Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकच्या रंगपंचमीची ‘रहाड संस्कृती’ : तांबट लेनमधील ‘रहाड’

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पेशवेकालीन पाषाणातील दगडाचे बांधकाम असलेली ही रहाड गेली ४० वर्षांपासून दुर्लक्षित झाली होती. परंतु युवा कार्यकर्त्यांनी या रहाडीची पुर्ण माहिती घेऊन ही परंपरा पुन्हा नेटाने चालवण्याचा निर्धार करत मागील ३ वर्षांपासून पुन्हा ही रहाड सुरू केली आहे. यासाठी तांबट लेन परिसरातील पाच ते सहा मंडळाचे कार्यकर्ते जुनी तांबट लेन मित्र मंडळ उत्सव समितीच्या नावे एकत्र आले आहेत.

या भागात पुर्वपार तांबट मंडळी राहत होती. तांब्यांची भांडी ठोकणे, त्यांना आकार देणे अशी शारिरीक कष्टाची कामे करावी लागत असत. यामुळे ताकद कमावण्यासाठी तसेच ती जाहीररित्या दाखवण्यासाठी येथे पेशवे काळातच कुस्तीच्या हौदाची निर्मिती करण्यात आली होती. पुढे येथील कुस्त्या बंद झाल्यानंतर इतर रहाडींप्रमाणेच याचा उपयोग रंगाचा उत्सव करण्यासाठी होऊ लागला.

तांबट लेन येथील ह्या  रहाडमध्ये पुजा तसेच पहिली उडी मारण्याचा मान विविध पाच कुटुंबियांना दिला जातो. यामध्ये लोणारी, तांबट, गुर्‍हाडे यांचा सामावेश असून दरवर्षी दोन नव्या कुटुंबियांना संधी दिली जाते. एकुण ५ जणांना हा मान मिळतो. त्यांनी उड्या मारल्यानंतर इतरांसाठी रहाड खुली केली जाते.

येथील रंग हा केशरी किंवा लालसर असतो. ही रहाड १२ बाय १२ फुट रूंद तर उंचीला १५ फूट खोल आहे. ही सर्वात खोल रहाड असल्याने या ठिकाणी रहाडीत उड्या मारणारांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते. यासाठी रहाडीभवती मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कडे असते. या कड्यातून ५ च्या गटानेच नागरीकांना रहाडीत उतरवले जाते. रहाडीवर आडवी बल्ली तसेच चारही कोपर्‍यात खाचा असल्याने रहाड खोली असली तरी वरती येणे सोपे आहे असे असले तरी चारही कोपर्‍यावर ताकदवान कार्यकर्ते रंगात उतरलेले असतात तर त्यांनी बाहेर काढलेल्या व्यक्तीला खेचण्यासाठी कार्यकर्त्यांची साखळी तयार असते. रंगासाठी पळसाची फुले तसेच इतर फुलांचा वापर केला जातो.

रंगासाठी औषधी वनस्पतींचा वापर
या रहाडचा रंग केशरी असून रंग तयार करण्यासाठी कासं – पांस, पळसाची फुले, तुळस, चंदन यांचा वापर केला जातो. यासाठी सुमारे १५० किलो फुले तसेच साहित्य वापरले जाते. आदल्या दिवशी सर्व फुले विविध कढयांमध्ये रात्रभर उकळत ठेवली जातात. रंगपंचमीच्या दिवशी त्याचा अर्क पाण्याने भरलेल्या रहाडीत टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार केले जाते. वनऔषधींचा वापर असल्याने याचे शरीराला लाभ होत असल्याचा दावा केला जातो.

वैशिष्ट्ये
* रंंग केशरी
* रूंदी १२ बाय १२ फुट
* खोली १३ फुट
* नैसर्गिक फुलांचे रंग
* सर्वात खोल आकार
* महिलांसाठी खास वेळ

परंपरा पुन्हा सुरू केली
तांबट लेन येथील रहाड ही पाषाणातील दगडात तयार केलेली पेशवे कालीन रहाड आहे. शेकडो वर्षापासून या रहाडीत रंगोत्सवाचा आनंद घेतला जाण्याची परंपरा होती. परंतु ४० वर्षापुर्वीच्या कालावधीत मोठी सामाजिक  उलथापालथ झाल्याने ही रहाड काही वर्षे बंद ठेवण्यात आली नंतर तीचा विसर पडला. परंतु येथील जुन्या जानत्या नागरीकांनी माहिती दिल्यानंतर परिसरातील सर्व मंडळांनी एकत्र येत पुन्हा ही परंपरा सुरू केली आहे.
– मनोज लोणारी, कार्यकर्ता

महिलांसाठी खास वेळ
पारंपारिक रहाडमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. तसेच आताही अनेक रहाडीत महिलांना प्रवेश दिला जात नाही. परंतु ही प्रथा मोडून काढत तांबट लेन येथील रहाडीत दुपारी अडीचे ते सायंकाळी पाच हा वेळ खास महिलांसाठी देण्यात येणार आहे. यावेळी जीवरक्षक म्हणुनही महिलाच कार्यरत असणार आहेत. मंडळाचे ठरावीक कार्यकर्ते सोडले तर पुरूषांना त्या काळात तेथे प्रवेश बंद असणार आहे.
– सतीश ऐडेकर, कार्यकर्ता

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!