नाशिकचा पारा १०.३ अंशावर; राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

नाशिकचा पारा १०.३ अंशावर; राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेने विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा गारठल्यानंतर आता नाशिक शहरात थंडीचा मुक्काम वाढला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला मागे टाकत  राज्यात सर्वात कमी १०.३ अंश किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. जिल्ह्यात आज आर्द्रता ८९ टक्के नोंदली गेली असून पहाटे सर्वत्र धुक्क्याची दाट चादर बघायला मिळाली. दरम्यान, विदर्भासह राज्यातील काही भागात तीन दिवसात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

राज्यात नोव्हेंबर व डिसेंबरच्या पहिले तीन आठवड्यात थंडी गायब झाल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यात कडाक्याची थंडीची अनुभूती मिळाली होती. विदर्भातील पारा ५ ते ६ अंशापर्वत गेला होता. उत्तर भारतात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू झाली असून याचा परिणाम महाराष्ट्रापर्यत जाणवू लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पारा ११ ते १२ अंशावर गेला होता. या बदलानंतर आज पुन्हा नाशिकचा पारा १०.३ अंशावर खाली आला. पहाटे आद्रता थेट ८९ टक्के झाल्याने दाट धुक्क्याची चादर बघायला मिळाली.यामुळे पहाटे महामार्गासह राज्य मार्गावर वाहतूक मंदावली. रेल्वेवर देखील परिणाम झाला. मालेगावला १४.२ आणि जळगावला १४.६ अंश तापमान नोंदविले गेले. जिल्ह्यातील द्राक्ष, इतर फळबागा व भाजीपाल्यावर घसरलेल्या तापमानाचा परिणाम जाणवू लागला आहे.

राज्यात नाशिक पाठोपाठ पुण्याला १०.८ अंश, औरंगाबाद ११.६, महाबळेश्वर १३.५, अमरावती १३.६, बुलढाणा व वर्धा १३.८, अकोला १३.९, गोंदिया व यवतमाळ १४, बीड १५.२, सांगली १५.३, कोल्हापूर १६.१, नांदेड १६.५, परभणी १६.६, रत्नागिरी १७.१ अशा तापमानाची काल  नोंद झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com