Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

जागतिक पर्यावरण दिन विशेष : जिल्ह्यात होणार एक कोटी ९२ लाख रोपांची लागवड

Share

नाशिक | विजय गिते

महाराष्ट्र शासनाने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा यावर्षी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार वृक्षांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे.ही वृक्ष लागवड झाल्यानंतर सर्व झाडे जगविण्याचे काम प्रत्येक ग्रामस्थाचे राहणार आहे. ही सर्व झाडे जगली तर नाशिक जिल्हा हिरवागार झाल्यास नवल वाटायला नको.मात्र,यासाठी प्रत्येकाने याची जबाबदारी घेणे आवश्यक राहणार आहे.

वनविभागाच्या नाशिक पूर्व-पश्चिम विभागासह सामाजिक वनीकरण, वन विकास महामंडळासह अन्य सरकारी, निमसरकारी यंत्रणाही यामध्ये सहभागी होणार आहेत. वनविभागाकडून या दृष्टीने सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे .

जिल्ह्यात पूर्व पश्चिम विभागात तसेच सामाजिक वनीकरणाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रात खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे.नाशिक पश्चिम विभागाला २६ तर पूर्व विभागाला २८ लाख रोपांंच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोप निर्मिती मागील तीन वर्षांपासून केली जात आहे .रोजगार हमी योजनेतून रोपांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आलेले आहे.या वर्षीही एकूण उद्दिष्ट लक्षात घेता ५० लाख रोपेे जिल्ह्यासाठी अतिरिक्त तयार करून ठेवण्यात आलेले आहेत.नाशिक जिल्ह्याकरिता वनविभागास अन्य शासकीय यंत्रणेकडे सुमारे दोन कोटी ४३ लाख रोपे सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतांश रोपे ही दीड ते दोन वर्ष वर झालेली आहेत.

जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र वाढविण्यासाठी पूरक ठरणार्‍या विविध भारतीय प्रजातीच्या रोपांची निर्मितीवर भर देण्यात आलेला आहे.यामध्ये प्रमुख्याने हिरडा,बेहडा,आवळा,बांबू,खैर,कडुनिंब,काशीद,शिवण कांचन,ताम्हण , अर्जुन,सादडा अशा विविध प्रजातींचा यामध्ये समावेश आहे.

जून महिन्याच्या अखेरीपासून रोपांचे वाटप रोपवाटिकांमधून करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत वगळता अन्य सर्व शासकीय,निमशासकीय,सामाजिक संस्थांना शासनाच्या सवलतीच्या दरात ही रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला तीन हजार रुपये दोनशे रोपांचे कमाल उद्दिष्ट देण्यात आलेले आहे,अशी माहिती वनविभागातर्फे देण्यात आली.

शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवडीचे अभियान राज्य शासनातर्फे सुरू आहे.या अभियानाचा अखेरचा टप्पा यावर्षी होणार असून यामध्ये ३३ कोटी रोपे लागवडीचा टप्पा पार पडेल.यामध्ये नाशिक जिल्ह्यात ८८ लाख रोपे वनविभाग ८५ लाख रोपे सामाजिक वनीकरण ,चार लाख ३४ हजार रोपे ,वन विकास महामंडळ तर २० लाख ७२ हजार रोपे ग्रामपंचायतींना लागवड करावयाची आहे.ही रोपे लावण्याच्या दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात आहे. वनविभागातर्फे ग्रामपंचायतींना ही रोपे मोफत पुरविले जाणार आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!