Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककरोनासंदर्भात प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर : राधाकृष्ण गमे

करोनासंदर्भात प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर : राधाकृष्ण गमे

गरज पडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

अलीकडच्या काही दिवसांत परतलेले अनिवासी भारतीय व पर्यटन किंवा कार्यक्रमांसाठी परदेशातून आलेल्या नागरिकांना काही आजारानिमित्त खासगी रुग्णालयात दाखल केल्यासंदर्भात महापालिका किंवा जिल्हा रुग्णालयांना माहिती न दिल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. करोना साथीवर प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याने यानुसार नागरिकांनी काळजी घ्यावी. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधक उपाय म्हणून पूर्वतयारी केली जात असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नाशिक एडिटर फोरमसोबत झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त गमे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजना व प्रतिबंधक स्वरुपातील कामे यासंदर्भात माहिती दिली. बैठकीस ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, पुढारीचे निवासी संपादक सुधीर कावळे, बाबा गायकवाड, अनिकेत साठे यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिका वैद्यकीय विभागाकडे फिजिशियनची संख्या कमी असल्याचे सांगत आयुक्त म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २५० खासगी रुग्णालयांतील फिजिशियनची गरज पडल्यास मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात फिजिशियन असोसिएशनसोबत चर्चा झाली असून त्यांनी यासाठी आश्वासन दिले आहे. विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांसंदर्भातील दररोजची माहिती महापालिका व जिल्हा प्रशासनाला मिळत आहे.

तापसदृश आजार असलेल्या प्रवाशांना तत्काळ खासगी रुग्णालयात न ठेवता जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचे काम केले जात असून त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन तो तत्काळ तपासणीसाठी पाठवण्याचे काम सुरू आहे. तसेच हा रुग्ण विमानतळावरून घरापर्यंत येताना कोणा-कोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेऊन यानुसार स्वतंत्र उपचार व प्रतिबंधक उपाययोजना यानुसार जिल्हा रुग्णालयाकडून उपचार केले जात आहेत. शहरातील एका खासगी रुग्णालयाने परदेशातून आलेल्या एका रुग्णावर उपचार सुरू केले. याची माहिती कळवली नसल्याचा प्रकार लक्षात आला आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये. असा प्रकार घडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

राज्यात करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काही मोठ्या यात्रा रद्द करण्यात आल्या असून औरंगाबादला तर शिवजयंती मिरवणूक रद्द करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. या साथीला बळी पडू नये म्हणून गर्दीत न जाणे म्हणजे प्रतिबंध हाच उपाय असल्याचे सांगत आयुक्त म्हणाले, राज्यातील स्थिती पाहता संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून महापालिका, जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालये यांच्यामार्फत संभाव्य तयारी करण्यात आली आहे. तसेच बिटको रुग्णालय व काही खासगी रुग्णालयांत वैद्यकीय उपचार आणि स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. करोनासदृश आजार असल्यास संबंधितांना चौदा दिवस रुग्णालयाऐवजी स्वतंत्र जागी ठेवण्याची तयारीदेखील जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

लागण होऊ नये म्हणून काळजी घ्या
करोना विषाणूची हवेतून लागण होत नसून एकमेकांना झालेला स्पर्श, शिंकल्यानंतर बाहेर पडणारा द्रव यातून याची लागण होते. रुग्ण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला त्यांना याची लागण होते. यामुळे अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवण्याची गरज आहे. यावेळी संबंधित संशयास्पद व्यक्तींनी ‘माझ्यामुळे साथीचा फैलाव होणार नाही याकरिता आपण चौदा दिवस कुटुंबाच्या हितासाठी बाजूला राहू’ हा संदेश नागरिकांत जाणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

डेंग्यूप्रमाणेच करोनासंदर्भात उपाययोजना
मागील काही महिन्यांत महापालिका वैद्यकीय विभागाला डेंग्यू साथीला अटकाव करण्यात यश मिळाले आहे. याकरिता शहरातील डॉक्टरांचा एक ग्रुप तयार करून यावरून तत्काळ रुग्णांची माहिती कळवणे आणि तत्काळ रुग्णांचा नमुना घेऊन त्यांचा अहवाल रुग्णांच्या नातेवाईकांना दिला जात होता. याकरिता डॉक्टरांचे एक पथक कार्यरत होते. परिणामी डेंग्यूच्या एनएसवन चाचणीनंतर डेंग्यू झाल्याचे प्रमाण केवळ १० टक्के असल्याचे समोर आले. यामुळे पहिल्या चाचणीत रुग्णांना दाखल करून उपचार करण्याचे प्रमाण कमी होऊन डेंग्यू रुग्ण कमी झाले. यानुसारच आता करोनासंदर्भात उपचारांकरिता उपाययोजना केल्या जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या