Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : मानोरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सिन्नर : मानोरीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सिन्नर । प्रतिनिधी

शेतावर मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला करत जखमी गेल्याची घटना मानोरी येथे आज (दि.१३) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकर्‍यावर दोडी बु॥ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

- Advertisement -

आज सकाळी ९ वाजता राधाकिसन सहादू सानप हे गोटीराम रामनाथ शेळके, दत्तु बाळा सांगळे यांच्याबरोबर मानोरी-कणकोरी शिवारात असलेल्या आपल्या शेतावर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी ज्वारीच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सानप यांच्यावर अचानक हल्ला केला. सानप यांच्यासह शेळके व सांगळे यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धुम ठोकली. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात सानप जखमी झाले होते. आरडाओरड झाल्यानंतर आजूबाजुला पाणी भरणार्‍या शेतकर्‍यांसह सानप वस्तीवरील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत सानप यांना तातडीने दोडी बु॥ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांचे पती दिपक बर्के, उपसरपंच भारत दराडे यांनीही रुग्णालयात जखमी सानप यांची भेट घेत विचारपूस केली. वनविभागाचे अधिकारी सरोदे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जाऊन पहाणी करत पंचनामा केला. त्यांनतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दुपारी ३ वाजता परिसरात पिंजरा लावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या