Type to search

Breaking News Featured तेजस नाशिक मुख्य बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : आव्हानांंचे ओझे कधीच वाटले नाही- अनिल दहिया

Share
तेजस पुरस्कार मुलाखत : आव्हानांंचे ओझे कधीच वाटले नाही- अनिल दहिया; Tejas Award-2020, Interview- Anil Dahiya

नाशिक | प्रतिनिधी

संघर्ष करत पदवी प्राप्त,
आदिवासी भागातील सामाजिक कामात सक्रीय सहभाग,
या क्षेत्राकडे वळावे यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद.

माझे बालपण नाशिकपासून १५० किलोमीटर अंतरावर नंदुरबार जिल्ह्यात वाण्याविहीर या गावात गेले. आम्ही एकूण चार भाऊ आणि एक बहीण. यात मी सगळ्यात मोठा. तिथे मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. १० वी नंतर तळोदा येथे ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएट झालेला माझ्या शाळेतला मी पहिला विद्यार्थी. माझे वडील शिवणकाम करायचे. आमची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, पण आमच्या शिक्षणात त्यांनी कधीच हयगय केली नाही.

१० वीनंतरच्या काळात मुलांना सीए होता येते, असे काहीतरी ऐकले होते. माझ्या शैक्षणिक कालखंडात मला सगळे शिक्षक खूप उत्तम दर्जाचे मिळाले. मला आमचे अकाऊंटचे भामरे सर आजही आठवतात. त्यांच्यामुळेच मला एवढी प्रेरणा मिळाली आणि आपण काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर १९९० साली मी नाशिकला आलो. इथे मी सीएचा अभ्यास सुरू केला. अशोक मोदी यांच्याकडे मी आर्टिकलशिप केली. त्यांनीदेखील मला खूप प्रेरित केले. त्यांच्याकडे मी खूप काही शिकलो. सीएच्या पहिल्या परीक्षेत नापास झालो, पण हरलो नाही. पुन्हा परीक्षा दिली आणि पास झालो. असा एक एक टप्पा पार करत सीए झालो.

सीए करता करता एका बाजूला कामही करत होतो. म्हणून सीए झाल्यानंतर मला काम शोधण्याची गरज भासली नाही. पण माझ्याकडे स्वतःचे ऑफिस घेण्याइतपत पैसे नव्हते. मग मी घरातून काम करायचो. पॅनकार्ड काढून द्यायचो. तिथून माझ्या कामाची सुरुवात झाली. यामध्ये आव्हाने तर होतीच. पण संघर्ष करत करत मी माझे काम सुरू ठेवले.

या दरम्यान मला हेमंत जोग म्हणून भेटले. त्यांच्याकडे एक इन्कमटॅक्सची रेड केस होती. त्यात मी त्यांना सहाय्यक म्हणून मदत करायचो. तेव्हा मी त्यांच्याकडून काम करण्याचे लॉजिक शिकलो. या संपूर्ण प्रवासात मला सगळ्यांनी खूप शिकवले, खूप पाठिंबा दिला. त्यामुळे आव्हानांचे ओझे मला वाटले नाही. सगळ्या आव्हानांना मी हसत सामोरे गेलो.

काम करत असताना मला चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव खूप आले. आपल्याला आलेल्या अनुभवातून आपण खूप शिकत असतो. चांगले अनुभव चांगले असतातच. वाईट अनुभव आले पण वाईट बघण्याचा दृष्टिकोनच नव्हता. त्यामुळे मला वाईट अनुभव आठवतच नाही. त्यातून काय चांगले घडले हे महत्त्वाचे. आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले तर आपल्याला वाईट काही दिसणारच नाही.

सामाजिक काम हीच माझी आवड आहे. जिथे मी काम करतो त्या सगळ्या वनवासी भागात काम करणार्‍या संघटना आहेत. तेथील मुलांना शिक्षण मिळावे, तेथील मुले, लोकं व्यसनापासून मुक्त व्हावेत, यासाठीदेखील काम चालते. मीदेखील त्या कामात मदत करतो. तिथे गेल्यावर खूप छान वाटते. पुन्हा नव्याने काम सुरू करण्याची उर्मी मिळते आणि हा आता माझा छंद झाला आहे.

या क्षेत्रात आता अनेक मुले येऊ पाहत आहेत. यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की, यात प्रत्येकाला ३ वर्षांची आर्टिकलशिप करावी लागते. त्यामुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. काही मुले हा कोर्स अर्ध्यावर सोडतात, पण आर्टिकलशिपच्या आधारावर तो विद्यार्थी अकाऊंटंट म्हणून कुठेही नोकरी करू शकतो. त्याला रोजगार मिळू शकतो.

आत्ताच्या घडीला नाशिकमध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. चांगल्या प्रकारे शिक्षण सुविधा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. यामध्ये चिकाटी आणि जिद्द असणे खूप गरजेचे आहे. यामध्ये येणारा प्रत्येक विध्यार्थी हा कधी ना कधी नापास झालेला असतोच. अपवादात्मक काही विद्यार्थी हे नापास झालेले नसतात. प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे आणि त्यात सातत्यही हवे. दुसर्‍या क्षेत्रांच्या तुलनेत कमी खर्च असणारा हा कोर्स आहे आणि चांगला मोबदला मिळणारे हे क्षेत्र आहे, असे मला वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे नक्की वळावे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!