संतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने सुटका; शाळा प्रवेश तिढा

0
प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्याशी चर्चा करताना रमेश थोरात, विजय कानडे, चंदर वाघमारे आदी. (छाया-वाजीद शेख, सुरगाणा )
सुरगाणा |प्रतिनिधी  आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सप्टेंबर महिना निम्मा उलटला तरी अजून प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांना शासकीय वसतीगृहात सुमारे अर्धा तास कोंडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांची सुटका झाली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सप्टेंबर महिना निम्मा उलटला तरी अजून मुलांना प्रवेश देण्यात आला नाही. तालुक्यातील ४८१ मुला-मुलींचे अर्ज प्रवेशाकरीता मागविण्यात आले होते.

कळवण प्रकल्पाकडुन अद्यापही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली नाही. अर्जाची छाननी करून तालुक्यातील चाळीस मुली व तीस मुले असे सत्तर मुलांची निवड पालकांची मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबविण्या करीता कळवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस. पैठणकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. महाजन यांनी शासकीय वसतिगृहात सुरुवात केली.

यावेळी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील पालक मुलांना घेऊन उपस्थित होते. निवड करीता पालकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. चारशे एक्याऐंशी पैकी फक्त सत्तर मुलांनाच प्रवेश मिळणार असल्याने बाकीचे मुलांना प्रवेशापासुन वंचित रहावे लागणार असून त्यांनी अद्यापही कुठेही प्रवेश न घेतल्याने पालक संतप्त झाले.

पालकांनी वसतिगृहात मुलाखती सुरू असलेल्या खोलीस कुलूप लावून प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यानांच कार्यालयात कोंडून निवड प्रक्रिया बंद पाडली. आम्ही मुलांचे प्रवेश कुठे ही घेतलेले नाहीत त्यामुळे सर्वच मुलांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करीत पालकांनी घोषणा बाजी सुरु केली.

प्रकल्प कार्यालयाने आमची फसवणूक केली आहे. असा आरोप करण्यात आला. अर्धा पाऊण तासाने पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने पोलिसांनी कुलूप उघडून चर्चा केली. सर्वानाच प्रवेश देण्यात यावा अशी लेखी हमी दिल्याशिवाय पालक माघार घेण्यास तयार नाहीत असे सांगत चार तास आरोप प्रत्यारोप सुरू होते.

यावेळी रमेश थोरात, विजय कानडे, चंदर वाघमारे,भास्कर जाधव, देविदास हाडळ, देवराम वाघमारे, गंगाराम धुळे, दानियल गांगुर्डे, रेणुका बागुल, लक्ष्मी म्हसे, तुषार चव्हाण,पार्वती चौधरी आदी पालक उपस्थित होते.प्रवेशा करीता मुलांना दिवसभर उपाशी पोटी रहावे लागले. त्यामुळे पालकांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.

ही तर फसवणूक
प्रकल्प कार्यालयाने पालकांची फसवणूक केली असून मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.कारण त्यांचे कुठेही प्रवेश घेतलेले नाहीत. जागा वाढवून सर्व मुलांना प्रवेश देण्यात यावा.
-देवीदास हाडळ – पालक 

 

LEAVE A REPLY

*