Type to search

Breaking News Featured तेजस नाशिक मुख्य बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : तुम्ही नक्कीच यशस्वी शेतकरी होऊ शकता! – अक्षय देवरे

Share
तेजस पुरस्कार मुलाखत : तुम्ही नक्कीच यशस्वी शेतकरी होऊ शकता! - अक्षय देवरे; Tejas Award-2020, Interview-Akshay Devre

नाशिक | प्रतिनिधी 

तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतरही शेती करण्याचा निर्णय, 
द्राक्षांची रशियात निर्यात,
मार्गदर्शनासाठी गावातील शेतकर्‍यांना एकत्र आणतात,
एकमेकांच्या अनुभवातून शिकण्यासाठी क्षेत्रभेटी देतात.

मी मु.पोस्ट वाजगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथे राहतो. मागील पाच वर्षांपासून मी पूर्णपणे शेती करीत आहे. खरे तर शेती हा आमच्या पिढ्या नं पिढ्यांचा व्यवसाय आहे. वर्षभरामध्ये आम्ही द्राक्ष, टोमॅटो, कोबी ही पीके घेतो. आमच्याकडील द्राक्ष रशियामध्ये निर्यात होतात.

शेती करतांना माझ शिक्षण मला उपयोगी पडत आहे. माझं बारावीपर्यंत शिक्षण आमच्या गावातील शाळेत झालं. बारावीनंतर मी आयटीआयचा कोर्स केला. हा अभ्यासक्रमा मी चांगल्या मार्कांनी पास झालो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरतर मला चांगली नोकरी सहज मिळत होती. मी नोकरी केली असती तरी चालले असते. पण शेती माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने मी नोकरी न करता शेतीकडे वळालो.

नवीन पद्धतीने नवनवीन प्रयोग करुन शेती करायची असे ठरवून आम्ही द्राक्ष छाटणी करायला सुरुवात केली. एकंदरीत बदलते हवामान, त्याचा शेतीवर होणारा परिणाम याचा विचार अभ्यास करूनच हा प्रयोग आम्ही केला. आताच्या घडली बघाल तर आमची द्राक्ष छाटणी झालेली आहे. आमचे द्राक्षाचे प्लॉट्स खाली झाले आहेत. यापूर्वी द्राक्षाची शेती करतांना आम्ही कधीच लवकर (अर्ली) छाटणी केली नव्हती. परंतु लवकर छाटणी केल्यावर लक्षात आलं की मालाला बाजारभाव चांगला मिळतो, पूर्वीच्या पद्धतीने द्राक्ष छाटणी केल्यास मालाला बाजार भाव चांगला मिळेलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

हा प्रयोग मी शेती व्यवसायात उतरलो तेव्हाच चालू केला होता. त्यामुळे आता पाच वर्षानंतर अनुभवाच्या जोरावर शेती आणि निसर्गचक्र यात समतोल राखण्यात थोडे यश आलंय. यावर्षी देखील खरे तर आम्हाला अवकाळी पावसाचा फटका बसला. आमचे द्राक्षाचे दोन प्लॉट सडले. पण इतर प्लॉट वाचवण्यात आम्हाला यश आलं.

शेती करतांना द्राक्ष बागांना, इतर पिकांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं, पिकाची खूप काळजी घ्यावी लागते,आपण जरी त्या शेतीचे मालक असलो तरी कुटुंबातील सर्व सदस्यांना गड्याप्रमाणे शेतात काम करावे लागतं. परंतु याचा आनंद अपार असतो. शेतकरी न थकता दिवस-रात्र शेतात काम करत करू शकतो.

आम्ही आमच्या गावातील आणि जवळपासच्या शेतकर्‍यांना दर महिन्याला एकत्र बोलावतो. तज्ञांना बोलावून त्यांचे शेती विषयक मार्गदर्शन, समस्यांवर उपायोजना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर अशा अनेक विषयावर व्याख्यान ठेवतो. जेणेकरून आमच्या गावातील शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल.

तसेच आम्ही गावातले युवा शेतकरी एकमेकांच्या शेतावर जातो, तिथे कोणती पद्धत अवलंबली आहे ते बघतो, आणि कोणाचं काही चुकलं असेल किंवा कोणी पिक उगवतांना कमी पडत असेल, तर त्याला योग्य ते मार्गदर्शन करतो, यामुळे गावातील प्रत्येक शेतकरी सुधारण्यास मदत होते. हे सगळं करतांना माझ्या वडिलांचा, काकांचा, वहिनींची आणि बायकोचा खूप खूप आधार मिळतो. आम्ही एकत्र राहतो, त्यामुळे आनंदा बरोबर संकट सुद्धा वाटली जातात. घरच्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला कृषीथॉनचे दोन युवा शेतकरी पुरस्कार, पंजाबराव देशमुख पुरस्कार मिळाला आहे.

माझे लेखही प्रसिद्ध झालेत. मला आता आपल्या मालाचे मार्केटिंग स्वतः करण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आपल्या मालाची किंमत आम्हीच ठरू शकतो. शेतकर्‍यांना आणि वाचकांना मला हेच सांगायचे आहे की, आधुनिक तंत्रज्ञान आणि तुमची स्वतःची जिद्द, कष्ट करण्याची तयारी असेल तर याचा योग्य वापरामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी शेतकरी होऊ शकता. तसेच एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घेतली तर शेतीत फायदा निश्चित आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!