श्रमिकांनी अवैध व धोकादायक प्रवासाऐवजी एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा- परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब

श्रमिकांनी अवैध व धोकादायक प्रवासाऐवजी एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा- परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब

मुंबई । प्रतिनिधी

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग (RTO) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेली पाच दिवस हजारो श्रमिक – मजुरांना सुरक्षितपणे एसटी बसेस द्वारे राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात येत आहे .

विशेषतः एसटी बसेस योग्य रीतीने सॅनिटाराईज केलेल्या असुन, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यामुळे कृपया, श्रमिक- मजुरांनी अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी केले आहे.

ते म्हणाले की,गेल्या दोन दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता, राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे अशा अवैध व धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई होऊ शकते.तसेच एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांनी आपली मोहिम अधिक तीव्र केली असून, एसटी व राज्य परिवहन विभागांने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातत्याने आपल्या गावी निघालेल्या श्रमिक-मजुरांचा शोध घेवून,त्यांना तातडीने एसटी बसेस उपलब्ध करून देत आहेत.

आज तब्बल १२०० बसद्वारे २७ हजार ५२८ मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या ५ दिवसांत राज्यातील ७२ हजार ९५६ श्रमिक-मजुरांना या सुरक्षित प्रवासी वाहतूकीचा लाभ झाला आहे. असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com