Saturday, April 27, 2024
Homeनाशिकराज्य वकील परिषदेस आज प्रारंभ

राज्य वकील परिषदेस आज प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेला शनिवार (दि.१५) पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती वकील परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा न्यायालय येथे शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे;तर सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्या.बाबडे यांचा सत्कार वकील परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता,बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ममनकुमार मिश्रा आदी उपस्थित असणार आहेत.

- Advertisement -

परिषदेच्या दुसर्‍या दिवशी रविवार(दि.१६) सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर परिषदेच्या प्रथम सत्रास सुरुवात होणार आहे. या सत्रात न्या.गवई, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर ऑफ इंडिया ए.एन.एस. नाडकर्णी, महाराष्ट्र राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. शेखर नाफडे, अ‍ॅड. राजेंद्र. रघुवंशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी दुसरे सत्र होणार असून यावेळी राज्यातील २६ ज्येष्ठ वकिलांचा ज्येष्ठ विधिज्ञ पक्ष पदवी देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच एन.के.कोकाटे व अ‍ॅड. सुहास मिसर याचा सत्कार होणार आहे. सायंकाळी समारोपाचे सत्र होणार असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे,परिवहन मंत्री अनिल परब, महापौर सतीश कुलकर्णी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, सीबीएस ते मेहेर सिग्नल चौक हा रस्ता दोन्ही बाजूने पूर्णत: बंद राहणार आहे. सीबीएस चौकाकडून मेहेरकडे जाणार्‍या वाहनांनी सीबीएसला डाव्या बाजूकडे वळून टिळकवाडी सिग्नलमार्गे इतरत्र जावे. तसेच इतर पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत. वकील परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान होणार असल्याने १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. यानंतर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडून वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.

भुजबळांकडून पाहणी
या राज्यस्तरीय वकील परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा न्यायालयात कार्यक्रम स्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड.अविनाश भिडे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.नितीन ठाकरे, अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, अ‍ॅड . जालिंदर ताडगे, अ‍ॅड. संजय गिते, माजी आमदार जयवंतराव जाधव, अ‍ॅड.रवींद्र पगार आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या