विद्यापीठ अनुदान आयोग : सोयीने अभ्यास करा, केव्हाही परीक्षा द्या

विद्यापीठ अनुदान आयोग : सोयीने अभ्यास करा, केव्हाही परीक्षा द्या

नाशिक । प्रतिनिधी

दूर व मुक्त अध्ययन केंद्रातून उच्चशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने अभ्यास झाल्यावर केव्हाही परीक्षा देण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाची स्थापना करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगाने केला आहे. यासाठी तज्ज्ञ समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांवर नियंत्रण आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली होती. यानंतर विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गदा येईल का?याबाबत चर्चा झाली. यानंतर आता दूर व मुक्त अध्ययन शिक्षण प्रकारात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या माध्यमातून कधीही परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, हा विचार यामागे आहे.

दूर व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी हे नोकरी करणारे असतात. अनेकदा त्यांना परीक्षेच्या काळात सुटी मिळतेच असे नाही. यामुळे अनेकदा या विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागते. यामुळे त्यांना जमेल तेव्हा परीक्षा देता यावी यासाठी हे मंडळ काम करेल,असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

उच्चशिक्षणात प्रवेश घेण्याचा दर २०२४ पर्यंत ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. यामध्ये दूर व मुक्त अध्ययन संस्था मोलाची भूमिका बजावणार आहेत. या संस्थांच्या परीक्षा पद्धतीत, अभ्यासक्रमात पारदर्शकता, विश्वासार्हता यावी या उद्देशाने या मंडळाची स्थापना होणे आवश्यक आहे.

हे मंडळ नेमके कसे काम करेल, त्याची उद्दिष्टे व ध्येय काय असतील याबाबत विचार करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला हे मंडळ प्रचलित अभ्यासक्रमांची परीक्षा घेईल. दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षाही याच पद्धतीने घेणे शक्य होईल का, याचाही विचार समिती करेल. याबाबतची तरतूद आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मंडळाच्या धोरणपत्रात आहे.

यावर सूचना मागवण्यात आल्या आहेत. याचबरोबर यामध्ये मागणीनुसार परीक्षा घेण्याची सुविधा असणार आहे. यात कोणत्याही वयात एखाद्या व्यक्तीला आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होईल तेव्हा तो ते पूर्ण करू शकणार आहे.

यासाठी किमान पात्रता पूर्ण असतील तर तो वेबसाईटवर नोंदणी करून त्याला पाहिजे त्या अभ्यासक्रमाची परीक्षा पाहिजे तेव्हा देऊ शकेल, अशी तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास पुस्तिका, सराव परीक्षा संच दिले जाणार आहेत. सध्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठी एनआयओएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहिजे तेव्हा परीक्षा देण्याची मुभा देण्यात येते. याच धर्तीवर हे परीक्षा मंडळ काम करेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com