देशदूत ‘तेजस’ पुरस्कारांनी यशवंत सन्मानित

देशदूत ‘तेजस’ पुरस्कारांनी यशवंत सन्मानित

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक ढोलची लय, टाळ्यांच्या कडकडाट, उत्स्फूर्त दाद, चेहर्‍यावर झळकलेले दिलखुलास हास्य अशा रंगारंग सोहळ्यात ‘देशदूत’च्या ‘तेजस’ पुरस्कारांनी यशवंतांना गौरवण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासून उत्सुकता लागून असलेल्या ‘देशदूत’ तेजस पुरस्काराचे वितरण काल शुक्रवारी (दि.६) ‘देशदूत’ कार्यालयात पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या १४ यशवंतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मानसोपचार तज्ञ डॉ. शिरिष सुळे, लाईफ कोच मंदार राजेंद्र, नगरसेविका हिमगौरी आडके व देशदूतचे अध्यक्ष विक्रम सारडा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक जनक सारडा यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशदूत नेहमी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार तरूणांचे कौतुक करत आला आहे. त्याच परंपरेतून यशशिखराकडे पोहचणार्‍या यशवंतांचा कौतुक सोहळा तेजस पुरस्काराच्या निमित्त्ताने आयोजीत करण्यात आला.

गेली दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पुरस्कार प्रक्रियेत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या युवा पिढीतील यशवंतांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखती लिखित आणि ‘देशदूत’च्या संकेतस्थळावर व्हिडिओसह प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानंतर याच पुरस्काराचा एक भाग म्हणून देशदूतच्या www.deshdoot.com  या संकेतस्थळावर दहा दिवस ऑनलाईन मतदान प्रक्रियादेखील घेण्यात आली होती. यामध्येही जवळपास ७२ पेक्षा अधिक देशातील युजर्सने या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. यावर्षी सहा क्षेत्रांमधून नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये सेल्फ सस्टेन्ड बिझनेस, सामाजिक/सांस्कृतिक, फायनान्स, विधी, वैद्यकीय व प्रगतिशील शेती या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता.

पुरस्कार सोहळ्यात यामधील प्रत्येक नामांकनप्राप्त युवकाची अनोखी भूमिका, अनोखी कथा थोडक्यात सादर करण्यात आली. प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना दाद मिळाली.

याप्रसंगी ‘देशदूत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत ‘देशदूत फिल्म फेस्टिव्हल’ ची माहिती दोन लघुपट दाखवून देण्यात आली. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी या पुरस्कारांचे परिक्षण करणारे परिक्षक डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. श्रिया कुलकर्णी, प्रा. डॉ. मेधा सायखेडकर, अरविंद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ‘यश’या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. यामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाईफ कोच मंदार राजेंद्र, ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. शिरीष सुळे आणि नगरसेविका हिमगौरी आडके-आहेर यांनी सहभाग घेत युवकांना यशाचा परिभाषा समजावून सांगत दिलखुलास गप्पा मारल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पीयु आरोळे यांनी केले.

युवकांनी ध्येयाचा ए बी सी प्लॅन करून ठेवावा : मांढरे

स्पर्धा परिक्षा ही यशाची फुटपट्टी आहे असे समजू नका. यामुळे यशासाठी एकमेव ध्येय ठेवू नका. एक सुत्र – ध्येय घेऊन दोन तीन प्रयत्न करुन यश न आल्यास पदरी निराशा येते. ज्या क्षेत्रात जाण्याची संख्या कमी आहे, ते काम केले पाहिजे. म्हणून एकच ध्येय न ठेवता युवकांनी ए बी सी व डी असे प्लॅन तयार करुन ध्येय यशाचे नियोजन करावेत, मौलिक मंत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज युवकांना दिला.

दैनिक ‘देशदूत’ च्यावतीने आयोजित विविध क्षेत्रातील १४ यशवंताचा तेजस पुरस्कार वितरण सोहळा आज मुख्य कार्यालयात झाला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मानसोपचार तज्ञ डॉ. शिरीष सुळे, महापालिका माजी स्थायी सभापती हिमगौरी आहेर – आडके, लाईफ कोच मंदार राजेंद्र आदी व्यासपीठावर उपस्थित होते. देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी यश – यशवंत चर्चासत्रात मान्यवरांना विविध प्रश्न विचारत त्यांच्या जीवनात दडलेल्या यशाचा उलगडा केला. जगात आज घडत असलेले बदल पाहता हे बदल आत्मसात करुन आपले कार्यक्षेत्र निवडा, असे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, काळानुरुप पारंपरिक व्यवसाय, नोकर्‍या नष्ट होणार असून आज अस्तित्वात नसलेल्या नोकर्‍या पुढच्या काळात येणार आहे. यामुळेच काळानुसार बदल घडत असून भविष्य ओळखून आजच पावले टाका, असेही त्यांनी सांगितले.

राजकारणात मुल्यांचे काम नाही, असे आपणास वाटत नसून राजकारणातही मुल्याचे काम असे माजी स्थायी सभापती हिमगौरी आहेर आडके यांनी स्पष्ट केले, त्या पुढे म्हणाल्या, शिक्षित लोकांनी समाजकारणाबरोबरच राजकारणात आले पाहिजे, यशस्वी जीवनातील मुल्ये हे समाजकारण व राजकारणात आल्या पाहिजे.ही मुल्य जपल्यास आपले शहर, राज्य व देशांचा विकासाचा दृष्टीकोन – दूरदृष्टी तयार होते. यातूनच जास्तीत जास्त लोकांना विकास होईल, असे निर्णय होतात. यामुळे आता सर्वच क्षेत्रात मुल्यांची गरज असल्याचे आहेर – आडके यांनी सांगितले.

तर यश हे योग्य वेळी, योग्य ठिकाणी मिळाले पाहिजे असे सांगत प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. सुळे म्हणाले, मानसोपचार विषयात आपल्याला आवड होती, यातून मला संधी मिळाली, नाशिकचा पहिला मानसोपचार तज्ञ होण्याची संधी मिळाली. हे यश संपादन करतांना वडीलांनी दिलेले संस्काराचे मुल्य जपले. आपल्याकडे पदवी कोणतीही असो तुमच्या प्रशिक्षणार्थीेचे मन लावुन ऐकले गेले पाहिजे. हे कौशल्य जेव्हा येते, तेव्हाच उत्तम व्यक्ती होता येते.

यश – ध्येयासाठी स्वप्न पाहिली गेली पाहिजे. स्वत:हून ते पूर्ण करण्याची तयारी केली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यश मिळते, असेही डॉ. सुळे यांनी सांगितले. तसेच मोठा गोल (ध्येय) असणे महत्वाचे आहे. ध्येय साध्य पर्यत यश मिळविण्यासाठी पध्दत बदलली तर यश मिळतेच, असा मंत्र लाईफ कोच मंदार राजेंद्र यांनी दिला. यश मिळवितांना केवळ पैसा मिळविणे हे महत्वाचे नसून मुल्याद्वारे यश मिळविण महत्वाचे आहे. मी जे करेल, माझ्याकडून उत्कृष्टपणे होईल. जेव्हा मुल्यांची जपवणुक होते, तेव्हाच यश व समाधान मिळते, असेही राजेंद्र यांनी सांगितले.

पुरस्कारार्थी असे

उद्योजक, व्यावसायिक : ऑनलाइन मतदान विजेते – युगंधर तुपे, परिक्षक गुण विजेते – परेश चिटणीस.

सामाजिक, सांस्कृतिक : ऑनलाइन मतदान विजेते – सुजित काळे, परिक्षक गुण विजेते – जगबीर सिंग,

अर्थिक क्षेत्र : ऑनलाइन मतदान विजेते- पीयूष चांडक, परिक्षक गुण विजेते – विशाल पोद्दार

न्याय क्षेत्र : ऑनलाइन मतदान विजेते- अ‍ॅड. पंकज चंद्रकोर, परिक्षक गुण विजेतेे- अ‍ॅड. प्रवर्तक पाठक

वैद्यकीय क्षेत्र : ऑनलाइन मतदान विजेते- डॉ. वैभव पाटील, परिक्षक गुण विजेते – डॉ. चंद्रशेखर पेठे

प्रगतिशील शेती : ऑनलाइन मतदान विजेते- अक्षय देवरे , परिक्षक गुण विजेते – भाऊसाहेब मते

विशेष पुरस्कार ः वैद्य विभव येवलेकर, प्रवीण कमळे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com