Type to search

Featured तेजस नाशिक

तेजस पुरस्कार मुलाखत : समस्यांवर आत्महत्या हा उपाय नाही!- वसंत शेजवळ

Share
तेजस पुरस्कार मुलाखत : समस्यांवर आत्महत्या हा उपाय नाही!- वसंत शेजवळ; Tejas Award-2020, Interview- Vasant Shejval

नाशिक | प्रतिनिधी 

लहानपणापासूनच शेतीची आवड,
पर्यायी पिके घेतात,
द्राक्ष विज्ञान मंडळाचे सदस्य,
आपल्या पिकाचे आपण मार्केटिंग करण्याचा निर्णय,
शेतकर्‍यांनी एकाच पिकावर अवलंबून राहू नये, यासाठी प्रयत्न.

मी ओझर येथे राहतो आणि शेती हा माझा पारंपरिक व्यवसाय आहे. एकोणवीस वर्षांपासून मी शेतीच करत आहे. लहानपणापासून वडील, भाऊ, आजोबांना शेती करताना पाहिले आहे, त्यामुळे लहानपणापासूनच शेतीची आवड निर्माण झाली. आमचे कुटुंब मोठे आहे. आमच्या कुटुंबात ३० ते ३२ लोकं आहेत. त्यामुळे शेतीतले अनेक अनुभव मला माझ्या कुटुंबाकडून ऐकायला आणि शिकायला मिळाले.

आमच्या ओझर गावात द्राक्ष हेच प्रमुख पीक घेतले जाते.परंतु आम्ही फक्त द्राक्ष पिकावर अवलंबून न राहता इतरही पिके घेतो, जसे की टोमॅटो, दुधी, सीमला मिरची, कलिंगड जेणेकरून नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला तरी शेतीचे पूर्ण नुकसान होणार नाही. काही का होईना आपले पीक वाचेल. त्याचा थोडाफार पैसा हाती येईल.

मागच्या वर्षीच्या पावसामुळे आमच्याकडून बागा पूर्णपणे खराब झाल्या. त्यावेळी आम्हाला स्वतःच्या हाताने लावलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे छाटून टाकाव्या लागल्या. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा नुकसान केवळ आर्थिकच नसते तर शारीरिक, मानसिक, भावनिकदेखील नुकसान प्रचंड होते. असे नुकसान पेलणे अनेकांची अवघड ठरते. काहींची तशी क्षमता असते आणि काहींची नसते. कुटुंबाच्या समस्या समोर असतात. परिस्थितीतून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न अनेक शेतकर्‍यांना पडतो. ज्यांना असे नुकसान असह्य होते तेव्हा अशा नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करताना दिसतो.

परंतु, या अडचणीवर आत्महत्या हा उपाय नक्कीच नाही. उलट संकटाशी दोन हात केले तर माणूस अधिक जिद्दीने पुन्हा काम करू शकतो. संकटांवर मात करून यशस्वी होऊ शकतो. गरज आहे ती तुमच्या सकारात्मकतेची. अनिश्चित नैसर्गिक चक्र लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी एकाच पिकावर अवलंबून राहू नये. वेगवेगळी पिके घ्यावीत. त्यांचा अभ्यास करावा. कारण काही पीक नाजूक असतात. त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी लागते.

आम्ही कोणतेही पीक घेताना त्याचे नियोजन आधीच करून ठेवतो. नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे शेती थोडीशी का होईना, पण सोपी झाली आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीही थोडीफार स्मार्ट पद्धतीने करता येते. आम्हीही याच तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेती करतो. उदाहरणार्थ आता ठिबक सिंचन आले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा पिकांना पाणी देण्याची पद्धत आता सोपी झाली आहे. पूर्वीचे पिकांना पाणी देताना होणारे कष्ट, मेहनत आता कमी झाली आहे.

ज्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत, त्यांना भेटी देऊन ते काम ते तंत्रज्ञान आम्ही शिकून घेतो. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळते, त्यामुळे शेतीत फायदा होतो. उदाहरणार्थ आता टोमॅटोसाठी मारचिंग पद्धत आली आहे, ड्रीपिंग पद्धत नवीन आहे, या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते.

आमच्या शेतकर्‍यांचा द्राक्ष विज्ञान मंडळ नावाचा ग्रुप आहे, त्याच्यामार्फत आम्ही आमचे अनुभव एकमेकांना सांगतो, आणि शेतीत सुधारणा करतो. शेतकर्‍यांनी कोणावरही अवलंबून न राहता जर आपल्या मालाचे स्वतः मार्केटिंग केले तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. तसेच प्रत्येक शेतकर्‍यांनी थोडेफार तरी निर्यातक्षम पीक घेण्याचा प्रयत्न केला तर, आपल्या मालाला चांगला भाव मिळतो आणि आपल्याला देशाचेही चांगले नाव होते.

ज्या तरुणांना शेती करायची आहे, त्यांनी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेती करावी. तसेच एका पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पीक घ्यायला हवी आणि कोणतेही पीक घेताना त्याचे नियोजन करायला हवे. ह्या गोष्टींचा जर युवा शेतकर्‍यांनी गांभीर्याने विचार केला तर प्रत्येक शेतीत सोने पिकू शकतो..

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!