Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : मानसिक समाधान हीच माझी ऊर्जा- जगबिरसिंग बिरदी

तेजस पुरस्कार मुलाखत : मानसिक समाधान हीच माझी ऊर्जा- जगबिरसिंग बिरदी

नाशिक | प्रतिनिधी 

बी.ई. मेकॅनिकल, पेशाने शिक्षक ,
दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी १९९६ पासून कामाला सुरुवात,.
मानव उत्थान मंचच्या माध्यमातून पर्यावरण आणि शिक्षणाबद्दल जनजागृती, 
दरवर्षी हजारो मुले आणि त्यांच्या कुटुंबांना याचा लाभ.

- Advertisement -

माझा जन्म जम्मूचा आहे. माझ्या वडिलांच्या सततच्या बदलीमुळे माझे शिक्षण उज्जैन, भोपाळ, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी झाले. भोपाळमधून मी इंजिनिअरिंग पूर्ण केले. नंतर जॉबच्या निमित्ताने २००५ साली मी नाशिकमध्ये स्थायिक झालो. माझे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. आठवी-नववीमध्ये असताना स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचून समाजाप्रती काहीतरी करण्याची प्रेरणा मला मिळाली.

कालांतराने थोडे थोडे काम करायला सुरुवात केली. आम्ही काहीजण नेत्रदान शिबिर, रक्तदान शिबिर भरवायचो. त्यावेळी अशा गोष्टींबद्दल, उपक्रमांबद्दल लोक जास्त जागरुक नव्हते. आमचेही वय कमी होते परंतु आम्ही लोकांना या उपक्रमाचे महत्त्व पटवून द्यायचो. नाशिकला आल्यानंतर काही काळातच मी कोचिंग क्लासेस सुरू केले.

एप्रिल २००६ मध्ये मानव उत्थान मंचची स्थापना केली. यात आम्ही एकूण ५० सदस्य आहोत. या माध्यमातून अनाथाश्रम, वृद्धाश्रम, हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी जाऊन त्यांना मदत करणे, आठवड्यातून एक दिवस जेवणाचा डबा पोहोचवणे असे समोर येईल ते काम करण्यास सुरुवात केली.

२०१२ पासून मात्र आम्ही पर्यावरण आणि शिक्षण या दोनच विषयांवर लक्ष केंद्रित करून काम सुरू केले. २०१२ ते २०१९ पर्यंत आम्ही प्लॅस्टिकबंदी, झाडे लावणे, सोलर वापराची जागरुकता लोकांमध्ये निर्माण करणे याविषयी काम केले. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षण वाढावे यासाठी तेथील शाळांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण केले. आर्थिकदृष्ट्या आम्ही तेवढे सबल नव्हतो त्यामुळे लोकसहभागातूनच आवश्यक त्या गोष्टी शाळांना पुरवल्या आणि आजही पुरवतो.

पर्यावरण आणि शिक्षण याव्यतिरिक्त आम्ही आमचे वार्षिक कामाचे नियोजन केलेले आहे. ठरलेले नियोजन दरवर्षी अंमलात आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न असतो. हे करताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. एखादी गोष्ट आणि चांगले उपक्रम राबवण्यास सरकारी अधिकार्‍यांना सांगणे आम्हाला खूप कठीण जायचे. परंतु आम्ही सतत पाठपुरावा करून काम पूर्ण करायचो.

हे काम करताना मला चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले. चांगला अनुभव म्हणजे आमच्याच सारख्या एका ग्रुपने फूड व्हॅन कन्सेप्ट आम्हाला सांगितली आणि त्यांना मदत म्हणून लोकसहभागातून आम्ही कमीत कमी वेळात एक गाडी उपलब्ध करून दिली, त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उद्देश चांगला असेल तर अनोळखी लोकदेखील विविध कामांमध्ये सहभागी होतात तेव्हा खूप छान वाटते.

वाईट अनुभव म्हणजे आम्ही चांगले काम न करणार्‍या लोकांना अडवायचो पण लोक ऐकायचे नाही. मग वाद व्हायचे.
आम्ही काही वृद्धाश्रमात काम करायचो. अनुभव असा होता की, काही ठिकाणचे लोक सतत काम सांगायचे. त्यांच्या तक्रारीदेखील असायच्या. मग आम्हीच विचार केला, ते असे का वागत असतील? मग आमच्याही लक्षात आले की ते एकटे राहतात. त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता येत नाहीत. त्यांचे ऐकायलाही कोणी नाहीये म्हणून ते आपल्याला सांगतात. आम्हीही कोणतेच काम अर्धवट सोडले नाही. आम्ही त्यांच्या कामांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.

खरेतर मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की माझ्या आवडीचे कामच माझा व्यवसाय आहे. मी जे शिक्षणाचे, पर्यावरणाचे काम करतो आहे तीच माझी आवड आहे. त्यामुळे मला विरंगुळ्यासाठी वेगळा वेळ काढायची गरजच पडत नाही. म्हणून मी कधीच थकत नाही. मला कोणतेच काम अवघड वाटत नाही. आवडीचे काम असल्यामुळे प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच.

मी आजच्या तरुणांना हेच सांगेन की, अशा सामाजिक कामामध्ये जरूर सहभाग घ्या. आपल्या कामामधून थोडा वेळ काढून समाजासाठी नक्की योगदान द्या. प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असे नाही, पण प्रयत्न जरूर करून बघा. यामुळे आपल्याला मिळणारे मानसिक समाधान खूप मोठी ऊर्जा देऊन जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या