Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

राणेनगरचा बोगदा वाहतुकीस अडथळाच; दिवसें दिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ 

Share

नवीन नाशिक । प्रतिनिधी

उड्डाणपुलाखाली राणेनगर व गोविंदनगर याठिकाणी उभारण्यात आलेले भुयारी वाहतुकीचे बोगदे हे वाहतुकीस अडथळा ठरत असून गोविंदनगर येथील बोगद्यातील वाहतुकीचा प्रश्‍न काही अंशी मार्गी लागला असला तरी राणेनगरला मात्र तास न तास वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे लक्षात आले असून याठिकाणी बर्‍याचदा वाहतुक पोलीस कर्मचारी नसल्याने अनेकदा वाहनधारकांमध्येच वाद होत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरातील उड्डाणपुलावर गोविंदनगर येथे भुयारी मार्ग सुरु करण्यात आल्यानंतर याठिकाणीही कायमच वाहतूक ठप्प होत होती, त्याचबरोबर येथील वाहतूकीत अनेकदा अपघात होऊन नागरिकांचे प्राण गेले असल्याने याठिकाणच्या वाहतुकीत बदल करूनच याठिकाणी कायम पोलीसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या उलट परिस्थिती ही राणेनगर येथील बोगद्याकडे बघावयास मिळते.

राणेनगर येथील बोगद्यात समांतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणार्‍या वाहनांबरोबरच नवीन नाशिक आणि इंदिरानगरकडून येणारे वाहने याठिकाणी एकत्र येत असल्याने या बोगद्यात कायमच वाहतुकीचा खेाळंबा होत असतो. सायंकाळी दररोज याठिकाणी कंपनीतून येजा करणाऱ्यांना या वाहतुकीच्या खोळंब्याला सामोरे जावे लागत असते. तास न तास याठिकाणी वाहने उभेच राहत असतांनाही वाहतूक पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून आले आहे.

या परिसरात राहणारे किँवा काही व्यवसायिक ही वाहतुक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेत असतात मात्र वाहनधारकांमध्ये यावरून वादविवाद होवू लागल्याने या स्थानिकांनीही वाहतुक सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचे समजल्यावर वाहतूक पोलीस येऊन वाहतूक सुरळीत करीत असले तरी याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीसांची नेमणूक का केली जात नाही असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तसेच या बोगद्यापासून जवळच असलेल्या अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारीही याकडे लक्ष देत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. राणेनगर येथे होना ऱ्या या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे अपघात होवून कोणाचा जीव गेल्यावर पोलीस कारवाई करणार काय असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

राणेनगर येथील बोगद्यात दररोजच सायंकाळी वाहतूक ठप्प होत असते. कंपनीतून घराकडे जाणार्‍या कामगारांना तासन्तास याठिकाणी वाहतुकीत अडकावे लागत असते. पोलीस याकडे लक्ष का देत नाही हाच प्रश्‍न आहे. याठिकाणी कायमस्वरूपी वाहतुक पोलीस नेमण्यात यावा.
– अशूतोष कदम

राणेनगर येथे असलेल्या बोगद्याजवळ बर्‍याचदा पोलीस थांबत नसल्याने येथील वाहनधारकांना शिस्तच लागत नाही तसेच अनावश्यक ठिकाणी वाहने तपासणीच्या नावाखाली पोलीसांना उभे करण्यापेक्षा वरिष्ठांनी वाहतुकीचा खोळंबा होणार्‍या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
– राहुल सोनवणे

राणेनगर येथील बोगदा हा पहिल्यापासूनच धोकादायक आहे. एकीकडून चढ आणि दुसरीकडून उतार अशा ठिकाणी हा बोगदा असल्याने बर्‍याचदा याठिकाणी गाडी उभी करतांना अडचण होत असते. त्यातच मागील काही दिवसांपासून याठिकाणी दररोज सायंकाळी वाहतूक ठप्प होत असल्याने अडचण निर्माण होत आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी याठिकाणी उभे असतात मात्र ते वाहतूक सुरळीत करीत नाहीत.
– बाळासाहेब सांगळे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!