Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ऑटो सेन्स तंत्राने वाहतूक नियंत्रण; ‘गुगल‘ची मदत; त्र्यंबकरोडवरील चार सिग्नलवर प्रायोगिक सुरुवात

Share

नाशिक । अजित देसाई

‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित होणार्‍या नाशिक महानगरात वाहतुकीचे नियंत्रण करणे मोठे दिव्य बनले आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी शहराच्या विविध भागात होणारा वाहतुकीचा खोळंबा एव्हाना नाशिककरांच्या अंगवळणी पडला आहे. शहरातील विविध मार्गांवर असलेली सिग्नल यंत्रणादेखील गर्दीच्या वेळी कुचकामी ठरत असली तरी यापुढील काळात ती बदलणार असल्याची चिन्हे आहेत.

गेला आठवडा मोठी वर्दळ असणार्‍या त्र्यंबकरोडवरील चार सिग्नलवर ऑटो सेन्स या तंत्राने वाहतुकीचे नियंत्रण करायला सुरुवात झाली आहे. सिग्नल परिसरात असणार्‍या वाहनांच्या वर्दळीचा गुगलच्या मदतीने अंदाज घेऊन या सिग्नलची वेळ पाळली जाणार आहे. त्यामुळे वेळ व इंधनाची बचत होऊन प्रदूषण नियंत्रणासदेखील हातभार लागणार आहे.

साधारणपणे सकाळच्या वेळी शहराकडे येणार्‍या तर सायंकाळी शहराबाहेर जाणार्‍या वाहनांची अधिक गर्दी असते. वाहनांच्या या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी असणारी सिग्नल यंत्रणा अलीकडच्या काळात कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

याचे मुख्य कारण निर्धारित केलेल्या सिग्नलच्या वेळा हे आहे. या वेळा गेल्या अनेक वर्षांपासून निश्‍चित असून रस्त्यावर गर्दी असो किंवा नसो हे सिग्नल त्याच वेळेत सुरू असतात. परिणामी अनेकदा सिग्नलवर गरज नसताना चार-सहा वाहने अडकून पडतात. यात सिग्नल तोडण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात घडतात किंवा वाहनधारकांना सिग्नल तोडला म्हणून पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागतो.

ही बाब ओळखूनच गुगलच्या मदतीने ऑटो सेन्स या तंत्रावर आधारित सिग्नल यंत्रणा त्र्यंबकरोडवरील शरणपूर पोलीस चौकी, पंचवटी इलाईट, एबीबी सर्कल व आयटीआय येथील सिग्नलवर कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणची वाहतूक प्रायोगिक नवीन तंत्र वापरून नियंत्रित करण्यात येणार आहे.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत ‘फाल्कन ट्राफिक लाईट’ या कंपनीकडून ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. सिग्नलच्या परिसरात असणारी वाहनांची संख्या गुगल मॅप एपीआय या तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्षात घेतली जाणार असून त्याद्वारे सिग्नलची वेळ निश्‍चित केली जाणार आहे.

त्यामुळे गर्दीच्या वेळेत सामान्य तर इतर वेळी त्याहून कमी कलावधी आपोआप निश्‍चित होऊन वाहतूक नियंत्रित करण्यात येईल. यामुळे सामान्य वेळेत विनाकारण अधिक कालावधी सिग्नलवर वाहन थांबवण्याची गरज पडणार नाही. अतिशय काटेकोरपणे या वेळा निश्‍चित होणार असून सिग्नलवरील हाय डेफिनेशन कॅमेर्‍याद्वारेदेखील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

वेळ वाचणार
फाल्कनकडून पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात भोसरी येथील दोन सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरापासून ही योजना राबवली असून पुढील टप्प्यात तिचा विस्तार केला जाणार आहे. आता नाशिकमध्येदेखील पाच सिग्नल निवडण्यात आले आहेत. या सिग्नलमुळे वाहनांच्या वेळेत आणि इंधनात पर्यायाने पैशाची बचत होणार आहे.

अधिक वेळ सिग्नलवर वाहने थांबणार नसल्याने प्रदूषणातदेखील घट होणार आहे. सॅटेलाईच्या सहाय्याने वाहतूक नियंत्रित होणार असल्याने आटोपशीर मनुष्यबळ लागेल. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखरेख राहणार असल्याने सिग्नल परिसरात पोलिसांनादेखील थांबण्याची गरज राहणार नाही.

वाहतूक व्यवस्थापन (ट्रॅफिक मॅनेजमेंट) या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने या विषयावर काम सुरू आहे. त्याचाही फायदा आगामी काळात महानगरांमधील समस्या मानल्या जाणार्‍या वाहतूक खोळंब्याला होणार आहे. रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांच्या गर्दीनुसार वाहतुकीचे नियोजन राहणार असल्याची माहिती फाल्कनचे प्रकल्प समन्वयक जयेश ठाकूर यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!