Type to search

Featured नाशिक

महासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर

Share

नाशिक | प्रतिनिधी

लोकसभा आचारसंहितेमुळे विकासकामांना लागलेला ब्रेक आणि सध्या प्रभाग १० मधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा लागू असलेली निवडणूक आचारसंहिता या पार्श्‍वभूमीवर प्रभाग दहामधील विकासकामे सोडून शहरातील विकासकामांच्या सर्वच विषयांना आज महापौर रंजना भानसी यांनी मंजुरी दिली; तर विषय पत्रिकेवरील जादा विषय दाखल मान्य करून घेत धोरणात्मक विषयासाठी येत्या २५ जून रोजी सकाळी ११ वाजता महासभा घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

अवघ्या पाच-सात मिनिटांत चर्चेविना स्थायी समितीवरील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना महापौरांनी मंजुरी दिल्यानंतर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर घाईघाईत महासभा तहकूब केली.

गेल्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महापालिकेच्या एकाही महासभेचे कामकाज झाले नव्हते आणि या महासभा तहकूब करण्यात आल्या होत्या. यानंतर लगेच मागील महिन्यात प्रभाग १० मधील पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. यात मागील महिन्यातील महासभादेखील कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती.

मात्र, पोटनिवडणुकीत केवळ प्रभाग दहा वगळून इतर विभागातील विकासकामांना मंजुरी देता येऊ शकते, हा मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाकडून आज (दि.२०) च्या महासभेत मोठ्या प्रमाणात विकासकामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समिती सभापती व समिती कार्यरत नसल्याने यावरील विषयावर निर्णय घेण्याचे अधिकार महासभेला असल्याने कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे विकास कामांचे प्र्र्रस्ताव महासभेवर मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते.

या एकुणच घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या महासभेत सत्ताधारी व विरोधकांकडून काही धोरणात्मक प्रश्‍न उपस्थित करून गोंधळाची शक्यता होती. हेच लक्षात घेत महापौरांनी महासभा सुरू झाल्यानंंतर श्रध्दांजली आणि अभिनंदनाचे प्रस्तावाचे वाचन केले. यानंतर महापौरांनी प्रभाग दहा मधील पोटनिवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेत या प्रभागातील विकास कामे वगळून महासभेच्या विषय पत्रिकेवरील जादा विषय दाखल मान्य केल्याचे जाहीर केले.

त्यानंतर विषय पत्रिकेवरील नगरसेवकांचे विकास कामांचे विषय आणि स्थायी समितीवरील नगरसेवकांचे विकासकामांच्या विषयांना मंजुरी देण्यात येत असल्याचे जाहीर करीत विषय पत्रिकेवरील धोरणात्मक विषयावर निर्णय घेण्यासाठी येत्या २५ जून रोजी सकाळी ११ वाजता महासभा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

महापौरांकडून अशाप्रकारे निर्णय दिला जात असतांना विरोधकांनी उभे राहत कोणत्या विकासकामांना मंजुरी दिली, ते तरी सांगा अशाप्रकारे महासभेचे कामकाज संपवू नका असे सांगितले. मात्र महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करण्याचे निर्देश देत महासभा संपविली.

सभागृहात महापौरांच्या निषेधाच्या घोषणा
महापौरांनी महासभेची विषय पत्रिका, जादा विषय आणि स्थायी समितीचे कोट्यवधी रुपये खर्चाच्या विषयांना कोणत्याही चर्चेविना अवघ्या काही मिनिटात मंजुरी देत महासभा संपविल्याचे जाहीर केले. यावर तीव्र आक्षेप रा.कॉं. गटनेते गजानन शेलार, कॉग्रेस गटनेते शाहू खैर, गुरमित बग्गा यांच्यासह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी घेतला. आम्हाला मंजूर केलेले विषय तरी सांगा, चर्चा करून निर्णय घ्या, असे विरोधकांनी उभे राहून सांगितल्यानंतर महापौरांनी महासभा संपविली. त्यानंतर शेलार यांनी महापौरांचा निषेध असो अशा घोषणा सभागृहात देत महापौरांचा निषेध करीत सभागृह सोडले.

गामणे-दातीर यांनी फडकवला फलक
पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरातील सर्व मॉलमधील पार्किंग सेवा मोफत करावी, असा प्रस्ताव सेनेच्या किरण गामणे यांनी आजच्या महासभेत दिला होता. यावर चर्चा होऊन निर्णय व्हावा; अशी अपेक्षा गामणे व दीपक दातीर यांच्यासह सेना नगरसेवकांची होती. त्यानुसार गामणे- दातीर यांनी उभे यासंदर्भातील फलक सभागृहात फडकवला. मात्र तोपर्यंत महापौरांनी महासभा संपविली.

आचारसंहिता लक्षात घेता, महासभेत घेतला निर्णय
गेल्या एप्रिल महिन्यापासून शहरातील विकासकामे थांबली असून सर्वच नगरसेवकांची कामे ठप्प झाली आहे. ही विकासकामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी महासभेत आपण निर्णय दिला आहे. सध्या आचारसंहिता सुरू असून ती २४ जून रोजी सायंकाळी संपणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आज ११ वाजता महासभा घेतली जाणार आहे. यात तहकूब केलेल्या धोरणात्मक विषयावर या निर्णय घेतले जाणार आहे. आचारसंहितेमुळे काही त्रास होऊ नये म्हणून आजची महासभेत विकास कामे मंजूर करीत ही महासभेचे काम संपले.
– महापौर रंजना भानसी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!