Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

चतुर्थ श्रेणी समावेशासाठी पाठपुरावा करणार; ग्रामपंचायत कर्मचारी मेळाव्यात आ. वाजे यांची ग्वाही

Share

सिन्नर । प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल हे ग्रामीण भागातील तळाचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर गावचा कारभार चालतो. त्यांना चतुर्थ श्रेणी मिळावी यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. येथील ज्वालामाता लॉन्सवर झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.

युनियनचे राज्य अध्यक्ष विलास कुमारवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, राज्य चिटणीस गिरीश दाभाडकर, कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काजी, जिल्हाध्यक्ष नामदेव पावसे, उपाध्यक्ष रशिद कादरी, अर्चना जाधव, सहसचिव बाबा गिते, मुरलीधर माळी, सुनील तुपसौंदाणे, आण्णा महानुभाव आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचारी व कोतवालांच्या मागण्या न्यायाच्या असून युनियनने केलेल्या मागण्यांचा विचार करुन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आ. वाजे म्हणाले. तळागाळातील कर्मचारी हा गावच्या विकासाचं चाक आहे. कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास ग्रामसेवकाची गावाला अडचण भासणार नाही याकडे आ. वाजे यांनी लक्ष वेधले.

कर्मचारी  २४ तास सेवा देतात
सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, अधिकारी व ग्रामस्थांची सर्व कामे फक्त ग्रामपंचायत कर्मचारीच करतो. गावात जन्म-मृत्यु नोंद करणे, आधारकार्ड, मतदान कार्ड जमा करणे, साफसफाई करणे, पाणीपुरवठा करण्यासाठी दोन किलोमीटरवर वीजपंप चालू-बंद करणे व पाण्याची टाकी भरल्यानंतर त्यात ब्लिचिंग पावडर टाकणे अशी कामे ते करीत असतात. एखाद्या दिवशी पाणी नाही मिळाले तरी सर्वांचे बोलणे त्याला ऐकावे लागते. शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी कर्मचारी २४ तास सेवा देत असल्याची माहिती सुरेश कहांडळ यांनी दिली.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची सेवा पुस्तके, पी.एफ. खाते आणि महागाई भत्ता ग्रामपंचायतने महिण्याच्या महिण्याला खात्यावर अदा करावा, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतन श्रेणी मिळावी अशी आमची मागणी आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ८ महिण्यांपासून ऑनलाईन वेतन मिळालेले नाही. जिल्हा परिषदेने शासनाकडे वेतनप्रणालीची मागणी करावी,
संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी या मेळाव्यात सहभागी झाले. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा व्यक्त करत मेळाव्यास उपस्थित सर्व कर्मचार्‍यांचे आभार.
नामदेव पावसे, जिल्हाध्यक्ष

प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
कर्मचार्‍यांचा भविष्यनिर्वाह निधी, सेवा पुस्तके, महागाई भत्ता आदी मागण्या सोडवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी मेळाव्यात सांगितले. त्यानंतर लगेचच तालुक्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांसोबत जिल्हास्तरीय बैठक घेऊन ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!