Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांना धक्का; रेल्वेची भाडेवाढ

Share
नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांना धक्का; रेल्वेची भाडेवाढ Railways hikes passenger fare

नवी दिल्ली। वृत्तसंस्था

नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात रेल्वे प्रवास महाग झाला आहे. रेल्वे प्रवासाचे दर आज पासूनच लागू होणार आहेत. लोकल तिकिटांच्या दरांमध्ये आणि रेल्वे पासच्या दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे. देशभरात महागाईने उच्चांक गाठला असताना रेल्वेच्या प्रवासी भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला आणखी झळ पोहोचणार आहे.

वातानुकूलित शयनयानपासून (एसी) ते सामान्य श्रेणीपर्यंत (जनरल) रेल्वेने प्रति कि.मी.साठी १ ते ४ पैशांची वाढ केली आहे. रेल्वेने उपनगरीय प्रवाशांना दिलासा दिला असून उपनगरीय रेल्वे भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही. सामान्य ट्रेनच्या द्वितीय श्रेणीचे (नॉन एसी सेकंड क्लास) भाडे प्रति कि.मी. एक पैशाने वाढले आहे. तर शयनयान श्रेणी (स्लीपर क्लास) आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. एक पैशाने वाढले आहे. मेल, एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता प्रति कि.मी. २ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत.

शयनयान आणि प्रथम श्रेणीच्या भाडे शुल्कात प्रति कि.मी. २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मेल, एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रति कि.मी. ४ पैसे अधिकचे मोजावे लागणार आहेत. वातानुकूलित चेअर कार, वातानुकूलित ३ टियर, वातानुकूलित २ टियर आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. ४ पैशांनी वाढवले आहे. दरम्यान, देशातील आर्थिक मंदीचा विपरीत परिणाम भारतीय रेल्वेवरही झाला आहे.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी ही प्रवासी भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेली कित्येक वर्षे रेल्वेने भाडेवाढ केलेली नाही. गेल्या वर्षी संसदेच्या एका समितीने निश्चित कालावधीसाठी रेल्वे भाड्याचा आढावा घेण्याची शिफारस केली होती. समितीने रेल्वे भाडे व्यावहारिक ठेवण्याचेही स्पष्ट केले होते. भारतीय रेल्वेचे उत्पन्न गेल्या दहा वर्षांतील नीचांकावर पोहोचले आहे. रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो २०१७-१८ मध्ये ९८.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की रेल्वेला १०० रुपयांची कमाई करण्यासाठी ९८.४४ रुपये खर्च करावे लागतात.

शताब्दी,दुरांतोचीही भाडेवाढ
शताब्दी, राजधानी, दुरांतो यांसारख्या प्रीमियम गाड्यांनाही भाडेवाढ लागू असणार आहे. आता दिल्ली-कोलकाता मार्गावर धावणारी राजधानी एक्स्प्रेस १ हजार ४४७ कि.मी. मार्गक्रमण करते. नव्या भाडेवाढीनुसार, राजधानीच्या शुल्कात ५८ रुपयांची वाढ होणार आहे. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क यामध्ये वाढ करण्यात आली नसून यापूर्वी आरक्षित केलेल्या तिकिटांना ही भाडेवाढ लागू असणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!