Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

धान्य साठवणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात अद्ययावत गोदाम; नाबार्डकडून अर्थसहाय्य्य

Share
धान्य साठवणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात अद्ययावत गोदाम; नाबार्डकडून अर्थसहाय्य्य; Up-to-date warehouses in each taluka for grain storage; Financing from NABARD

नाशिक । प्रतिनिधी

शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे नागरिकांना शिधापत्रिकेवर पुरवण्यात येणार्‍या धान्य साठवणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात अद्ययावत गोदामांची उभारणी करण्यात येत आहे. या गोदामांच्या माध्यमातून धान्य वितरणात सुसूत्रता आणली जाणार असून अन्नधान्याची पुरेशी काळजी घेतली जाणार असल्याने यापूर्वीच्या काळात होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या दहा वर्षांत धान्य साठवणुकीसाठी वापरल्या जाणार्‍या गोदामांची काहीशी दुरवस्था झाली होती. तर काही ठिकाणी धान्य साठवण्यास पुरेशी जागा उपलब्ध होत नव्हती. यामुळे धान्याच्या नासाडीचेदेखील प्रमाण वाढले होते. शासनाच्या धोरणानुसार अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढल्याने प्रत्येक तालुक्यात वितरित करावयाच्या धान्याचा कोटादेखील वाढला होता.

मात्र, त्या प्रमाणात धान्य साठवणुकीसाठी गोदामे अपुरी पडत असल्याने प्रशासनासमोरील अडचणीत वाढ झाली होती. याबाबतचा विचार होऊन सन २०१७ मध्ये शासनस्तरावरून पुरेशा क्षमतेची गोदामे नव्याने बांधण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेसाठी नाबार्डने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवल्याने नाशिकमधील १३ तालुक्यांसाठी नवीन गोदामांची योजना आखण्यात आली. त्यानुसार १३ तालुक्यांमध्ये प्रशस्त जागेत या अद्ययावत गोदामांची उभारणी सुरू असून त्यातील काहींची बांधकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ही बांधकामे निश्चित करताना अस्तित्वातील धान्य साठवण गोदामांची स्थिती, क्षमता याचादेखील विचार करण्यात आला आहे.

६० कोटींची मागणी
जिल्ह्यातील १३ गोदामांसाठी नाबार्डकडून २२ कोटींचा निधी प्राप्त झाला असून बांधकामाच्या स्थितीनुसार तो संबंधित ठेकेदारांना वितरित करण्यात आला आहे. तर याच कामासाठी पुढील टप्प्यात ६० कोटींची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ही गोदामे बांधण्यात येत असून काम पूर्ण झाल्यावर संबंधित तहसीलदारांकडे ती सोपवली जाणार आहेत. त्यानंतर तेथून रेशन दुकानदारांना तसेच शासकीय योजनेच्या लाभार्थींना धान्य वितरण सुरू करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव बसवंत (निफाड), सुरगाणा, दिंडोरी, मालेगाव, निळगव्हाण (मालेगाव), येवला, इगतपुरी, बागलाण येथे प्रत्येकी तीन हजार मेट्रिक टन क्षमतेची गोदामे बांधण्यात येत असून चांदवड, सिन्नर, कळवण येथील गोदामांची धान्य साठवण क्षमता १८०० मेट्रिक टन आहे. पेठ येथे १००० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यात येत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!