Saturday, April 27, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : …तरच स्वत:ची ओळख निर्माण करता येईल! –...

तेजस पुरस्कार मुलाखत : …तरच स्वत:ची ओळख निर्माण करता येईल! – पीयूष चांडक

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या १५ वर्षांपासून सनदी लेखापाल म्हणून कार्यरत,
जीएसटी कायद्यावर सुमारे ८०० पानांच्या पुस्तकाचे लिखाण,
जीएसटी कायद्यावर विविध ठिकाणी सेमिनार, व्याख्याने,
एनबीटी लॉ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ज्ञानदान,
नाशिक ब्रांच ऑफ़ WIRC ऑफ़ इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउन्ट्स व्यवस्थापन समिती सदस्य.

- Advertisement -

दरनिर्वाहासाठी पैसे कमवायचे ही गोष्ट खरी असली तरी तो पैसा एखाद्याच्या मजबुरीतून मुळीच मिळवायला नको, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे घरात वडील वकील असेल तरी मला वकिली करावीशी वाटली नाही. मी माझी स्वतंत्र वाट निवडली. जिथे माझ्या ग्राहकाचा ‘विश्वास’ हीच माझी गुंतवणूक आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेले वासाळी हे माझे मूळ आहे. पुढे आमच्या तीन पिढ्या इगतपुरीमध्येच स्थायिक झाल्या. घरात शेती आणि वकिली अशा दोन्ही गोष्टी आहेत. माझं चौथीपर्यंतच शिक्षण तिथेच झाले. पुढे जवाहर नवोदय विद्यालयासाठी माझी निवड झाली. त्यावेळी मी गुणवत्ता यादीत तिसरा आलो होतो. नवोदय विद्यालयात खर्‍या अर्थाने माझी जडणघडण झाली.

स्वत:च्या विकासाबरोबरच समाजभान काय असते ते समजले. आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. ज्यामुळे पुढे स्वत:ला सिद्ध करता आले. वेगळी ओळख निर्माण करता आली. पुढे बीकॉम आणि वडील वकील असल्यामुळे ओघानेच एलएलबी झालो. अनेकदा वडिलांकडे येणार्‍या लोकांकडे पैसेच नसायचे. मग बहुतांश वेळेला वडील सेवा भावनेने कामे करून द्यायचे. हे मी कायमच पाहायचो. यातूनच मजबुरीतून आपल्याकडे आलेल्या माणसाकडून काय पैसे कमवायचे? असा विचार सतत डोक्यात असायचा. मग पुढे चार्टर्ड अकाउंटंट बनलो. अवघ्या चार वर्षांत परीक्षा पास होऊन २००५ पासून मी सनदी लेखापाल म्हणून सुरुवात केली.

सुरुवातीला काम करताना कुठल्याच प्रकारचे ऑफीस, फर्निचर असे काहीच नव्हते. मला आठवते अगदी जमिनीवर बसून काम सुरू केले. मग हळूहळू काम करत आता स्वत:चे ऑफीस उभे केले. सध्या ११ जण माझ्या फर्ममध्ये काम करतात. या वाटचालीत मला माझी पत्नी सोनालीची मोलाची साथ मिळाली. ती देखील चार्टर्ड अकाउंटंट आहे.

आधीच कायद्याचा अभ्यास झालेला असल्यामुळे सीए म्हणून काम करणे सोपे झाले. काही वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटी कायद्यावर सर्वात आधी सुमारे ८०० पानांचे पुस्तक लिहिले. यातून जीएसटी कायदा समजण्यासाठी संबंधितांना खूप मदत झाली. जीएसटी कायद्यावर प्रकाशित झालेले हे सर्वात पहिले पुस्तक ठरले.

नाशिकच्या आयसीएआयच्या शाखेने याचे प्रकाशन करून पुढे सीए लोकांच्या सेमिनारमध्ये अभ्यासासाठी या पुस्तकाचा समावेश करून घेतला. जीएसटी कायद्यावर विविध ठिकाणी सेमिनार, व्याख्याने झाली. यातून मुळात कायदा काय आहे आणि त्याची अंमलबजावणी, यात येणारे अडथळे याबाबत मार्गदर्शन आणि वेळोवेळी थेट मदतही केली. याशिवाय मी एनबीटी लॉ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवतो. सीए बनण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.

नाशिक ब्रांच ऑफ़ WIRC ऑफ़ इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटंटस् (Nashik Branch of WIRC of Institute of Chartered ­accountants) च्या व्यवस्थापन समिती सदस्य पदाची जबाबदारीसुद्धा माझ्याकडे आहे. याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रीय सहभाग असतो.

रोजच्या धावपळीत छंद जोपासण्यासाठी आवर्जून वेळ काढतो. गिटार वाजवतो. व्हॉलीबॉल खेळतो. मनशांतीसाठी योगा करतो. योगाच्या परीक्षासुद्धा दिल्या आहेत. यशाचे श्रेय मी आईला देईन. तिने केलेल्या संस्कारामुळेच मी प्रगती करू शकलो. आजच्या पिढीला मी सांगेन आयुष्यात वेळेशी स्पर्धा करताना तंत्रज्ञानाची, वेगवेगळ्या गॅजेट्सची नक्की मदत होते.

मात्र त्यांचा वापर करताना गरज ओळखा. माणसांची जागा कधीही कुठलेही गॅजेट्स घेऊ शकणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. जीवनात असलेल्या माणसांचे आणि नातेसंबंधांचे महत्त्व ओळखा. तरच माणूस म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या