Type to search

नाशिकचा रणसंग्राम | ‘व्हीव्हीपॅट’ म्हणजे काय रे भाऊ?

Featured maharashtra नाशिक

नाशिकचा रणसंग्राम | ‘व्हीव्हीपॅट’ म्हणजे काय रे भाऊ?

Share

नाशिक | गोकुळ पवार 

(पारावर एक टेबल मांडलेला. दोन-तीन खुर्च्या. समोर गावातील मंडळी तसेच बायामाणसं उन्हातान्हात बसलेली. गडबड गोंधळ चालू आहे.)

पाटलाचा तुक्या : हे बगा, शांत बसा. थोड्याच येळात प्रमुख पाहुने आपल्याकडं येनार हायेत, तवा समद्यांनी थोडं सहकार्य करा.

गुणा : पाटील, कोन येणार हाय व्हं..

पाटलाचा तुक्या : आरं शहरातून सायेब येणार हाय,

तान्या : पण कामून? आता कोनती नवी योजना आली व्हयं का एकादा मोर्च्या काडायचा हाय?

पाटलाचा तुक्या : तसं नव्हं, आपल्या समद्यास्नी निवडणुकीइषयी सांगणार हायेत..

सम्या : पर तात्या, निवडणुकीचं काय एवढं इशेष, तेच ना मतदान करायचं… (तेवढ्यात पाहुणे येतात )

(सगळे गावकरी उभे राहतात. साहेब बसतात. )

पाटलाचा तुक्या : आज आपल्याकडे शहरातील साहेब आले हायेत, ते आपल्याला निवडणुकीइषयी सांगणार आहेत. तर कार्यक्रमाला सुरवात करू.

अधिकारी: नमस्कार, मंडळी! आताच मी ऐकलं कोणीतरी म्हटलं की, निवडणुकीत काय विशेष आहे. तर या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. (सगळी एकमेकांना विचारतात, म्हंजी काय? म्हंजी काय? एकच गडबड चालू होते.)

अधिकारी : हे बघा, व्हीव्हीपॅट म्हणजे व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल नावाचं यंत्र असून ते पहिल्यांदा या लोकसभा निवडणुकीत वापरलं जाणार आहे.
रंग्या: पर साहेब आम्हाला त्याच्याबद्दल कायबी माहिती नाय?

अधिकारी : अहो यासाठी राज्यातील ९६ हजार केंद्रावर ६ लाख सरकारी सेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्यामुळे तुम्हाला ही मंडळी मतदान कसे करायचे तेे सांगेल.

समोरील घोळक्यातून एक स्त्री : अहो पर आम्हाला कस कळंल की, मतदान झालंय म्हणून?

अधिकारी : खूप छान प्रश्‍न विचारलात. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले, त्याबाबत माहिती व्हीव्हीपॅट यंत्रावरील बटन दाबल्यानंतर मिळू शकेल. तसेच मतदान केल्यानंतर सात सेकंदांत मतदाराला पावती मिळणार आहे.

बाळ्या : साहेब पर त्या पावतीवर काय आसंल?

अधिकारी : त्या पावतीवर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नोंदलेला असेल.

सम्या : हा यामुळं आपल्या लक्षात ईल की, आपन कोनत्या उमेदवाराला मतदान केलय ते.

अधिकारी : हो बरोबर.

पाटलाचा तुक्या : हा.. आजून कोनाला काही प्रश्‍न इचारायचे आसतीलं तर इचारा …

तुळश्या : साहेब , काल म्या टीव्हीवर पायलं, ते आचारसंहिता म्हणजे काय वो?

अधिकारी : महत्त्वाचा प्रश्‍न आहे हा. राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात काय करावे आणि काय करू नये, म्हणजेच आचारसंहिता.

समदी मंडळी : आवं सायेब काय बी कळलं नाय…

पाटलाचा तुक्या : सायेब गावाकडची मंडळी हाय.. जरा इसकटून सांगा.

अधिकारी : हो तर निवडणुकीच्या काळात तुमच्या गावात उमेदवार किंवा राजकीय पक्ष वाद होईल असे काहीही बोलणार नाही. तसेच मतांसाठी पैशांचे किंवा इतर गोष्टीचं आमिष दाखवणार नाही. महत्त्वाचे उमेदवाराला आपला प्रचार रात्री दहा वाजेच्या आत संपवणे आवश्यक राहील.

दिन्या : सायेब ही आचारसंव्हिता किती दिस आसते?

अधिकारी : आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असतो.

एक जण : म्या तर आसं वाचलं की, आचारसंहिता लागू झाली तव्हा एका महापौरांन आपली गाडी रस्त्यातच टाकून दिली म्हनं…

अधिकारी : खरे आहे तुमचे, आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसेच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊस इथे हक्क गाजवता येत नाही. असे केल्यास आचारसंहितेचा भंग ठरतो.

रंग्या : पर सामान्य मानसावर आचारसंव्हितेचा काही परिनाम व्हतो?

अधिकारी : होतो ना, सामान्य माणसाला एकत्र येऊन कार्यक्रम करता येत नाहीत?

बाळ्या : अहो सायेब, अहो पुढल्या महिन्यात लगीन हाय माझं ..तवाबी जमता येणार नाय का?… (सगळे जण हसू लागतात.)

अधिकारी : अरे तस नाही. म्हणजेच शासकीय कामे होणार नाहीत किंवा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला अडथळा निर्माण होईल. लग्नासारख्या कार्यक्रमांना काही अडचण येणार नाही.

तान्या : सायेब अजून एक प्रश्‍न होता. माझं नाव नोंदवलेलं नाय, मग आता मला नाव नोंदता येईल का?

अधिकारी : होय, करता येईल. येत्या ३० मार्चपर्यंत आपल्याला मतदार नावनोंदणी करता येणार आहे. ज्या कोणी मतदार नावनोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित करा आणि निवडणुकीत आपले बहुमूल्य मत नोंदवा.

पाटलाचा तुक्या : चला, पाहुण्यांस्नी आराम करायचा हाय. तव्हर तुम्हीबी कायतरी खाऊन या!

( सारे जण आपल्या घराकडे निघतात.)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!