Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी

नाशिक । प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी (दि.३०) नाशिकमध्ये येत असून ते विभागातील महत्त्वाच्या योजना व प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. ठाकरे यांच्या दौर्‍याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. रंगरंगोटी, परिसरातील गार्डनमधील गवत काढणे, सीसीटीव्ही तपासणे, परिसराची स्वच्छता आदी कामे केली जात आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, वीजपुरवठा, आवास योजना, पेयजल योजना, आरोग्य सुविधा आणि आदिवासी उपाययोजनांची माहिती घेणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र बैठक घेतली आहे. त्यांच्यासोबत त्या-त्या विभागांचे मंत्री, आमदार, सचिव, स्थानिक अधिकारी यांची बसण्याची, प्रतीक्षा कक्षाची अन् जेवणासह सर्वच बाबींची व्यवस्था करण्याची जोरात तयारी सुरू आहे. त्यात प्रथम नंदुरबार नंतर धुळे, अहमदनगर आणि शेवटी नाशिक जिल्ह्याची सायंकाळी ७ वाजता बैठक घेतली जाईल. दुपारी १२ नंतर आढावा बैठकीला सुरुवात होईल. त्यासाठी जिल्ह्यातील आमदारदेखील उपस्थित राहणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात मुख्यमंत्री, मंत्री आणि सचिव असतील. तेथेच अ‍ॅन्टी चेंबरला जेवणाची व्यवस्था असेल. अपर जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात काही सचिवांची जेवण आणि बसण्याची व्यवस्था असेल. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आमदारांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर सर्व खातेप्रमुख, अधिकारी हे नियोजन भवनमध्ये बसतील. बैठक जिल्हाधिकारी कक्षातील सभागृहात होईल. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्याची बैठक संपेल ते लागलीच निघून जाणार असून प्रत्येक जिल्ह्यास त्यांची बैठकीची वेळ दिली जाणार असल्याने त्याच वेळेत तेही पोहोचणार असल्याने गर्दीवर नियंत्रण राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पार्किंगचे विशेष नियोजन
बैठकीला पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व सचिव उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसर पार्किंगसाठी अपुरा ठरणार आहे. ते बघता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री, मंत्री व लोकप्रतिनिधी यांची वाहने पार्क केली जातील. सचिव व इतर महत्त्वपूर्ण लोकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कन्या शाळेच्या परिसरात वाहने पार्किंग केली जातील. तर सेवकांना शिवाजी स्टेडियमची जागा दिली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या