Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

जागतिक पर्यावरण दिन विशेष : ‘नंदिनी’ दुषित पाण्याचा नाला

Share

नाशिक | निशिकांत पाटील

गोदावरी नदीची उपनदी म्हणुन ओळख असलेली नंदिनी नदी अतिक्रमणाच्या विळख्यात आली असुन नदीचे पात्र दिवसेंदिवस कमी तर होत आहेच मात्र नंदिनी मध्ये होणारे प्रदुषण काही थांबायचे नावच घेत नाही .

त्र्यंबकेश्वरच्या डोंगरद-यातून वाहणारी नंदिनी नदी नाशिक शहरातून नासर्डी नावाने ओळखली जाते. या नदीची सध्या गटार गंगेसारखी अवस्था झाली आहे. शहरातील विविध भागातील नाल्यांचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने नंदिनी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच नदीचा नाला झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नद्यांच्या सीमा रेषा ओलांडत अतिक्रमणही झाले आहे. अतिक्रमणामुळे नदी पात्र छोटे होत चालले आहे. नद्यांच्या किनारीच नागरी वस्ती उभी राहिल्याने त्याचे सांडपाणी नदीत सोडले जात आहे. पाण्याबरोबरच कचरा टाकला जात आहे.
नंदिनी नदीला अनेक पावसाळी नाले जोडले गेले आहेत.

पावसाळ्यातील पाणी नदीतून वाहून जाणे हा याचा मुख्य उद्देश असताना पावसाळी नाल्यात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. आणि याच नाल्यांतून हे पाणी थेट नंदिनी नदीतून वाहत आहे. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीतून रसायन युक्त पाणी येत आहे. नदीतून काळ्या रंगाचे, फेसाळयुक्त पाणी वाहत असल्याने हे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

नंदिनीचा झाला नासर्डी नाला : त्र्यंबकेश्वर, अंजनेरी पर्वताजवळ सुपाता या डोंगररांगातून नंदिनी नदीचा उगम होतो. त्यांनतर बेळगाव ढगे या गावातून पुढे सातपूर व नाशिकमध्ये टाकळीपर्यंत हि नदी वाहते. सातपूर पर्यंत नदी स्वच्छ, सुंदर व खळखळत वाहते. मात्र सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीच्या पुलापासून नदीचा नाला झाल्याचे निदर्शनाला येते आहे. म्हणजेच ग्रामीण भागातून हि नदी नंदिनी म्हणून खळखळ वाहते. मात्र नाशिक महापालिकेच्या हद्दीत येऊन हि नदी नासर्डी बनते व सर्वत्र नाल्याचे पाणी नदीतून वाहते. टाकळी जवळ नंदिनीचा गोदामाईत संगम होतो.

नासर्डीत मिसळते नाल्याचे पाणी : सातपूर अंबड लिंक रोड वरील पुलाखाली,अमृत गार्डन चौफूली, सातपूर गाव, स्वारबाबानगर, कांबळेवाडी, मिलिंद नगर, भारत नगर भागात मोठ्या प्रमाणात नालेच नदीत सोडले आहेत. उंटवाडी येथेही नदीत नाल्याचे पाणी सोडले जात आहे. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या पद्धतीने नाल्यांचे पाणी नदीत सोडले जात आहे. अनेक ठिकाणी नाल्यातून कचरा नदीत टाकला जात आहे.

पुलांवर संरक्षक जाळ्यांची योजना कागदावर : नंदिनी नदीवर सातपूर अंबड लिंक रोड , आय.टी.आय. पुल खुटवड नगर , उंटवाडी मुंबई नाका आदी ठिकाणी पुल बांधण्यात आले आहेत. याठिकाणी रहिवाशी पुलावरून नदीत कचरा निर्माल्य पाण्यात टाकुन प्रदूषण करीत असतानाचे चित्र दररोजच बघावयास मिळत आहे त्याला प्रतिबंध बसावा याकरिता चोपडा लॉन्स च्या धर्तीवर पुलाच्या कडेला संरक्षक जाळ्या बसविणे बाबत प्रशासनाशी काही सामाजिक संस्थांची चर्चा झाली होती मात्र अद्याप ती चर्चा कागदोपत्रीच राहिल्याने नंदिनीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

नद्यांच्या प्रदूषणाबाबत जनहित याचिका : गोदामाई व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाबाबत सामाजिक कार्यकर्ते व नमामि गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित यांनी याबाबत जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे. याबाबत न्यायालयाने महापालिका व संबन्धिताना फटकारले आहे. मलजल शुद्धीकरणाबाबत अहवाल सादर करून त्यावर उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र सध्या परिस्थिती पाहता प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!