आज निर्भया पोलीस मॅरेथॉन

आज निर्भया पोलीस मॅरेथॉन

त्र्यंबकेश्वर, गंगापूररोडसह शहरात विविध मार्गांत बदल

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित निर्भया पोलीस मॅरेथॉन जागतिक महिलादिनी आज रविवारी पहाटेपासून होत आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर, गंगापूररोडसह शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. याची नोंद घेऊन वाहनधारकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम या ठिकाणाहून पहाटे या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनला सिनेअभिनेत्री जान्हवी कपूर, रिंकू राजगुरू, संयामी खेर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. प्रारंभी २१ किलोमीटर नंतर १०, ५ व शेवटी ३ किलोमीटरसाठी धावणार्‍यांना सोडण्यात येणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मॅरेथॉनदरम्यान महिलांसाठी होणारे चर्चासत्र (टॉक शो) रद्द करण्यात आले आहे. तसेच लहान मुले, वयोवृद्ध, चिअर्स लिडर यांचा सहभाग रद्द करण्यात आला आहे. मॅरेथॉनसाठी १८ हजार ४८० जणांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये ५ हजार ७०० महिलांचा सहभाग आहे. संपूर्ण मॅरेथॉन स्थळे व मार्गांवर विविध ठिकाणी हात स्वच्छ करण्यासाठी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. ११० पेक्षा अधिक डॉक्टारांची पथके कार्यरत राहणार आहेत. फलकांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

निर्भया मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी गंगापूररोड, त्र्यंबकरोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल पहाटे ४ वाजेपासून स्पर्धा संपेपर्यंत लागू राहणार आहेत.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू, आयटीआय सिग्नल ते राजदूत हॉटेल, ठक्कर बाजारपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू, राजदूत हॉटेल-मोडक सिग्नल ते अशोकस्तंभ डावीकडील बाजू, अशोकस्तंभ ते गंगापूर गाव (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ टी पॉईंट) डावीकडील बाजू, जेहान सर्कल ते एबीबी सर्कल उजवीकडील बाजू, ठक्कर डोमशेजारील हॉटेल फाईव्ह इलेमेंटशेजारील कॉलनी रस्ता व यंदे बागकडे जाणारा कॉलनी रस्ता हे मार्ग बंद राहणार आहेत.

असे पर्यायी मार्ग
सिटी सेंटर मॉल ते एबीबी सिग्नल जाणारी व येणारी वाहने सिटी सेंटर सिग्नल, त्रिमूर्ती चौक, आयटीआय सिग्नल या मार्गाने त्र्यंबकरोडला जातील व येतील, या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

त्र्यंबक बाजूकडून नाशिककडे येणारी व नाशिक बाजूकडून त्र्यंबक बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने आयटीआय सिग्नल-त्रिमूर्ती चौक- चांडक सर्कल व तेथून इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

त्र्यंबक सिग्नल ते अशोकस्तंभापर्यंत जाणार्‍या व येणार्‍या वाहनांनी रस्ता दुभाजकाच्या उजव्या बाजूच्या (पूर्वेकडील) मार्गाचा अवलंब करावा. अशोकस्तंभ ते गंगापूर गाव या मार्गावरील वाहनांनी रस्ता दुभाजकाच्या उजव्या बाजूच्या (उत्तरेकडील) मार्गाचा अवलंब करावा.

जेहान सर्कल सिग्नल ते एबीबी सर्कल सिग्नलपर्यंत मार्गावरील वाहनांनी रस्ता दुभाजकाच्या उजव्या बाजूच्या (पश्चिमेकडील) मार्गाचा अवलंब करावा.

हॉटेल फाईव्ह इलेमेंट व यंदे बाग कॉलनीरोड परिसरातील वाहनांनी कॉलनीकडून सीसीएम चौकाकडे जाणार्‍या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

मॅरेथॉनचे मार्ग असे

२१ किमी मार्ग : ठक्कर डोंम- ए.बी.बी. सिग्नल-उजवीकडे वळून- महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमीसमोरून मायको सर्कल-जलतरण तलाव सिग्नल-त्र्यंबकनाका-डावीकडे वळून-सीबीएस सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-डावीकडे वळून-के.टी.एच.एम. कॉलेजसमोरील उड्डाणपुलाखालून जुना गंगापूर नाका सिग्नल-जेहान सर्कल सिग्नल-आनंदवल्ली पाईपलाईनरोड सिग्नल- सोमेश्वर-बारदान फाटा-गंगापूर गाव – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ टी पॉईंट-यू टर्न घेऊन जेहान सर्कल सिग्नल-उजवीकडे वळून-महात्मानगर-एबीबी सर्कल.

१० किमी मार्ग : ठक्कर डोम-एबीबी सिग्नल- उजवीकडे वळून-महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीसमोरून पंचवटी सिग्नल-डावीकडे वळून-सीबीएस सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-डावीकडे वळून केटीएचएम उड्डाणपूल-जुना गंगापूर नाका सिग्नल-जेहन सर्कल सिग्नल-उजवीकडे वळून-महात्मानगर-एबीबी सर्कल सिग्नल.

५ किमी मार्ग : ठक्कर डोम-एबीबी सिग्नल-उजवीकडे वळून-महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमीसमोरून पंचवटी बाजूने वळण घेऊन मायको सर्कल-शरणपूरोड सिग्नल-पंचवटी ईलाईट सिग्नल-एबीबी सिग्नल-ठक्कर डोम लाइट सिग्नल-शरणपूररोड सिग्नल-मायको सर्कल-जलतरण सिग्नल येथून उजव्या बाजूने वळण घेऊन शरणपूररोड सिग्नल, एसीबी सिग्नल आणि ठक्कर डोम.

३ किमी मार्ग : ठक्कर डोम-एबीबी सिग्नल- उजवीकडे वळून-महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमीसमोरून यमाह मोटारसायकल शोरूमसमोरून उजव्या बाजूने वळण घेऊन एबीबी सिग्नल-ठक्कर डोम.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com