Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात विशेष मिशन ‘इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम’

Share
जिल्ह्यात विशेष मिशन 'इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम'; Special Mission 'Indradhanushya Vaccination campaign' in the district

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० ही लसीकरण मोहीम डिसेंबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व बालके व गरोदर मातांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण व्हावे, यासाठी केंद्र स्तरावरून या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. समाजामध्ये लसीकरणाविषयी चांगल्या प्रकारे जनजागृती होऊन शंभर टक्के लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी गीत आणि नाटक विभाग, पुणे या विभागामार्फत नाशिक जिल्ह्यामध्ये लोक कलाकारांच्या मदतीने कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये ही जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये दहा ठिकाणी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

लोकजागृती कला व कलाचंद पुणे या दोन लोक कलाकारांच्या गटातर्फे वावी, देवपूर, चांदोरी, ओझर, पिंपळगाव, धामणगाव, वैतरणा, अंजनेरी, अंबोली व धोंडेगाव याठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असून मिशन इंद्रधनुष्य बरोबरच ‘मुलगी वाचवा’, कुटुंब कल्याण कार्यक्रम, कुष्ठरोग, क्षयरोग तसेच कुष्ठरोगाचा स्पर्श या मोहिमेविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कलेच्या आस्वादाबरोबर आरोग्य विषयी तसेच महत्त्वपूर्ण लसीकरणाविषयी शंका-कुशंका याचे निरसन कलेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. समज-गैरसमज समजावून सांगितले जात आहेत.

फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी सोडून सर्व ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आपल्या घरातील गरोदर माता व बालकांना लस द्यावयाची राहिली असल्यास जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन आपल्या बालकाचे मातेचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे व आपला जिल्हा शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारा जिल्हा व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांंनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!