Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

महिलांनो आशावादी बना; विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांचे आवाहन

Share

सिन्नर । वार्ताहर

चूल आणि मूल या पलीकडे महिलांना कर्तृत्व गाजवायला मोठी संधी आहे. पूर्वी सभांना अंधारात महिला असायच्या आज खुर्चीवर पुढे येत आहेत. पेहराव बदलला, शिक्षण वाढत चालले तरीदेखील अडचणींचा सामना महिलांना करावा लागतो. मात्र, या परिस्थितीत खचून न जाता महिलांनी आशावादी असावे असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केले.

सिन्नर नगर परिषदेच्या वतीने विजयनगरमध्ये उभारण्यात येणार्‍या वारकरी भवनाच्या परिसरात साकारण्यात येणार्‍या रेणुकामाता सभागृहाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे, तेजस्विनी वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली खुळे, पंचायत समिती सदस्या संगीता पावसे, नगरसेविका प्रतिभा नरोटे, तहसीलदार राहुल कोताडे, युवा नेते उदय सांगळे, स्टाइसचे संचालक नामकर्ण आवारे, पंचायत समितीच्या माजी सभापती सुलोचना चव्हाणके आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

एरवी स्वयंपाक घरात महिलांना आरक्षण असते. मात्र, आज महिलांसाठी स्वतंत्रपणे सभागृह उभे राहिले आहे. या सभागृहासाठी मला निधी देता आला हे माझे नशीब समजते. राजकारणी लोक घोषणा करतात. मात्र, त्यांची कामे दुर्बिणीतून बघून देखील सापडत नाहीत. सिन्नरमध्ये आमदार वाजे यांचे काम चांगले आहे. वारकरी भवन उभारण्याचा त्यांचा संकल्प स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल याकडे नामदार गोर्‍हे यांनी लक्ष वेधले.

परिस्थिती खचली म्हणून महिलांनी आत्महत्या करता कामा नये, अंधश्रद्धा पासून दूर राहिले पाहिजे, सासू-सुनामध्ये संवाद महत्त्वाचा आहे; तरच कुटुंब टिकेल आणि येणारी पिढी सुसंस्कृत राहील असे त्या म्हणाल्या. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत शिवसेनेकडून राबवण्यात येणार्‍या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली म्हणजे ती सक्षम झाली असे म्हणता येणार नाही. तर तिला सामाजिक सन्मान मिळाला पाहिजे.

शिवसेनेकडून शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शेतकरी कन्यादान योजना राबवण्यात येत आहे. पीक विम्याच्या बाबतीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट असून गेल्या आठवड्यात सेनेने धक्का दिला म्हणून पीक विम्याचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झालेत. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत युवा नेते आदित्य ठाकरे यांची देखील मोठे काम उभे केले असल्याकडे नामदार गोर्‍हे यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या 55 वर्षांच्या इतिहासात उपसभापतिपदी पहिली महिला म्हणून बसण्याचा सन्मान मला शिवसेनेने दिला असे त्या म्हणाल्या. महिलांचे प्रश्‍न विधिमंडळात आणि रस्त्यावर सोडवण्यासाठी ना. गोर्‍हे या नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. सिन्नरमध्ये वारकरी भवनाच्या परिसरात उभारण्यात येणार्‍या सभागृहासाठी त्यांनी दहा लाखांचा निधी दिला. या निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करण्यात आला असून, शहरातील महिलांना कार्यक्रमासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. तर नगराध्यक्ष डगळे यांनी आभार मानले. किरण मीठे यांनी सूत्रसंचालन केले.या महिला मेळाव्यासाठी नगरपरिषदेच्या नगरसेविका, महिला बचत गटांच्या सदस्य व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

चांगल्या कामाचा श्रीगणेशा
नीलमताई आमदार असताना त्यांनी सभागृहासाठी निधी दिला. त्यांच्या आमदार निधीतून वारकरी भवनाचे काम होत आहे. एका चांगल्या कामाचा श्रीगणेशा नीलमताईंनी केला असून नामदार म्हणून त्या आज सभागृहाच्या उद्घाटनासाठी येतात हा दुर्मिळ योग असल्याचे आमदार वाजे म्हणाले. नीलमताईं सोबतच आमदार रुपनवर यांनी देखील वारकरी भवनाच्या उभारणीसाठी सढळ मदत केली आहे. ही वास्तू आदर्श व्हावी असा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही आमदार वाजे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!