Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वॉटर बेल.. पाणी पिण्याला सुरुवात; दापूर येथे जि. प. शाळेत अनोखा उपक्रम

Share

सिन्नर । प्रतिनिधी

तालुक्यातील जि. प. शाळा दापूर येथे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, गटविकासधिकारी लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांच्या प्रेरणेने वॉटर बेल हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या महिनाभरापासून राबवला जात आहे.

विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर दर दोन तासाला वर्गातील शिक्षकांंनी तीन टाळ्या वाजवायच्या आणि विद्यार्थ्यांनी त्याचवेळी पिण्याच्या पाण्याने भरून आणलेल्या बाटल्यांमधूून किमान १०० ते १५० मि.ली पाणी पायचे, असा हा उपक्रम आहे. हा उपक्रम दिवसभरात ३ ते ४ वेळा राबविण्यात येत आहे. या निमित्त विद्यार्थी भरपूर पाणी पिऊ लागले आहेत. बाटलीतले पाणी संपले की, शाळेच्या मधल्या सुट्टीतच बाटल्या ते पुन्हा भरून घेऊ लागले आहेत.

दरम्यान, या आरोग्यदायी उपक्रमाचे महत्त्व पालकांना समजावे यासाठी त्यांच्या व्हॉटस्अपवर याबाबत माहिती शाळेच्यावतीने टाकण्यात आली आहे. घरी पालकांनी या उपक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी त्यामागे भावना आहे. उपक्रम छोटा वाटत असला तरी उपक्रमाचे फलित मात्र खूपच चांगले असल्याचे या दरम्यान दिसून आले आहे.

विद्यार्थी पाणी जास्त पिऊ लागल्याने त्यांची क्षमता वाढली. चेहर्‍यावर तेज वाढते अन् भुकही चांगली लागते, अशी मते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शरिरातील पचनक्रिया व्यवस्थित होऊ लागली, पोटाचे विकार कमी होण्यास मदत होऊ लागली. भविष्यकाळातील विविध आजार थोपवण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. जास्त पाणी पिण्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाल्यामुळे वर्गातली उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे.

उपक्रम यशस्वीतेसाठी पल्लवी घुले, सुनंदा कोकाटे, गायत्री रजपूत, मनिषा गोराडे, सुनंदा पवळ, कृष्णकांत कदम, गोरक्ष सोनवणे, निता वायाळ, शितल सोनवणे यांचे सहकार्य लाभत आहे.

वद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी उपक्रम
विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्याचा उद्देशाने केरळ सरकारने राबवलेला हा उपक्रम जिल्ह्यातल्या शाळांनी राबवावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दापूर शाळेने हा उपक्रम शाळेत सुरु केला आहे. त्यासाठी मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे व उपशिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी नियोजन केले. त्यांना इतर शिक्षकांनीही साथ दिल्यानेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला आहे.

तालुक्यातील दापूर शाळा विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांचा बौध्दीक विकास व्हावा यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. केरळ राज्याच्या धर्तीवर सुरू असलेला वॉटर बेल हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. दापूर शाळेने तालुक्यात सर्वप्रथम या उपक्रमाची सुरवात केली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यात त्यांनी सातत्य ठेवावे. त्यांच्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन तालुक्यातील सर्व अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या शाळांनी हा उपक्रम आपापल्या शाळांमध्ये तत्काळ राबवावा.
शिवनाथ निर्मळ, गटशिक्षणाधिकारी

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!