Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमालेगावसाठी रेल्वेचे ३८५ पोलीस दाखल, ग्रामीण पोलिसांना मिळणार दिलासा

मालेगावसाठी रेल्वेचे ३८५ पोलीस दाखल, ग्रामीण पोलिसांना मिळणार दिलासा

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्ह्यातील अर्धी पोलीस यंत्रणा मालेगावी कार्यरत आहे. तर दुसरीकडे करोनाची पोलीसांमध्ये लागन होण्याचे प्रमाणही वाढत असून हा आकडा ९० च्यावर पोहचला आहे. यामुळे मणुष्यबळ अपुरे पडत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या मागणीवरून शासनाने रेल्वेचे ३८५ पोलीस अधिकारी व सेवक मालेगाव बंदोबस्तासाठी उपलब्ध केले आहेत. यातून ग्रामीण पोलीसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

शुक्रवारी (दि.८) मालेगाव येथील पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दाखल झालेल्या सर्व लोहमार्ग पोलीस अधिकारी तसेच सेवकांना मार्गदर्शन करून त्यांना बंदोबस्ताचे सूचना दिल्या. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना करोना विषाणू पासून वाचण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात करोनाचा प्रसार मोठ्या वेगाने वाढत असून जिल्ह्यात करोना ग्रस्तांचा आकडा सव्वा सहाशे झाला आहे. यातील एकट्या मालेगावात पाचशे पेक्षा अधिक करोनाग्रस्त आहेत. यात सर्वाधिक आकडा तेथे सेवा देणार्‍या पोलीसांचा आहे. मालेगाव येथे करोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या मालेगाव येथे १ हजार ८०० पेक्षा अधीक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तर स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक संदिप घुगे हेही तेथे तळ ठोकून आहेत.

मालेगावातच सुमारे ९० पेक्षा अधिक पोलीस तसेच एसआरपीएफ च्या जवानांना करोनाने ग्रासले आहे. मुळात अपुरे मणुष्यबळ अशात करोनाची लागण, तर सातत्याने धोकादायक परिसरात गस्त, बंदोबस्त यामुळे पोलीसांचे मनोबल कमी झाले आहे. सर्वांच्या सुट्या रद्द असल्याने पोलीस थकून गेले आहेत. यामुळे मालेगावी बाहेरून जादा कुमक देण्याची सातत्याने मागणी अधीक्षक डॉ. सिंह यांनी केली होती. त्यानुसार अखेर शासनाने लोहमार्ग पोलीस दलाचे ३५ अधिकारी व ३५० कर्मचारी मालेगावसाठी उपलब्ध केले आहेत. यामुळे पोलीस दलास मोठा दिलासा मिळाला असून सातत्याने कार्यरत असलेल्या पोलीसांना काहीसा आराम मिळण्याची शक्यता आहे.

डॉ. सिंह यांनी नव्याने आलेल्या सर्व अधिकारी व सेवकांना बंदोबबस्ताचे वाटप केले. सर्व प्रभारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, राज्य राखीव पोलीस दल जालना चे समादेशक अक्षय शिंदे, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत बच्छाव उपस्थित होते.

पोलीस दलास मोठी मदत
शासनाने ३८५ लोहमार्ग पोलीस अधिकारी, सेवक उपलब्ध करून दिले आहेत. मालेगाव येथील कार्यरत सर्व पोलीस दलास त्यांची मोठी मदत होणार आहे. या सर्वांना आपल्या वागणुकीमुळे कोणालाही त्रास होणार नाही व सर्वां सोबत पोलिसांनी सौदर्यपूर्वक वागावे याबाबत बंदोबस्ताचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या होमिओपॅथीच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. तसेच त्यांना सर्व सुरक्षा साधने पुरवण्यात आली आहेत.
– डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या