मनपा ठरविणार वृक्ष लागवडीचे धोरण

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक महानगर पालिकेकडून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आजपर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीत सहा विभागांत वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला गेलेला नाही. यामुळेच आता पुढची पन्नास वर्षांत शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी उद्यान विभागाकडून शहरातील जैवविविधा टिकवताना वृक्ष लागवडीचे धोरण ठरविण्यात येणार आहे.
याच पार्श्‍वभूमीवर वनराई प्रकल्पांचे संयोजक तथा प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थित येत्या १५ फेब्रुवारी रोजी यांच्या उपस्थित शहरातील पर्यावरण तज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ व पर्यावरणासाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांची बैठक होत आहे.
नाशिक शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेत पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेकडून पावले उचलली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील नद्यांची पुनरुज्जीवनासह वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले आहे.
शहरात नुकतेच वृक्ष सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून या सर्वेक्षणानुसार प्रत्येक विभागात वृक्षांची संख्या समान नसून यामुळे त्या त्या विभागात पर्यावरणाचा समतोल राखला जात नसल्याचे लक्षात आले आहे.
तसेच रस्त्याच्या कडेला व कॉलनीत लावले जाणारे झाडे नंतर वाढल्यानंतर अडथळा ठरून ते तोडावे लागत आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर ती झाडे तोडली जाऊ नये अशाच ठिकाणी त्यांची लागवड व्हावी, यादृष्टीने आता शहरात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवडीचे धोरण ठरविण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहरात आता सहा विभागात प्रत्येक एक असा वनराई प्रकल्प साकारण्याचे काम महापालिकेकडून सुरू झाले आहे.
महापालिकेचे वृक्ष लागवड धोरण ठरविण्यासाठी पहिल्या टप्प्यात वनराई प्रकल्पाचे काम सुरू झाले असून हे काम वनराई प्रकल्पाचे संयोजक, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थित पहिली बैठक येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महापालिका आयुक्त सभागृहात होणार आहे.
आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत शहरातील जैवविविधा टिकवण्यासाठी नियोजन व धोरण, वृक्ष लागवड धोरण, शहरातील चार नद्यांचे पुनरुज्जीवन, नागरी वनीकरण, सामाजिक संस्थांचा सहभाग, दुर्मिळ प्रजातीचे बियाणे व रोपे उपलब्धता, जून २०१९ मध्ये प्रत्येक प्रभागात वनराई प्रकल्पबाबत नियोजन करणे अशा विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यावर चर्चा होऊन महासभेत वृक्ष लागवडीसंदर्भातील धोरण ठरविण्यात येणार आहे.
नदी-नाल्यालगत वृक्षरोपणावर भर
वृक्ष लागवड धोरणात भविष्यात लागवड झालेल्या वृक्षांना धक्का लागणार नाही. तसेच डोळ्यासमोर शहराचा डी पी लक्षात ठेवून वृक्ष लागवड करून त्यांची अशी काळजी घेतली जाणार आहे. यात विशेषत: गोदावरी नदीसह इतर प्रमुख नद्या व नाल्याच्या काठावर वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. ही लागवड करताना या नद्या-नाल्यातील जैवविविधा टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यामुळेच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होणार असल्याची माहिती उद्यान विभाग उपायुक्त शिवाजी आमले यांनी दिली.
१६ रोजी शिंदेंकडून देवराईची पाहणी
नाशिक महापालिकेच्या वतीने देवराई प्रकल्प राबविण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या संस्थेची मदत घेतली आहे. याच पार्श्‍वभूमीवर शिंदे यांच्या उपस्थित दि. १५ रोजीची बैठक झाल्यानंतर दि. १६ रोजी शिंदे यांच्या हस्ते शहरातील देवराई प्रकल्पांचा शुभारंभ प्रतिनिधिक स्वरुपात वृक्ष लागवड करून केली जाणार आहे. त्यानंतर शिंदे हे सहा विभागांतील नियोजित देरवाई प्रकल्पाची पाहणी करून याभागात राहणार्‍या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

*