Type to search

लासलगावला साकारला सौरऊर्जा वीज प्रकल्प

Featured maharashtra नाशिक

लासलगावला साकारला सौरऊर्जा वीज प्रकल्प

Share
लासलगाव | वार्ताहर
कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी या शेतकर्‍यांच्या बहुप्रतीक्षित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ या योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या ३ प्रकल्पांमधून ३ मेगावॅटपेक्षा अधिकची सौरऊर्जा निर्माण होत आहे. राज्यात महावितरणकडून वितरित होणार्‍या एकूण वीज वापरापैकी जवळपास ३० टक्के वीज ही कृषीपंपासाठी वापरली जाते.
महावितरणकडून सवलतीच्या दरात ही वीज शेतकर्‍यांना उपलब्ध करुन देण्यात येते. पारंपरिक पद्धतीने सध्या कृषीपंपांना चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तर रात्री १० तास वीजपुरवठा होतो. दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याची शेतकर्‍यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी तसेच कृषी क्षेत्राला माफक दरात व आवश्यकतेनुसार वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ हाती घेतली.
महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून या योजनेतील प्रकल्प कृषिपंप वापर अधिक असलेल्या ठिकाणी उभे राहत आहेत. सरकारी, गावठाण, शेतकर्‍यांच्या खडकाळ व पडीक जमिनी आदी ठिकाणी प्रकल्प उभे केले जात आहेत. याशिवाय महावितरणच्या उपकेंद्र तसेच इतर ठिकाणी असलेल्या जागेवरही प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
लासलगाव उपकेंद्र परिसरात जवळपास २० हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेला १.३ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प महावितरणच्या स्वमालकीच्या जागेतील राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता मधुसूदन वाढे, सुरेश सवाईराम, मनीष ठाकरे, अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता प्रवीण सोनवणे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी वावी येथे ०.७३ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सप्टेंबर-२०१८ मध्ये कार्यान्वित झाला आहे. तर वणी येथील ०.९९ क्षमतेचा प्रकल्प मे-२०१९ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झाला आहे. याशिवाय गिरणारे उपकेंद्र परिसरात ०.७९ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वीजनिर्मिती अपेक्षित आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विभागात आश्‍वी खुर्द येथील ०.८८ व कोळपेवाडी येथील ०.६७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक परिमंडळात महावितरणच्या स्वमालकीच्या जागेतील प्रकल्पातून ५.३६ मेगावॅट सौरऊर्जा वापरात येईल. प्रकल्प परिसरात कृषिपंपांचा भार १५.६५ च्या दरम्यान आहे. या सौरऊर्जा वीजप्रकल्पामुळे वीजभारनियमन कमी होणार आहे.
विद्युतपंपांना होणार फायदा
कृषी वाहिनीतून मिळणारी वीज ही पारंपरिक विजेपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. पारंपरिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यासाठी लागणार्‍या कालावधीच्या तुलनेत सौर कृषी वाहिनी उभारण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. त्यामुळे सौर कृषी वाहिनी उभारणीचे काम अधिक गतीने होवु शकते. दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री सिंचनासाठी शेतात जाण्याची गरज उरत नाही. योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांमध्येही समाधानाचे वातावरण राहील. स्वस्त दरात वीज उपलब्ध होत असल्याने सवलतीपोटी देण्यात येणार्‍या सरकारी अनुदानाच्या रकमेतही बचत होणार आहे. पर्यावरणपुरक उर्जेमुळे प्रदुषण नियंत्रीत ठेवण्यात प्रकल्प मोलाचे ठरतील.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!