Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

उड्डाणपुलावरील धोका कायम

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

भगूर येथे रेल्वेने सिन्नरकडे जाणार्‍या मार्गावर उड्डाणपुलाची निर्मिती केली असून त्याचे काम पूर्ण होऊनही लोकार्पण झालेले नाही. तसेच पुलावर गतीरोधक व पथदीप नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.

नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांना जोडणारा हा उड्डाणपुल असून सुमारे ८० गावांतील नागरिकांसाठी त्याचा वापर होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या पुलाचे काम पुर्णत्वास आले असले तरी अद्यापही पुलाच्या दुतर्फा गतीरोधक व पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ पहात आहे.

लोकार्पणापुर्वी पुलाचा वापर करू नये, या उद्देशाने प्रशासनाकडून येथे बॅरिकेडस टाकून रस्ता अडविण्यात आला होता. मात्र रेल्वे फाटक बंद असते तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होता. त्यात रुग्णवाहिकांना वेळेवर रुग्णांना पोहोचविणे अशक्य होत असल्याने तयार झालेल्या पुलाचा वापर करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बॅरिकेडस हटवले होते.

वाहतूक जरी सुरू झाली तरी गतीरोधक व पथदीपांअभावी धोका वाढला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर सुविधा उपलब्ध करून घेऊन उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे आवश्यक आहे. पुलाच्या उदघाटनापुर्वी एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गतीरोधक व पथदीपांची सोय हवी
उड्डाणपुलावर गतीरोधक व पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांना जास्त धोका आहे. याशिवाय परिसरातील शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. उड्डाणपुलामुळे सोय झाली असली तरी त्यावरील गैरसोय दूर करणे आवश्यक आहे.

उड्डाणपुलामुळे वेळेची बचत होते. विद्यार्थी रस्ता ओलांडून जातांना अपघात होऊ नये यासाठी येथे वाहतूक पोलीस नियुक्त करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखावी.
प्रसाद आडके

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!