चित्रीकरण परवानगीसाठी नाशिकचे पालकमंत्री व पोलीस आयुक्त यांना निवेदन

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र सरकार व राज्य सरकारने चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याने नाशिक नगरीतही मालेगाव वगळता चित्रीकरणास परवानगी मिळावी यासाठी एकदंत फिल्मसच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री व पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

नाशिक नगरी हे चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तसेच नाशिक शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून त्याठिकाणी चित्रीकरण केले जाते. त्यामुळे चित्रपट निर्मात्याचा नाशिकला येण्याचा कल जास्त आहे.

स्थानिक कलावंतांनाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणची चित्रीकरणे बंद करण्यात आल्याने या कलावंतांवर उपासमारीची वेळ आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारने चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याने अनेक चित्रपट निर्माते नाशिक येण्यास उत्सूक असल्याने नाशिक नगरीत पुन्हा चित्रीकरणासाठी आवश्यक ती परवानगी मिळावी यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांची एकदंत फिल्मसच्या वतीने लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी, अभिनेत्री पल्लवी कदम आणि भारत निकम यांनी भेट घेत निवेदन दिले आहे. पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेत त्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले केंद्र सरकार व राज्य सरकारने चित्रीकरणास परवानगी देताच नासिक मध्ये चित्रीकरणास परवानगी मिळेल असे आश्वासन मा. पो. आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी एकदंत फिल्म्स ला दिले.

नाशिक जिल्ह्यातील अनेक कलावंत चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यामुळे त्यांना चित्रीकरणाच्या वेळेस प्राधान्याने संधी मिळत असते. करोनामुळे चित्रीकरण बंद असल्याने या कलावंतासमोर बरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नाशिक नगरीला चित्रपटातून मिळणारा महसूलही बंद झाला आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन नाशिक नगरीत चित्रीकरणास परवानगी द्यावी.
अमित कुलकर्णी लाईन प्रोड्युसर, एकदंत फिल्मस्

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *