हरसूल-जलपरिषद : साहेब, आम्हाला हक्काचे पाणी मिळवून द्या!

हरसूल-जलपरिषद : साहेब, आम्हाला हक्काचे पाणी मिळवून द्या!

नाशिक । प्रतिनिधी

जायकवाडी धरणाला पाणीपुरवठा करणारा परिसर म्हणून नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाची ओळख. पावसाळ्यात येथील नद्या दुथडी भरून वाहतात. मात्र, उन्हाळ्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या याच भागात प्यायला हंडाभर पाणी मिळत नाहीे. साहेब, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील बहुतांश भागात हीच परिस्थिती असून येथील पाणीप्रश्न आपण सोडवला पाहिजे, अशी विनवणी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे शेवगेपाडा येथील महिलेने केली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे पार पडलेल्या जलपरिषदेला आ. खोसकरांनी तेवढेच आशादायी उत्तर दिले. ते म्हणाले, सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा आहे. जलसंपदा विभाग ज्या कुणा मंत्र्याकडे जाईल त्यांच्याकडून इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचा पाणीप्रश्न मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही. शेवगेपाडापेक्षा भयंकर परिस्थिती ठाणापाडा परिसरात आहे. मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण लवकरच दौरा करणार आहोत. महिलेने मांडलेल्या प्रश्नामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून मी शेवगेपाडा गावातूनच मतदारसंघाचा पाहणी करणार असल्याचे सांगितले.

जल परिषदेच्या कार्यकर्त्यांना पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदतीला यापुढे घेतले जाईल. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकार्‍यांना सोबत घेतले जाईल. या मतदारसंघात सर्वात जास्त लहान-मोठी धरणे आहेत. पावसाळ्यात पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी कसे नियोजन करता येईल यावर सुरुवातीला लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मतदारसंघाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.

यावेळी जल परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजला आहे. अजून किती दिवस खस्ता खायच्या. आदिवासी समाज मिळेल तिथे वास्तव्य करून उदरनिर्वाह करीत आहे. आमच्यासाठी पाणीप्रश्न मार्गी लागणे सर्वात मोठी गरज आहे. येथील दुष्काळ दूर झाला तर विकासाला मोठा वाव आहे. कोणीही व्यक्ती रोजगारानिमित्त गाव सोडणार नाही, असेही जल परिषदेचे कार्यकर्ते म्हणाले. जल परिषदेचा प्रारंभ शरद शेजवळ यांच्या जल पोवाड्यांनी झाला. आ. हिरामण खोसकर, आघाडीची धावपटू कविता राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते यावेळी रोपट्याला पाणी घालून जलपूजन करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जलसंधारण अभ्यासक गोपीनाथ गांगोडे, शरद शेजवळ, कैलास चौधरी, माजी सैनिक हिरामण शेवरे, डॉ. मिलिंद पिंप्रीकर, डॉ. आर. व्ही. गोरे, अय्यर, कैलास शार्दूल, जयराम मोंढे, देवचंद पाटील, नितीन गांगोडे, अमित देवकर, भारती भोये, नितीन शेवरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राजेश दळवी तर आभार देवीदास कामडी यांनी मानले.

जल परिषदेचे कौतुकास्पद कार्य
आदिवासी पट्ट्यातील पाणीटंचाई भीषण आहे. हरसूल परिसरात पाणीटंचाईने पावसाळ्यातील भातपीक निघाले की, जत्थेच्या जत्थे रोजगारासाठी वणवण भटकतात. महिलांचा सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो. यामुळे हक्काचे पाणी मिळावे तसेच पाण्याचे स्त्रोत सुरू करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत जल परिषदेचे कार्यकर्ते घेत आहेत. बरेच कार्यकर्ते उच्चशिक्षित असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नोकरी करतात. सुटी इतरत्र साजरी करण्याऐवजी सर्वजण गावी येऊन पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

जल परिषदेत विद्यार्थी केंद्रस्थानी
पाणी बचतीचा संदेश घराघरांत पोहोचावा या उद्देशाने या जल परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी जलथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला. उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना दिवंगत पत्रकार हेमंत गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

बंधारपाडाप्रमाणे सर्व गावे टंचाईमुक्त व्हावी
दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील आदिवासी पाड्यावर प्रचंड दुष्काळ होता. पाचवेळा बोअरवेल केले तरीदेखील पाणी लागले नाही. अखेरीस पावसाळ्यातील पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते यशस्वी झाले, आज गावात पाण्याचे सुयोग्य नियोजन झाले असून उन्हाळ्यात दुष्काळी भागाला आमचे गाव पाणी पुरवते.– गोपीनाथ गांगोडे, जल अभ्यासक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com