, आदिवासी पाड्यांवरील तेथील लोकांचे सण-उत्सव, बोहाडा नृत्य राज्यासह नाशिकची भूमी पर्यटनाचा शिरपेचात हिर्‍याचा मुकुटमणी असा साज लेऊन आहे.

पर्यटनासाठी काय निवडाल?
हल्ली पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगकरून विविध प्रकारचे रेल्वे तसेच हवाई बुकिंग करता येते. मात्र पर्यटनासाठी केवळ बुकिंग करून चालत नाही; तर त्यासाठी संबंधित ठिकाणाचे भौगोलिक वातावरण, हॉटेल्सची उपलब्धता, खाद्य संस्कृती, रस्त्याची माहिती याची पुरेशी माहिती असणे गरजेचे ठरते. अशा वेळी टूर ऑपरेट करणार्‍या कंपनीकडून काढल्या जाणार्‍या सहलीच्या माध्यमातून प्रवास करणे कधीही श्रेयस्कर ठरते. कारण अशा कंपन्या प्रवाशांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यासह त्यांना प्रवासात चांगल्या प्रतीचे खाद्य, वैद्यकीय सेवा, आणीबाणीची परिस्थिती हाताळण्याची यंत्रणा, प्रवाशांची सुरक्षा, अपघातविमा यासह इतर गोष्टींची जबाबदारी घेत असतात.

विदेशातील ठिकाणे पाहणार्‍यांचेही हल्ली प्रमाण विलक्षण वाढले आहे. त्यासाठी खास पॅकेज देणार्‍या टूर कंपन्याचे प्रमाणही महानगरांइतके मध्यम आकाराच्या शहरांमध्ये वाढले आहे. देशाअंतर्गत प्रवासापेक्षा विदेशात प्रवास करताना पासपोर्ट-व्हिसा यासह इतर गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यासोबतच कुठल्या पर्यटनस्थळी कुठल्या मोसमात प्रवास करणे फायद्याचे आहे, याचा अभ्यास करूनच मग एखादे ठिकाण पर्यटनासाठी निवडावे लागते. कारण त्या-त्या देशांमधले हवामान, बर्फ पडण्याचा हंगाम, अतिगरमी, पावसांचे अति प्रमाण अशा नैर्सगिक गोष्टींचे ज्ञान घेऊन मगच प्रवास करणे हितकारक ठरते.

अर्थात हा अभ्यास देशाअंतर्गत पर्यटनालाही लागू पडतो. यासाठी टूर कंपन्या या सर्व बाबींचा अभ्यास करून आपल्या ग्राहकांसाठी सोयीस्कर हंगाम निवडून पॅकेज देत असतात. पर्यटन करतानाही त्या त्या ठिकाणाची परिस्थिती, हवामान याचा अभ्यास करून एखादा प्रवास बेत आखणे कधीही श्रेयस्कर ठरते. उदा. उन्हाळी पर्यटन करणार असाल, तर राजस्थानपेक्षा सिमला-कुलू-मनाली-हिमाचल प्रदेश किंवा दार्जिलिंग-नैनिताल असे पर्याय निवडावे. दक्षिण भारतातही उन्हाळ्यात प्रचंड उन्हाचा तडाखा असतो. अशा वेळी पर्यटनासाठी तिकडे न जाता थंड हवेची ठिकाणे निवडावीत. आपला प्रकृती, आरोग्याच्या समस्या याचा अभ्यास करूनच मग पर्यटनाला निघावे. कुटुंबातील जितके सदस्य प्रवासाला जाणार असतील, त्या सर्वांकडे थोडे थोडे पैसे विविध ठिकाणी ठेवावेत. संपूर्ण रोकड एकाच ठिकाणी आणि एका व्यक्तीकडे असू नये.

हल्ली प्लॅस्टिकमनीचाच वापर केला जातो. परंतु सर्व डेबिट, केडिट कार्ड एकाच ठिकाणी ठेवू नयेत. आपल्या प्रकृतीला सहन न होणार्‍या गोेेष्टी टाळाव्यात, काही आजार असेल, तर प्रवासापूर्वी डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी करून आणीबाणीच्या वेळी तत्काळ उपयोगी देतील, अशी औषधे जवळ ठेवावीत. उच्च रक्तदाब, मधुमेहींनी आपल्या प्रवासादरम्यान पुरतील इतक्या ओैषधी जवळ बाळगावीत. प्रत्येक प्रवास व्यक्तींला नव्या जगाची सफर घडवत अनुभवविश्‍व समृद्ध करत असतो. जो अधिक पर्यटन करतो त्याला विविध देश-प्रदेशातील भाषा, संस्कृती, परंपरा याची ओळख होत असते. नव्या ठिकाणी गेल्यामुळे आपला आत्मविश्‍वासही दुणावतो. प्रत्येक प्रवासादरम्यान येणारे अनुभव भिन्न असतात. प्रवासीही वेगवेगळे असतात. त्यामुळे पर्यटनामुळे मनुष्याची बुद्धी आणि अनुभवविश्‍व सर्वांर्थाने संपन्न होत असते. दैनंदिन जीवनातील एकसुरी जीवनपद्धतीतून बाहेर पडत जाणीवा समृद्ध करणारा पर्यटन हा एक उत्तम पर्याय ठरतो.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!