Friday, April 26, 2024
Homeनाशिक४३ लाखांचा गुटखा जप्त; नवीन नाशिक परिसरातील सलग दुसरी कारवाई

४३ लाखांचा गुटखा जप्त; नवीन नाशिक परिसरातील सलग दुसरी कारवाई

इंदिरानगर । वार्ताहर

पोलीस उपायुक्त विजय खरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई महामार्ग लगत खत प्रकल्प जवळ ४३ लाखांंचा प्रतिबंधित विमल गुटखा व सुगंधी सुपारी सापळा रचून जप्त करण्यात आला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई महामार्गालगत खतप्रकल्प जवळ संशयितरित्या आयशर ट्रक (एमएच ०४ ईएल ३४६१) दिसून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल योगेश परदेशी यांनी ट्रक रोखला असता तो न थांबता निघून जात असल्याने पाठलाग करत ट्रक थांबविला . चालकाची अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर देत होता.

ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विमल सुगंध सुपारी व गुटख्याचे ९६ पोते आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ४२ लाख ७१ हजार २०० रुपये आणि दहा लाख रुपये ट्रक असा एकूण ५२ लाख ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन संशयित चालक अरविंदकुमार भोलेनाथ विश्वकर्मा (३२, रा. बारजी नसरतपुर, प्रयागराज, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अन्न-औषध सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर व प्रमोद पाटील यांनी गुटख्याची खात्री पटवली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

संशयित ट्रक चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने चौकशित सांगितले की भिवंडी येथे गुटखा घेऊन जाणार होतो पुढे भिवंडी शहरात पोहोचल्यानंतर पुढील पत्ता सांगण्यात येणार होता.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुटख्याचा आयशर ट्रक सापळा रचून पकडण्यात आला असून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पकडलेला गुटखा व सुगंधित सुपारी शहरात कुठे व कसा वितरीत होणार होता याची अधिक चौकशी आम्ही करत आहोत.
– विजय खरात, पोलीस उपायुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या