शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा

विजयनगर रहिवाशंाची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

0

सिन्नर | दि. २८ प्रतिनिधी शहराचे उपनगर असणार्‍या विजय नगरला गेल्या दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असून पाच ते सहा दिवसांनी होणारा हा पाणीपुरवठाही कमी वेळच होत असल्याने परिसरातील रहिवाशांवर अन्याय होत असल्याची भावना ग्राहक मंचचे जिल्हा संघटक दत्ता शेळके, महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दत्ता येलमामे यांनी मुख्याधिकारी व्यकंटेश दुर्वास यांना निवेदन देत व्यक्त केली. पाणी पुरवठ्याच्या प्रमाणात पाणीपट्टीची आकारणी करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

नगर परिषदेला पाणी पुरवठा करणार्‍या दारणा धरणात वर्षभर मुबलक पाणीसाठा असतो. तरीही शहरातील ग्राहकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्याने ही परिस्थिती उद्भवत असून शहरातील प्रत्येक नागरिक हा नगर परिषदेचा ग्राहक आहे ही बाबच नगर परिषद प्रशासन विसरले आहे. नगर परिषदेचे सर्व कर प्रत्येक नागरिक नियमित भरत असतो.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पाणी पट्टीची बिले नुकतीच नगर परिषदेकडून वितरीत करण्यात आली असून वर्षातील संपूर्ण ३६५ दिवस नियमित पाणी पुरवठा होतो असे गृहीत धरुन पाणीपट्टीची ही बिले वाटण्यात आली आहेत. प्रत्यक्षात वर्षभरात जेमतेम ६० दिवसच पाणी पुरवठा केला जात असल्याने प्रत्यक्ष पाणी पुरवठा होतो, त्याच प्रमाणात पाणीपट्टीची आकारणी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील सर्व नागरिकांना दररोज मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होईल अशा पध्दतीने नगर परिषदेने तातडीने नियोजन करावे व पाण्याअभावी होणार्‍या हालांपासून सर्वांची सुटका करावी. अन्यथा एक ग्राहक म्हणून नगर परिषदेकडून होत असलेल्या अडवणूकीच्या विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागावी लागेल असा इशारा मुख्याधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेत देण्यासही हे रहिवाशी विसरले नाहीत. यावेळी नगरसेवक गोविंद लोखंडे हेदेखील उपस्थित होते.

दिशादर्शक फलक लावा
शहरातील ऐतिहासीक ठेवा असणारे गोंदेश्‍वर मंदिर बघण्यासाठी देशभरातील पर्यटक वर्षभर सिन्नरला येत असतात. मात्र, हे मंदिर नेमके कुठे आहे हे दर्शवणारा एकही फलक शहर परिसरातील रस्त्यांवर लावलेला नाही. त्यामुळे पर्यटकांना रस्त्यात ठिकठिकाणी थांबून मंदिर नेमके कुठे आहे ते जाणून घ्यावे लागते. त्यामुळे शहरात तातडीने दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी शेळके यांनी केली. शहर व उपनगरांमधील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून त्यातून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. विविध आजारांना निमंत्रण देणारे हे गवत नष्ट करण्यासाठी तातडीने सर्व उपनगरांमध्ये तणनाशंकांची फवारणी करावी. किमान तीन महिण्यातून एकदा शहरासह उपनगरांमध्ये तणनाशकाची नियमित फवारणी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

देशमुखनगरमध्ये पाणीटंचाई
गावाबाहेरील देवी मंदिरासमोरील देशमुख नगरमधील रहिवाशांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून आज (दि.२८) नववा दिवस उलटून चालला तरीही पाणी आलेले नाही. वारंवार पाठपुरावा करुनही पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही. आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. या भागातील रस्तेही धड नाहीत. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. आधीच रस्ते धड नाहीत. त्यात पथदिपही बंद असल्याने रात्रीच्या वेळी पायी चालणेही अवघड बनते आहे. नगर परिषदेचे प्रशासन आम्हाला सापत्नपणाची वागणूक देत असून ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागण्याशिवाय आम्हाला पर्याय राहीलेला नाही. ऍड. शेखर कपोते

 

LEAVE A REPLY

*