निमात उद्या ‘नेव्हल एव्हीएशन-इंडस्ट्रियल इंटरॅक्शन’

0
सातपूर | प्रतिनिधी मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलातर्फे आयात केल्या जाणार्‍या सामग्रीस पर्याय म्हणून अशा सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणे व त्याकरिता खासगी क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधून स्वयंपूर्णता साधणे या उद्देशाने शुक्रवार(दि.३१)रोजी सकाळी ८.३० वाजता निमा हाऊस येथे नेव्हल एव्हीएशन-इंडस्ट्रियल इंटरॅक्शन या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी व्हेडरशिप रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तसेच सद्यस्थितीत कोणकोणत्या बाबतीत देशांतर्गत उत्पादनाची आवश्यकता आहे, याची माहिती कार्यक्रमात देण्यात येईल. नौदलातर्फे प्रेझेंटेशन सादर करण्यात येणार आहे. यावेळी निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव, नौदलातर्फे रिअर ऍडमिरल व्ही. एम. डॉस, कमांडर एन. बालकृष्णन् तसेच नौदलाच गोवा, मुंबई व कोची येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नौदलातर्फे कमांडर राजेश बाबू व निमातर्फे कार्यकारिणी सदस्य राजेश गडाख समन्वय साधत आहेत.
मेक इन नाशिक उपक्रमांतर्गत निमातर्फे सातत्याने नाशिकमध्ये मोठी औद्योगिक गुंतवणूक यावी, नाशिकमधील उद्योगांना व्यवसाय वाढीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचे आयोजन होत असते. त्यातलाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित होत आहे.
नाशिकमधील उद्योगांमध्ये असलेली क्षमता, नाशिक जिल्ह्यातील उद्योगांसाठी असलेल्या अनुकूल बाबी लक्षात घेता या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिकमधील उद्योगांना व्यवसायवाढीच्या उत्कृष्ट संधी निश्‍चितच उपलब्ध होतील, असा विश्‍वास निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव व नितीन वागसकर, खजिनदार कैलास आहेर, सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव, माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*