Type to search

Featured maharashtra नाशिक

नळपाणी योजनेचा बोजवारा; २४ लाख पाण्यात

Share

 

पेठ | सुनील धोंडगे

पेठ तालुक्यातील अंबापूर गावात नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेसाठी ३३ लाख रुपये मंजूर असून त्यापैकी २४ लाखांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, चार वर्ष लोटले तरी ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी व दारासमोर तुटलेले नळ दुष्काळात गावाची शोभा ठरत आहे. येथील महिलांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

तालुका मुख्यालयापासून जेमतेम सहा कि.मी. अंतरावर खेडे पेठ-जोगमोडी हमरस्त्यावर अंबापूर हे गाव आहे. ७०ते ७५ उंबरठे असणारे हे गाव धोंडमाळ ग्रामपंचायतीत येते.गावची पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी सन २०१५ – २०१६ या आर्थिक वर्षात अंबापूर – खंबाळे या गावांत नळपाणी योजनेसाठी तब्बल ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

या योजनेअंतर्गत पाझर तलावातून पाईपलाईनद्वारे अंबापूर व खंबाळे गावातील टाक्यात पाणी संचय केला जाणार होता. या योजनेच्या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला. योजनेचे नियंत्रण ग्रामीण पाणीपुरवठा लघुपाटबंधारे विभागाकडे आहे. त्याचे कार्यालय सुरगाणा येथे आहे.

या ३३ लाखाच्या योजनेतील ३ टप्प्यापैकी पाइपलाईन, सिमेंट टाकीवर २४ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, तरी देखील ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. गावातील नळांना गंज लागला असून काही ठिकाणी नुसते पाईप उभे करण्यात आले आहे.

हंडाभर पाण्यासाठी कसरत
अंबापूर पाझर तलावाच्या माथ्यावरील विहीरीवरून टाकलेली पाईपलाइन अंबापूर गावाच्या पूर्वेस बांधलेल्या टाकीस जोडली आहे . तेथून गावात पाइपलाइनद्वारे अथवा सार्वजनिक नळाद्वारे पाणी पुरवठा करणे स्वाभाविक असतांना पाण्याच्या टाकीस पाइप जोडून गावाच्या उत्तरेस तीव्र उतारावर असणार्‍या विहिरीत पाणी टाकण्यात येते. महिलांना विहिरीतून पाणी उपसून अर्धा किमीचा सरळ जिवघेणा चढ चढून पाणी आणावे लागते.

नळ पाणी योजना बंद आहे. दारापुढे नावाला नळ असून त्यांना गंज लागला आहे.- देवराम शिंगाडे

पाणी योजना असल्याने शासन टँकर देत नाही. या योजनेसाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात आलेे. मात्र, योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.प्रकाश शेवरे

पाणी विहिरीत टाकले जाते. तेथून ते उपसावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर मागवावे लागतात.नामदेव बोके

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!