आणीबाणी प्रसंगी असलेल्या सक्षम मानसिकतेच्या बळावर आपण करोनाची लढाई जिंकू – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती व आणीबाणीप्रसंगी असलेली सक्षम मानसिकता या शक्तीस्थळांच्या बळावर आपण करोनाची लढाई सहज जिंकू असा विश्वास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

आज जिल्हा माहिती कार्यालय व नाशिक आकाशवाणी केंद्राच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या मुलाखतींच्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात जिल्हाधिकारी  सूरज मांढरे बोलत होते. आकाशवाणी केंद्राचे संचालक शैलेश माळोदे यांनी घेतलेली ही मुलाखत उद्या (४. एप्रिल रोजी) सकाळी ९.३० वाजता आकाशवाणीच्या एफ.एम. १०१.४ केंद्रावर प्रक्षेपित होणार आहे. तसेच प्रसार भारतीच्या ऑल इंडिया न्युज अॅप वरही ती ऐकता येणार आहे.

कोरोनाच्या एकूणच सद्यस्थितीवर श्री. मांढरे, म्हणाले, कोरोना या विषाणूशी लढा देण्यात इतर देशांपेक्षा भारत आघाडीवर आहे. केंद्र व राज्य शासन यांचे उत्तम नियोजन व या बरोबरच भारतीय लोकांच्या उत्तम प्रतिसादामुळे हे शक्य झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सेवा देणाऱ्या प्रत्येकांसाठी पाच मिनिटे टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन जनतेला केले होते. या आवाहनाला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला व जनतेच्या मनात देशावर आलेल्या या संकटातून आपण सहीसलामत बाहेर पडू असा, आत्मविश्वास देखील त्यातून निमार्ण केला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ५ तारखेला अंधाराकडून प्रकाशाची वाट दिसावी म्हणून प्रत्येक नागरिकाने रात्री नऊ वाजता ९ मिनीटे आपल्या घराच्या दारात, गॅलरीत दिवे लावण्याचे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले आहे. हा उपक्रम नक्कीच प्रत्येक भारतीयाला कोरोनाशी लढण्यासाठी बळ देणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

नाशिक जिल्हा धार्मिक स्थळांचा जिल्हा असल्याने जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात लवकर प्रयत्न सुरू करण्यात आले होते. विपश्यना केंद्रांमध्ये इतर देशातून येणारे नागरिकांना थांबविण्यात आले. तसेच सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव रद्द करण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरे बंद ठेवण्यात आले. रामनवमीला नाशिकचे प्रख्यात काळराम मंदिर बंद होते. तसेच जिल्ह्यातील सर्व यात्रा, बाजार बंद करण्यात आले आहेत. जिल्हाभरात ४७ चेकपोस्टद्वारे प्रत्येक बाहेरून येणाऱ्या माणसाची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

करोना या विषाणूशी लढा देण्यासाठी पोलिस विभाग, आरोग्य, महानगरपालिका व संबंधित सर्व विभागांनी उत्तम सुसंवाद ठेवला आहे. यात पोलीस विभागाचे विशेष श्रेय आहे. कारण संचारबंदीतही सोशल डिस्टन्सिंग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांनाच लोकांपासून दूर करणे म्हणजे ठराविक अंतरावरून संवाद साधायला सांगणे तसे अवघड, पण हा पेच पोलिस विभागाने उत्तमरित्या सोडविल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यत सारेच या लढ्यात आपणे पूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज आहेत.

करोनाच्या या संकटात माध्यमांनी आपली भूमिका अगदी चोख बजावली असून, प्रत्येक नागरिकाला आपल्या माध्यमातून त्यांनी घरी राहण्याचे आवाहन केले आहे. वेळोवेळी होणारे बदल जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी अगदी उत्तमरित्या केले असल्याने त्यांनी यावेळी माध्यमांचे आभारही मानले.

संकट जसे हळू हळू येते तसे ते हळू हळू कमी देखील होते. आपला जिल्हा तसे देशावर आलेल्या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडणार आहोत. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन , जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *