Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : गाव विकासावरील चर्चेसाठी ‘सॉरी मोबाईल कट्टा’; जायगावच्या तरुणांचा उपक्रम

Share

नाशिक । प्रतिनिधी

संवादाचे प्रमुख साधन बनलेल्या मोबाईलच्या अतिवापराने विसंवाद वाढीस लागला आहे. मोबाईल फोन हा वापरकर्त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असल्याने त्याच्या चांगल्या ऐवजी वाईट परिणामांचीच चर्चा अधिक होते आहे. त्यामुळेच की काय गावावरच्या पारावार रंगणाऱ्या गप्पा आणि त्या माध्यमातून ग्रामविकासाला मिळणारी दिशा हरवली आहे असे वाटते. मोबाईल फोनच्या अतिरेकाचे हे परिणाम लक्षात आल्याने सिन्नर तालुक्यातील जायगावच्या तरुणांनी एकत्र येत “सॉरी मोबाईल कट्टा” सुरु केला आहे.

या अनोख्या उपक्रमात महिन्यातून एक दिवस गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमणारे तरुण आपापले मोबाईल फोन २ तासांसाठी सायलेंट मोडवर ठेवून एकमेकांशी थेट संवाद साधत असून कौटुंबिक सुख-दुःखांसोबत गावात घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचा देखील मागोवा घेत आहेत. मोबाईलच्या अतिरेकाने गावोगावचे बोलके कट्टे मुके बनत चालल्याचे वास्तव चित्र आहे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि गाव पातळीवरील चर्चाही त्यामुळे लोप पावत असल्याने राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी स्थानिक तरुणांना सोबतीला घेऊन सॉरी मोबाईल’ कट्टा ही संकल्पना वास्तवात आणली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर जयगाव येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून दर महिन्यातील एक दिवस किमान २ तास मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून एका जागी जमा करुन हे तरुण विविध प्रकारच्या चर्चांचे फड रंगवून त्यातून गावाच्या विकासाचा मार्ग शोधू पाहत आहेत.

शहराबरोबरच खेडोपाडी कट्ट्यावर एकत्र येणारे तरुणही मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसत असल्याने सवादाच्या बोलक्या जागाही मुक्या झाल्या आहेत. मुलेही मैदानी खेळांपासून दुरावली आहेत. त्यामुळे किमान काही तास या उपकरणास दूर ठेवून पूर्वीप्रमाणे संवादाच्या भिंती बळकट करण्याचे काम ‘सॉरी मोबाईल कट्टा’ या उपक्रमाच्या माध्यमातून जायगावच्या तरुणांनी हाती घेतले आहे.

गावच्या मंदिरात एकत्र आलेल्या तरुणांनी सर्वांचे मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून एका जागी ठेवून द्यायचे. त्यानंतर एकत्र येत आपसातील चर्चेतून कौटुंबिक अडचणी, शेतीचे प्रश्न, गावच्या समस्या त्यावर करावयाच्या उपाययोजना, गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण, तरुणांना नोकरी, व्यवसायानिमित्त मार्गदर्शन आदी बाबींवर किमान दोन तास चर्चा करायची. महत्वाच्या कामाचा अपवाद सोडल्यास या वेळेत कुणीही मोबाईलला हात लावणार नाही.

व्याप्ती वाढविणार

संवादाचे साधन असलेल्या मोबाईलचे सर्वांनाच व्यसन लागले आहे. त्यामुळे माणसातला थेट संवाद हरवला आहे. त्यामुळे सॉरी मोबाईल कट्टा हा उपक्रम सुरु केला आहे. प्रारंभी गाव पातळीवर त्याचे महत्व पटल्यानंतर अधिक संख्येने तरुण या उपक्रमात सहभागी होतील. त्यातून या उपक्रमाची व्याप्ती वाढेल असा विश्वास उपक्रमाचे प्रणेते भारत दिघोळे यांनी व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!